मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसने (GPO) बनावट पोस्टल स्टॅम्प घोटाळ्याचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. टपाल विभागाने काही पत्रांची तपासणी केली असता त्यावर लावलेले स्टॅम्प बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर या देशव्यापी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट दिल्ली आणि बिहारमधील समस्तीपूर येथून चालवले जात होते. ही टोळी बनावट पोस्टल तिकिटे त्यांच्या निम्म्या किमतीत विकत होती. धक्कादायक म्हणजे, अटक आरोपींच्या बँक खात्यांमध्ये ८ कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार पोलिसांना आढळून आले आहेत.
असा झाला घोटाळ्याचा पर्दाफाश
सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल यांना भोपाळमधील टपाल विभागाकडून एक गोपनीय पत्र मिळाले. या पत्रात मुंबईहून आलेल्या पाच पत्रांवर बनावट टपाल तिकिटे लावल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर हे तिकिटे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसला पाठवण्यात आली आणि प्रेसने ती बनावट असल्याची पुष्टी केली.
टपाल विभागाने ही पत्रे पाठवणाऱ्या वित्तीय कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांनी हे काम दुसऱ्या फर्मला आउटसोर्स केल्याचे सांगितले. या फर्मचा फ्रँचायझी मालक, सायन कोळीवाडा येथील ४२ वर्षीय राकेश रामधनी बिंद, मोठ्या प्रमाणात ऑर्डर असल्याने स्टॅम्प पुरवत होता. इंडिया पोस्टने टपाल तिकिटांच्या पुरवठ्यासाठी ज्या १० फ्रँचायझी नियुक्त केल्या आहेत, त्यापैकी बिंद याची फ्रँचायझी फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याला मिळाली होती. वित्तीय कंपनीने बिंदमार्फत १० जून रोजी सुमारे ४,९८६ आणि १३ जून रोजी ६,९९५ पत्रे पाठवली होती. जीपीओ, सीएसएमटी येथे पोस्टल निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय आशुतोष कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
गाजियाबादमध्ये लागल्या ४८ ठिकाणी आगी
राहुल गांधींना आम्ही गंभीरतेने घेत नाही
निवडणूक आयोगावर आरोप म्हणजे संविधानाचा अपमानच!
देशव्यापी जाळे आणि ८ कोटींचे व्यवहार
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी त्वरित पथके स्थापन करून चौकशी सुरू केली. पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी फ्रँचायझी मालक राकेश बिंदला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दिल्ली आणि बिहारमधील समस्तीपूर येथून बनावट पोस्टल स्टॅम्प आणल्याचे उघड केले.
त्यानंतर पोलिस पथके बिहारला रवाना झाली आणि १६ ऑक्टोबर रोजी समस्तीपूर येथून शमसुद्दीन गफ्फार अहमद (३५) आणि शाहिद रझा (३५) या दोन आरोपींना अटक केली.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील आरोपींच्या पाच बँक खात्यांची तपासणी केली असता, सुमारे ८ कोटींचे व्यवहार आढळले. “हे आरोपी बनावट पोस्टल स्टॅम्प अर्ध्या दराने विकत असत आणि ते फ्रँचायझी किंवा इतर आरोपींना कुरिअरद्वारे पाठवत असत,” असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी देशभरात बनावट पोस्टल स्टॅम्प पाठवले असून हे एक देशव्यापी रॅकेट असल्याचे पोलिसांना आढळले आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १७८, १७९, १८०, १८१, १८६ आणि ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. टपाल खात्यात वापरले जाणारे टपाल तिकिटे नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापली जातात, त्यामुळे हा बनावट स्टॅम्पचा घोटाळा गंभीर मानला जात आहे.







