गोवंडी परिसरातून बांगलादेशी नागरिकांना अवैधपणे भारतात आणणाऱ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध ‘किन्नर गुरु’ बाबू खान उर्फ ज्योती माँ हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की तिच्या नियंत्रणाखाली २०० पेक्षा जास्त चेले कार्यरत आहेत. तसेच, मुंबई उपनगरात तिच्या नावावर सुमारे २० घरांची मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरून याबाबत माहिती दिली.
या कारवाईनंतर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबईसह इतर शहरांतील अवैध बांगलादेशी नागरिकांच्या नेटवर्कवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सोमय्या यांनी म्हटले, “मुंबई पोलिसांनी ही कारवाई अवैध बांगलादेशी नागरिकांच्या नेटवर्कवर मोठा धक्का बसवणारी आहे. भविष्यात अशा कारवाया तीव्र केल्या जातील.” दरम्यान, पोलिस तपास अद्याप चालू असून पुढील चौकशी आणि अन्य संदिग्धांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.







