भारताने मे महिन्यात पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या तीन महिने आधीच हे ऑपरेशन सुरू झाले होते. ७ मे ते १० मे या काळात सीमेवर घडलेल्या संघर्षानंतरही काही काळ ते सुरू होते. दिल्लीत एनसीआरमध्ये अन्सारुल मिया अन्सारी नावाचा एक मोठा मासा भारतीय सुरक्षा संस्थांच्या जाळ्यात आला. मुळचा नेपाळी, परंतु गेली १६ वर्षे तो पाकिस्तानसाठी इमाने इतबारे राबत होता. कतारमध्ये तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या जाळ्यात आला. तिथेच तो बरीच वर्षे कार्यरत होता. भारतात तो एका विशेष मोहिमेसाठी आला होता. १४ फेब्रुवारीच्या दिवशी रात्री त्याला अटक करण्यापूर्वी त्याने एक अत्यंत गोपनीय सीडी टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकली. दिल्लीत २६/११ घडवायच्या षडयंत्राचा तपशील या सीडीमध्ये होता असे मानायला वाव आहे.
नेपाळ हे गेली अनेक वर्षे आयएसआय़च्या कारवायांचे केंद्र राहिलेले आहे. अस्थिर राजकीय परीस्थिती, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि पराकोटीची गरीबी असल्यामुळे इथे हातपाय पसरणे आयएसआयसाठी सोपे गेले. माफीया दाऊद टोळीचा इथे दबदबा होता. त्याचा वापर करून आयएसआयने इथे हातपाय पसरले. नेपाळी खासदार मिर्जा दिलशाद बेगचा १९९८ मध्ये खून झाल्यानंतर हे कनेक्शन उघड झाले. या हत्ये मागे छोटा राजन आणि त्याच्या मागे भारतीय गुप्तचर यंत्रणा होत्या असा दावा केला जात होता. अन्सारूल हा नेपाळच्या रौतहाटचा रहीवासी. भारतात काही तरी मोठा गेम कऱण्यासाठी तो आला होता. त्या आधीच त्याचा गेम झाला.
अन्सारूल २००० सालच्या दरम्यान कतारमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करत होता. यासीर नाव सांगणाऱ्या आयएसआय़च्या अधिकाऱ्याने त्याला जाळ्यात ओढले. आयएसआयचे अधिकारी अशाच लोकांची हेरगिरीसाठी भरती करतात जे कट्टरवादी विचारांचे असतात. त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या की ते काहीही करायला सज्ज होतात. भारतात रवाना करण्यापूर्वी रावळपिंडी येथे अन्सारुलचे ट्रेनिंग झाले होते. सुरूवातीला तो कतारमध्येच कार्यरत होता. तो अत्यंत हुशार होता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अत्यंत वाकबगार होता. हेरगिरीसाठी एखाद्यावर पाळत ठेवण्याचे कसब तो इथे शिकला. सॅटेलाईट, व्हीपीएन, डार्कवेबच्या माध्यमातून संवाद, ड्रोन आणि उपग्रहांनी टीपलेल्या फोटोचे विश्लेषण, गोपनीय दस्तावेज आणि माहिती गोळा करणे, कामगिरी झाल्यानंतर कामाचा माग पुसून टाकणे. डीजिटल पुरावे नष्ट करणे याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले. दिल्लीत राहून लष्कराबाबत माहिती गोळा करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले.
कतार मध्ये येणाऱ्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांवर नजर ठेवणे, त्यांची माहिती गोळा कऱणे, भारतीयांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये शिरकावकरून त्यावर नजर ठेवणे, भारतातील लष्करी तळांवर जाणाऱ्या जहाजांवर, त्यावरील मालावर लक्ष ठेवणे, अशी कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. टॅक्सी चालक असल्यामुळे प्रवाशांसोबत गप्पाटप्पाच्या ओघातही तो बरीच माहिती काढून घेत असे.
आयएसआयमधील हॅण्डलर यासीरला फोटो, टीपणे, व्हॉईस नोट पाठवण्यासाठी तो बर्नर फोनचा वापर करायचा. म्हणजे असे फोन जे एकदा वापरल्यानंतर नष्ट करता येतील. या कामाच्या मोबदल्यात त्याच्या कतारमधील बँकेचे खाते फुगू लागले. भारतीय गुप्तचरांना त्याचा सुगावा लागण्याची जी बरीच कारणे होती, त्यातले हे एक महत्वाचे कारण. भारतात शिरण्यापूर्वी आपला माग चुकवण्यासाठी तो आधी यूएई तिथून नेपाळमध्ये गेला. भारत-नेपाळच्या सीमेतून त्याने घुसखोरी केली. इथून त्याच्या पश्चिम आशियाच्या कारवाया संपून दक्षिण आशियाची मोहिम सुरू झाली. नेपाळमधून घुसखोरी केल्यानंतर तो थेट दिल्लीत आला. पूर्व दिल्लीतील विश्वास नगरमध्ये त्याने एक स्टुडीयो सुरू केला. इथे तो स्लीपर सेलच्या काही लोकांशी जोडला गेला असण्याची शक्यता आहे.
