पंजाब काउंटर इंटेलिजेंसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तरनतारन पोलिसांनी मोठी कारवाई करत एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे. गगनदीप सिंग उर्फ गगन असे अटक केलेल्या गुप्तहेराचे नाव आहे. तो मोहल्ला रोडुपूर, गली नजर सिंग वली येथील रहिवासी आहे. गगनदीपवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. ऑपरेशन सिंदूर’सह अनेक लष्कराच्या मोहिमेची माहिती आयएसआय एजंट्सना शेअर केल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी गगनदीप सिंग याने लष्कराच्या तैनाती आणि मोक्याच्या ठिकाणांच्या तपशीलांसह संवेदनशील गोपनीय माहिती लीक केली, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की गगनदीप सिंग गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात होता, ज्याच्या माध्यमातून त्याची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी (पीआयओ) ओळख झाली होती. त्याला भारतीय माध्यमांद्वारे पीआयओंकडून पैसेही मिळत होते,” असे पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.
पोलिसांनी तरनतारनच्या शहर पोलिस ठाण्यात गुप्तता कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच, संपूर्ण हेरगिरी नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी सखोल आर्थिक आणि तांत्रिक तपास देखील सुरू आहे.
हे ही वाचा :
गुकेशने कार्लसनला हरवून इतिहास घडवला, पीएम मोदींच्या कडून दाद
महिला क्रिकेटला नवे शिखर गाठायला सज्ज
एकेकाळचा वेगवान योद्धा आता उपचाराच्या मैदानात
चीनच्या जीवावर पाकिस्तानच्या भारताला धमक्या; हिमंतानी दिला आवाज!
पंजाब पोलिसांनी आरोप केला आहे की, खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला, जो सध्या पाकिस्तानात आहे, तो आयएसआयच्या सहकार्याने भारतात हेरगिरी रॅकेट चालवत आहे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाई दरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो सक्रियपणे हेरगिरीत गुंतला होता. चावला पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी देखील जोडलेला आहे आणि त्याचे लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदसोबत फोटोही आहेत.
आरोपी गगनदीपने वेगवेगळ्या चॅटिंग ॲप्लिकेशन्सद्वारे केलेले संभाषण डिलीट केली आहेत. पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, ते परत मिळवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात आली आहे. त्याच्या मोबाईलमधून असे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यामध्ये अनेक संवेदनशील भारतीय लष्कराच्या सीमावर्ती भागांचे आणि चौक्यांचे व्हिडिओ आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
