उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अलीगड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला असून मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पंतप्रधान मोदींच्या हवाल्याने लिहिले, “उत्तर प्रदेशातील संभळ येथे झालेल्या अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये अनुग्रह रक्कम म्हणून दिली जाईल.”
खरं तर, शुक्रवारी संध्याकाळी जुनावई पोलीस स्टेशन क्षेत्रात एक भरधाव बोलेरो गाडी नियंत्रण सुटून जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. गाडीतील सर्वजण संभळ जिल्ह्यातील हरगोविंदपूर (थाना जुनावई) गावातील रहिवासी होते. ते बदायूं जिल्ह्यातील बिल्सी येथे बारात घेऊन जात होते. दरम्यान, गाडी अनियंत्रित झाली आणि थेट इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळून पलटी झाली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचे अक्षरशः तुकडे झाले आणि घटनास्थळीच वरासह ५ जणांचा दु:खद मृत्यू झाला. इतर ५ जण गंभीर जखमी झाले, ज्यांना तातडीने अलीगड मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आले, मात्र वाटेतच रवि, कोमल आणि मधु यांचा मृत्यू झाला. आता एकूण मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान!
आषाढी वारीतील घुसखोरी म्हणजे हिंदू धर्मावरील छुपे संकट
‘भारताने फक्त पाकिस्तानलाच नाही तर तीन देशांना हरवले’
घटनेची माहिती मिळताच संभळचे पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार विश्नोई आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुकृती शर्मा घटनास्थळी पोहोचले. बोलेरोमध्ये अडकलेल्या जखमींना मोठ्या मेहनतीनं बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी मृतांचे शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत दिली. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण अतिवेग आणि चालकाची बेपर्वाई हे समोर आले आहे. स्थानिक प्रशासन पीडित कुटुंबांशी संपर्कात असून त्यांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.