त्याला अन्सारूलवर गुप्तचर संस्थांची नजर होती. त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक सर्व्हीलन्स ठेवण्यात आले होते. आयबीचे काही लोक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. दिल्ली स्पेशल पोलिस आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक झाली तेव्हा त्याला पिंटू नावाच्या इसम एक सीडी द्यायला आला होता. त्याला अटक करण्यापूर्वी त्याने ती सीडी नष्ट करून टॉयलेटमध्ये फ्लश केली.
त्याच्याकडून एक लॅपटॉप, त्यामध्ये बऱ्याचशी एनक्रिप्टेड फाईल्स, लष्कराच्या गोपनीय फाईली, प्रींटर, पाकिस्तानी नंबरसोबत व्हाट्सअप चॅट असलेला एक फोन आणि नष्ट केलेल्या सीडीचा एक तुकडा आदी गोष्टी आढळल्या आहेत. त्याच्या मोबाईमध्ये त्याच्या आयएसआय हॅंडलरशी झालेले चॅट, लष्करी आस्थापनांचे, सीमावर्ती भागांचे फोटो आढळले आहेत.
हे ही वाचा:
राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा!
भाजपला पहिली महिला अध्यक्ष मिळणार?
नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश!
ड्रग्स प्रकरणात पुन्हा गुन्हा केल्यास ‘मकोका’खाली कारवाई!
अन्सारुलच्या अटकेनंतर त्याचा रांचीतील साथीदार अखलाख आजम यालाही अटक करण्यात आलेली आहे. अन्सारुलला पैसा, फोन, लपण्यासाठी, बैठकांसाठी, कारवायांसाठी जागा पुरवण्याचे काम हा आझम करत होता. पहेलगाममध्ये जो हल्ला झाला, त्याचे नियोजन करताना चार ठिकाणांची चाचपणी झाली असणार. त्यात दिल्लीचा समावेश असू शकेल. एखाद्या लष्करी आस्थापनेवर, ताफ्यावर किंवा नागरी वस्तीवर हल्ला करण्यासाठी त्याची रेकी करण्याचे काम सुरू असेल. अन्सारुल त्याचा म्होरक्या होता. गुप्तचर यंत्रणांनी एक खूप मोठे षडयंत्र उधळले. दिल्ली एनसीआरमध्ये २६/११ घडवण्याचा किंवा पुलवामा सारखा एखादा हल्ला घडवण्याचा हा कट होता. त्यासाठी लष्करी ताफ्याची येजा कशी होते, यावर लक्ष्य ठेवण्यात येत होते. डीआरडीओसारख्या आस्थापनांशी संबंधित बऱ्याच विषयांवर या टोळक्याची नजर होती. अन्सारुलला अटक झाल्यामुळे दिल्लीचा हल्ला टळला, नंतर तो काश्मीरमध्ये घडवण्यात आला असावा.
अन्सारुल आणि त्याच्या टोळक्याची अटक हीच ऑपरेशन सिंदूरची खरी सुरूवात. भारताचे जेम्स बॉण्ड स्पाय मास्टर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भारतात आयएसआयच्या जाळ्याच्या चिंधड्या उडवल्या. काश्मीर वगळता उर्वरीत भारतातील दहशतवादी कारवायांना पायबंद घालणे यामुळेच मोदी सरकारला शक्य झाले. फेब्रुवारी महिन्यात ही कारवाई झाली. ऑपरेशन सिंदूर ७ ते १० मे या काळात पार पडले. त्यानंतर पंजाब, हरीयाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून आयएसआयसाठी काम करणाऱ्या सुमारे १२ जणांना अटक करण्यात आली. यूट्युबर ज्योती मल्होत्राच्या अटकेची बातमी तर प्रचंड चर्चेत होती. हरीयाणातून कासिम, उत्तर प्रदेशातून शहजाद, पंजाबमधून गझाला ही तरुणी, महाराष्ट्रातून रवी वर्मा अशा अनेकांना नंतर अटक करण्यात आली. यातील बहुतेकांचा डोळा भारतीय सीमा किंवा लष्करी आस्थापनांवरच होता.
अन्सारुलच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी तपास यंत्रणांच्या लक्षात आलेल्या आहेत. भारत किंवा पाकिस्तानातील हेरांचा वापर न करता, बांग्लादेश, नेपाळ किंवा आखातातील हेरांचा वापर करण्याची नवी खेळी आयएसआय खेळत आहे. ज्यांना शोधणे अधिक कठीण होणार आहे. हेरगिरी करणाऱ्यांना कधी नव्हे इतके अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येत आहे. अन्सारुलला व्हीपीएन, डार्क वेबचा वापर करण्यात वाकबगार होता. व्यावसायिक देवाणघेवाणीच्या नावाखाली यूपीआयचा वापर करून पैशाचे आदान प्रदान त्याने केले असल्याचे उघड झाले.
अन्सार आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या २० पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सगळा डेटा काढण्याचे काम सायबर तज्ज्ञांच्या मार्फत सुरू आहे. या सगळ्यांचे मीडिया, एनजीओ आणि हवाला एजण्ट्स सोबत काही कनेक्शन आहे काय, याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली असण्याची शक्यता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
