नीट (NEET-UG 2026) पेपरफुट प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील RCC (रेणुकाई करिअर सेंटर) कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी परीक्षेपूर्वी रसायनशास्त्राचे प्रश्नपत्र मिळवण्यासाठी ५ लाख रुपये दिल्याचा दावा सीबीआयने विशेष न्यायालयात केला आहे.
सीबीआयने मोटेगावकर यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयात सांगितले की, त्यांनी सहआरोपींसोबत संगनमत करून NEET-UG परीक्षेतील रसायनशास्त्राचे प्रश्न परीक्षेपूर्वी मिळवले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीतील सदस्य आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ५ लाख रुपये दिले.
तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, मोटेगावकर यांचा मुलगा पी. व्ही. कुलकर्णी यांच्या खासगी शिकवणीला जात होता. त्याच वर्गात विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न सांगण्यात आले. मोटेगावकर यांनी त्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोंदी तयार केल्या होत्या, असा आरोप सीबीआयने केला आहे.
सीबीआयने मोटेगावकर यांच्या मोबाईलमधून ३१ छायाचित्रांमध्ये जतन केलेले १३६ प्रश्न जप्त केले. तपासात यापैकी १११ प्रश्न NTA च्या मूळ प्रश्नसंचाशी तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पेपरफुटीचा संशय अधिक बळकट झाला आहे.
मे महिन्यात सीबीआयने मोटेगावकर यांच्या लातूरमधील निवासस्थानासह RCC संस्थेच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. त्या वेळी रसायनशास्त्राचा प्रश्नसंच जप्त करण्यात आला होता. या प्रश्नसंचातील प्रश्न आणि ३ मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेतील प्रश्न एकसारखे असल्याचा दावा सीबीआयने केला होता.
सीबीआयच्या तपासानुसार, NTA च्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे रसायनशास्त्राच्या पेपरफुटीचे प्रमुख स्रोत होते. त्यांनी पुण्यात विशेष शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी ते प्रश्न वहीत लिहून घेतले होते आणि हेच प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
हे ही वाचा:
दिल्लीच्या SIR मतदार यादीला १२ दिवसांची मुदतवाढ
या जेन झी क्रांतीचे विरोधकांना वावडे का असावे?
यवतमाळमध्ये सहा महिन्यांत १०२ शेतकऱ्यांची आत्महत्या
माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान; भक्तिरंगात न्हाऊन निघाले हजारो वारकरी!
सीबीआय सध्या महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नाशिक, नांदेड आणि इतर शहरांतील कोचिंग संस्था, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तपासाचा विस्तार करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.







