वर्सोवा येथील एका बांधकाम व्यवसायिकाच्या नाट्यमय अपहरणप्रकरणाचा शेवट आश्चर्यकारक पद्धतीने झाला आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता संबंधित व्यवसायिक अपहरणकर्त्यांकडे नव्हे, तर वसई येथील नशामुक्ती केंद्रात आढळून आले. चौकशीत समोर आले की त्यांना घेऊन जाणारे अपहरणकर्ते नसून नशामुक्ती केंद्रातील कर्मचारीच होते, आणि हे सर्व दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून घडले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (५ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील फोर बंगलोज भागात राहणारे बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत भुनू यांच्या घरी चार अज्ञात पुरुष आले. “साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे,” असे सांगून त्यांनी भुनूंना जबरदस्तीने एका पांढऱ्या कारमध्ये बसवले. या घटनेनंतर पहिल्या पत्नीने वर्सोवा पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली.
वर्सोवा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना संबंधित कारचा मागोवा लागला. चौकशीत समोर आले की ती कार वसईतील एका नशामुक्ती केंद्राच्या नावावर होती. पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला असता चंद्रकांत भुनू हे तिथेच आढळले.
तपासादरम्यान उघड झाले की भुनू यांच्या दोन पत्नी असून, मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात सतत वाद होत होते. या तणावामुळे भुनू हे दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे दुसऱ्या पत्नीनेच नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधून त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची विनंती केली होती.
हे ही वाचा :
योगींचे गुन्हेगारीविरुद्ध असहिष्णुता धोरण; ४८ तासांत २० एन्काउंटर
“पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन”
“पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन”
मात्र या संपूर्ण कारवाईबाबत पहिल्या पत्नीला काहीही सांगितले गेले नव्हते, त्यामुळे तिने अपहरणाचा संशय व्यक्त केला आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. अखेरीस चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गैरसमजामुळे निर्माण झालेल्या या “अपहरण” नाट्याने परिसरात खळबळ उडाली आहे.







