महाराष्ट्र एटीएसने सोमवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली येथे २२ ठिकाणी छापे टाकून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटेचा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख साकीब नाचनच्या १२ कट्टर समर्थकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताकडून राज्यात घातपाताचा कट रचण्यात येत होता, असा संशय असून एटीएसने व्यक्त केला आहे. या छापेमारी दरम्यान एटीएसने काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पडघा- बोरिवली येथे एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सोमवारी पहाटे ४ वाजता सुरू केलेली शोधमोहीम दुपारी १ वाजता थांबविण्यात आली. या शोधमोहीमेत एटीएसचे जवळपास १०० अधिकारी आणि कर्मचारी आणि ठाणे ग्रामीणचे जवळपास २०० जणांचे पथक सहभागी झाले होते.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण पडघा आणि बोरिवलीत पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा- बोरिवली येथून सिमी या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता साकीब नाचण सह १५ जणांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्र मॉड्युल उध्वस्त करण्यात आले होते. एनआयएच्या अटकेत असलेला संशयित अतिरेकी साकीब नाचन आणि त्याच्या इतर साथीदार हे पडघा – बोरीवली येथे राहणारे आहे.
देशात बंदी असलेल्या सिमी या संघटनेचा सक्रिय सदस्य आणि संशयित दहशतवादी साकीब अब्दुल हमिद नाचण आणि अटकेत असलेल्या त्याच्या हस्तकानी पडघा – बोरिवली येथे भडकावू व चिथावणीखोर भाषणे करून लोकांना देशाविरुध्द कारवायां करण्यासाठी प्रेरीत केलेले आहे. त्यामुळे पडघा – बोरीवलीत नाचनचे कट्टर समर्थक सक्रिय झाले आहे, त्यामुळे ते देशाच्या विरोधात कट कारस्थान करुन घातपाती कारवाई करण्याची शक्यता असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती एटीएसच्या प्राप्त झाली होती.
हे ही वाचा :
राणी बागेत जन्मलेल्या पेंग्विन्सच्या पिल्लांची नावे मराठीत हवी!
बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी थांबवा, विहिंपची मागणी!
सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते…
…आणि अशा पद्धतीने रशियन विमानांना बेमालुमपणे युक्रेनने उद्ध्वस्त केले!
या पार्श्वभुमीच्या आधारे पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, ठाणे यांनी न्यायालयाकडून, पडघा परिसरातील संशयीत इसमांच्या घर झडतीकरीता सर्च वॉरंट प्राप्त करुन घेतले. महाराष्ट्र एटीएस पथकाने ठाणे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन सोमवारी पहाटे चार वाजता पडघा बोरिवली मधील २२ घरामध्ये शोध मोहीम राबववुन १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी १ वाजता ही शोध मोहीम थांबविण्यात आली, या शोध मोहीम दरम्यान एटीएसने मोबाईल हॅन्डसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्रे व दहशतवाद, रॅडीक्लायझेशन यास उत्तेजन देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. एटीएस सूत्रांच्या म्हणण्यानुसार साकीब नाचन आणि त्याच्या समर्थकांना अटक केल्यानंतर नाचन आणि इतराच्या संपर्कात असलेल्या तसेच नाचन यांच्या भडकावू भाषणातून प्रेरित झालेल्या २२ जणांकडून राज्यात घातापाताची शक्यता होती, त्यामुळे हे छापेमारी करून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
