हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक पूर, भूस्खलन आणि अनेक जिल्ह्यांमध्ये व्यापक विनाश झाला आहे. शिमलाच्या टेकड्यांपासून ते मंडी आणि सिरमौरच्या दऱ्याखोऱ्यांपर्यंत, गेल्या २४ तासांत राज्यात विक्रमी पाऊस पडला आहे. ९ जुलैपर्यंत तीव्र हवामान राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
२० जून ते ३ जुलै दरम्यान, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरासह पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान ६९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे, असंख्य रस्ते बंद झाले आहेत आणि पाणीपुरवठा व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे ६९ जणांचा मृत्यू आहे तर ३७ जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच यामध्ये ११९ जण जखमी झाले आहेत.
या आपत्तीत १५० हून अधिक घरे, १०४ गोठे, ३१ वाहने, १४ पूल आणि अनेक रस्ते नुकसानग्रस्त झाले. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (SEOC) ने सांगितले की, आपत्तीत एकूण १६२ गुरे मृत्युमुखी पडली आहेत, तर मंडीमधील ३१६ लोकांसह ३७० लोकांना वाचवण्यात आले आहे आणि पाच मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पुरामुळे मनाली-केलाँग रस्ता बंद झाला आहे आणि वाहतूक मार्ग रोहतांग खिंडीतून वळवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमा रस्ते संघटनेने (BRO) रस्ते साफ करण्यासाठी पुरुष आणि यंत्रसामग्री तैनात केली आहे.
हे ही वाचा :
प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्या मातोश्रींनी बॉम्बे जिमखान्यात लगावला ‘हास्यषटकार’
राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा!
भारताचे ऑपरेशन ‘सिंधू’, पाकिस्तानच्या घशाला कोरड!
अमित शहांचा पुणे दौरा, पिस्तुल-जिवंत काडतुसासह एकाला अटक!
राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (SEOC) ने सांगितले की, २० जूनपासून राज्यात पावसाळी घटनांमध्ये एकूण ६९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, ३७ जण अजूनही बेपत्ता आहेत. एकूण ११९ जण जखमी आहेत, ज्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आपत्तीत सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे १४, अचानक आलेल्या पुरात आठ आणि प्रवाहात अडकल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.
