एकीकडे मराठी विरुद्ध हिंदी असा निष्कारण वाद निर्माण केला गेलेला असताना आता गुजरातवरूनही वाद पेटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात जय गुजरात म्हटल्यावरून आता शिंदे यांना आणि त्यांच्या शिवसेनेला हिणवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकनाथ शिंदेंनी पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलं होत. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. यानंतर विरोधकांनी शिंदेंवर टीका केली होती. यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘पुण्यातील गुजराती बांधवांनी एक कॉम्प्लेक्स उभारलं आहे. याचं आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं मी म्हणालो.
यानंतर पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचाच एक जुना व्हीडिओ दाखवला. या व्हीडिओत तत्कालिन एकत्रित शिवसेना आणि भाजपासोबत शिवसेना युतीत असतानाचा तो काळ स्पष्ट होतो. त्यावेळी अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे भाषण करत आहेत. त्यात उद्धव ठाकरे हेही जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हणताना दिसतात. तसेच शिंदेंनी आणखी एक पत्र दाखवले, ज्यात मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा एक पोस्टर दाखवत त्यावर केम छो वरळी असं लिहिलेलं आहे असंही शिंदेंनी सांगितलं.
हे ही वाचा:
टॉयलेटमध्ये फ्लश झाला दिल्लीत २६/११ घडवण्याचा कट ?
मराठी माणसाला लक्षात आले असेल ठाकरेंचा दुटप्पीपणा!
अमित शहांचा पुणे दौरा, पिस्तुल-जिवंत काडतुसासह एकाला अटक!
क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक संधी!
पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, ‘जे आमच्यावर बोलत आहेत, त्यांनी आरसा पाहावा, मराठी बद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केलं जात आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांची ही शिवसेना आहे. त्यामुळे मी आधी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे एका भाषणा गुजराती आणि मराठी माणूस दूध साखरेसारखा महाराष्ट्रात विरघळला आहे, असेही म्हणाले होते, तो व्हीडिओदेखील व्हायरल होत आहे.
