बॉम्बे जिमखान्यात २ जुलैला स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई आयोजित जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. जागतिक क्रीडा पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात प्रख्यात क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनाही गौरविण्यात येणार होते, पण ते अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या मातोश्री लक्ष्मी शास्त्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मात्र तो स्वीकारताना आपण आपल्या पुत्राप्रमाणेच बोलण्यात मातब्बर आहोत, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी सांगितलेल्या किश्श्यांनी अवघे सभागृह दणाणून सोडले.
चार दशके उलटून गेली असली तरी लक्ष्मी शास्त्री यांना अजूनही जानेवारी १९८५ मधील तो दिवस अजूनही आठवतो. त्यांचा सुपुत्र रवी शास्त्रीने एका षटकात सहा षटकार मारून क्रिकेटमध्ये इतिहास घडवला होता. ही कामगिरी त्याआधी फक्त एकदाच घडली होती, जेव्हा १९६८ मध्ये महान गारफील्ड सोबर्स यांनी इंग्लंडमधील काऊंटी सामन्यात नॉटिंगहॅम शायरकडून ग्लॅमॉर्गनविरुद्ध सहा षटकार ठोकले होते.
बुधवारी २ जुलैला रवी शास्त्री इंग्लंडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करत असताना बॉम्बे जिमखाना येथे लक्ष्मी शास्त्रींनी खणखणीत समालोचन करत जुने दिवस ताजे केले.
त्या म्हणाल्या की, “रवीने आम्हाला अनेक सुंदर आठवणी दिल्या आहेत. पण जर मला सांगायचं झालं, तर त्याने एका षटकात सहा षटकार मारलेला दिवस सर्वाधिक खास आहे. त्या वेळी वानखेडे स्टेडियममध्ये तो खेळतोय, हे मला अजिबात माहीत नव्हतं. उलट आमच्या भेळपुरीवाल्याने मला सांगितलं, कारण तो तिथे उपस्थित होता आणि त्याने हे प्रत्यक्ष पाहिलं होतं,” लक्ष्मी शास्त्रींनी मंचावरून सांगितलं, ज्यावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.
१९८५ मध्ये, जेव्हा सोबर्स यांनी स्वान्सी येथे माल्कम नॅशविरुद्ध सहा षटकार मारले होते, तेव्हा रवी शास्त्रीने १९८४–८५ रणजी ट्रॉफी मोसमात बडोद्याच्या तिलक राजविरुद्ध ही कामगिरी केली होती. या नंतर फक्त काहीच फलंदाजांनी हर्शल गिब्स आणि युवराज सिंग यांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली.
त्या दिवसाची आठवण सांगताना लक्ष्मी शास्त्री म्हणाल्या, “रवी घरी आला, तेव्हा त्याला ताबडतोब कुठेतरी जायचं होतं. मी त्याला विचारलं, आज काय झालं? त्याच्या खास शैलीत, तो कधीच मला थेट काही सांगायचा नाही. त्याने फक्त एवढंच सांगितलं, ‘काय झालं ते जाणून घ्यायचंय का? मग आजच्या सात वाजताच्या ऑल इंडिया रेडिओच्या बातम्या ऐक.’
कारण भेळपुरीवालाही तेच बोलत होता, त्यामुळे माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. माझे पती त्या वेळी क्लिनिकमध्ये होते. त्यांना मी सांगितले की, त्यांनी घरी येऊन मराठीतल्या सात वाजताच्या बातम्या ऐकाव्यात. त्याने विचारलं का? मी सांगितलं की सगळे ह्याचबद्दल बोलत आहेत. घरी आल्यावर, मला खूपच आश्चर्य वाटलं की त्यात जाहीर केलं गेलं की, रवी शास्त्रीने एकाच षटकात सहा षटकार लगावले. दुसऱ्या दिवशी मरीन ड्राइव्हवरही असाच एक फलक झळकला होता. या आठवणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.”
हे ही वाचा:
अमित शहांचा पुणे दौरा, पिस्तुल-जिवंत काडतुसासह एकाला अटक!
हातात हातकड्या, कडक सुरक्षा व्यवस्था, २५० घुसखोर बांगलादेशी ढाक्याला रवाना!
लखनौमध्ये १५ जणांनी इस्लाम सोडून स्वीकारला ‘हिंदू धर्म’
मराठी बोलावीच लागेल पण मारहाण चुकीची!
या कार्यक्रमात रवी शास्त्रींसोबत बिलियर्डसपटू मायकेल फरेरा, ऑलिम्पियन नेमबाज तसेच नेमबाजीच्या प्रशिक्षक असलेल्या अंजली भगवत, दीपाली देशपांडे, सुमा शिरूर, बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक प्रविण ठिपसे, हॉकी ऑलिम्पियन जोकिम कार्व्हालो आणि मर्विन फर्नांडिस, टेबल टेनिसपटू नीरज बजाज, बॅडमिंटनपटू संजय शर्मा, क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लक्ष्मी यांनी १९८५ हे वर्ष रवीसाठी सुवर्णकाळ होता, असे त्याचे वर्णन केले. त्या म्हणाल्या की, “या सहा षटकारांनी वर्षाची सुरुवात झाली आणि नंतर बेंसन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेटमध्ये ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा किताब जिंकला, त्यासोबत ती प्रसिद्ध ऑडी कार मिळाली. त्या वेळी मला ‘ऑडी’ म्हणायचं कसं, हेही माहीत नव्हतं आणि अनेक भारतीयांनी ती गाडी कधी पाहिलीच नव्हती. मेलबर्नच्या मैदानावर संपूर्ण संघाने घेतलेली फेरी ही आठवण माझ्या कायमची लक्षात राहील.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी या सोहळ्याची पार्श्वभूमी एसजेएएमचे अध्यक्ष जी. विश्वनाथ, सचिव क्लेटन मुर्झेल्लो यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र प्रभूदेसाई आणि विजय साळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विन फेरो यांनी केले. बॉम्बे जिमखान्याला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त क्लबचे अध्यक्ष संजीव शरण मेहरा यांनी क्लबचे कार्य विषद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रीडा पत्रकार, खेळाडू, क्रीडा संघटक यांची मांदियाळी बॉम्बे जिमखान्यात पाहायला मिळाली. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सन्मानित खेळाडूंनीही पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
