मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अर्थात राणीची बाग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राणी बागेतील पेंग्विन्सच्या पिल्लांच्या नावावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्याने जन्मलेल्या पेंग्विन्सच्या पिल्लांची नावे मराठीत हवी, असा आग्रह भाजपाने धरला आहे. मात्र, राणी बाग प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने भाजपाकडून आज (२ जून) आंदोलन करण्यात आले.
राणीच्या बागेत तीन पिल्लांचा जन्म झाला असून त्यांची नावे ही मराठीत असावी, यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर आंदोलन करत आहेत. पेंग्विन्सच्या पिल्लांची नावं ‘नॉडी’, ‘टॉम’ व ‘पिंगु’ अशी आहेत, पण त्या नावांना भाजपाचा विरोध आहे. मुंबईत जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावे देण्याचा आग्रह भाजपाने केला आहे. यांसदर्भात देण्यात आलेल्या निवेदनास एक महिना झाला तरी प्रशासनाने कानाडोळा केल्याचे भाजपाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर नितीन बनकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नितीन बनकर म्हणाले, परदेशातून आणलेल्या पेंग्विन्सची नावे इंग्रजीत आहे, हे समजू शकतो. पण नुकतीच जन्मलेली ही पिले मराठीच्या मातीत जन्मली आहेत, महाराष्ट्र-मुंबईत जन्मली आहेत. त्यामुळे त्यांची नावे मराठीत असावी असा आमचा आग्रह आहे.
हे ही वाचा :
…आणि अशा पद्धतीने रशियन विमानांना बेमालुमपणे युक्रेनने उद्ध्वस्त केले!
१६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ‘हे’ गाव झाले नक्षलमुक्त!
मनीषा कोइरालाने मणिरत्नमला दिल्या शुभेच्छा
प्राण्यांच्या बाजार बंद करण्याचा निर्णय गाईंच्या संरक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल
ते पुढे म्हणाले, यासाठी बाग प्रशासनाला आम्ही दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र, त्यांनी जाणूनबुजून आमच्याकडे दुर्लक्ष केले. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा सन्मान व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. पण प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आम्ही आज आंदोलन केले. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही सर्वजण मिळून ठिय्या आंदोलन करू आणि राणीची बाग बंद करू.
