पश्चिम आफ्रिकेतील मालीमध्ये जवळपास तीन महिन्यांपूर्वी अपहरण झालेले भारतीय वंशाचे हिरे उद्योजक धीरू रमानी यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाने अपहरणकर्त्यांना सुमारे ४० लाख युरो (सुमारे ४४ कोटी रुपये) खंडणी दिल्यानंतर त्यांची मुक्तता झाल्याची माहिती समोर आली आहे.
धीरू रमानी हे मूळ गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील धारी गावचे रहिवासी असून, त्यांचे सुरतच्या हिरे उद्योगाशी अनेक दशकांपासून घनिष्ठ संबंध आहेत. सुमारे १९८० पासून ते हिरे व्यवसायात कार्यरत होते. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांच्या कुटुंबाने आंतरराष्ट्रीय हिरे व्यवसायात मोठे जाळे उभारले. अलीकडच्या काळात त्यांनी व्यवसायाचा विस्तार करत मालीमध्ये सोन्याच्या खाणीत गुंतवणूक केली होती. त्या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ते मालीमध्ये राहत असताना एप्रिलमध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले.
सुरतमधील उद्योग क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला सुमारे १०० कोटींची खंडणी मागितली होती. मात्र, अमेरिकेत राहणाऱ्या रमानी यांच्या कुटुंबीयांनी थेट अपहरणकर्त्यांशी चर्चा करून ही रक्कम कमी करण्यात यश मिळवले. अखेरीस ४० लाख युरो (सुमारे ₹४४ कोटी) देण्यावर तोडगा निघाला आणि रमानी यांची सुटका झाली. या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय सरकारी यंत्रणांचा सहभाग नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.
सुटका झाल्यानंतर धीरू रमानी अद्याप मालीमध्येच असून, स्थानिक पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. अपहरण कसे झाले, त्यांची सुटका कोणत्या परिस्थितीत झाली आणि त्यामागे कोणत्या गटाचा हात होता, याचा तपास सुरू आहे. माली प्रशासनाने अद्याप अधिकृतपणे कोणत्याही दहशतवादी किंवा गुन्हेगारी संघटनेचे नाव जाहीर केलेले नाही.
धीरू रमानी यांच्या अपहरणाच्या काळात मालीतील सुरक्षा परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. एप्रिलमध्ये भारताच्या बामाको येथील दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला होता. देशातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या आणि अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा जारी करण्यात आला होता.
हे ही वाचा:
२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम
विजेसाठी १२ वर्षांचा संघर्ष; जनता दरबारानंतर घरात प्रथमच पेटला बल्ब
मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!
पुण्यात ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना
या घटनेमुळे आफ्रिकेतील संघर्षग्रस्त भागांमध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय उद्योजकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः खाणकाम, नैसर्गिक संसाधने आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय उद्योगपतींसाठी मालीसारख्या देशांतील वाढता सुरक्षा धोका गंभीर आव्हान ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.







