ईशान्येकडील भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा आता ३६ वर पोहोचला आहे, तर या प्रदेशात ५.५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
आसामला सर्वात जास्त फटका बसला असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५.३५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. ब्रह्मपुत्र, बराक आणि सुबानसिरीसह पंधरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) म्हटले की, श्रीभूमी, काचर आणि नागाव जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. १६५ मदत छावण्यांमध्ये ३१,००० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे आणि गेल्या २४ तासांत १२,६१० हेक्टरवरील पिकेही पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ९४ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
अरुणाचल प्रदेशात, लोहित जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या १० वर पोहोचली. २३ जिल्ह्यांमधील ९०० हून अधिक लोक पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झाले आहेत. पश्चिम कामेंग, दिबांग व्हॅली, पापुम पारे आणि इतर जिल्ह्यांमधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सिक्कीममध्ये रविवारी (१ मे) संध्याकाळी मांगन जिल्ह्यातील छातेन येथे लष्करी छावणीवर भूस्खलन झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आणि सहा लष्करी जवान बेपत्ता झाले. संरक्षण अधिकाऱ्यांनी मृतांची ओळख पटवली आहे ती हवालदार लखविंदर सिंग, लान्स नाईक मुनीश ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखाडा अशी आहे.
हे ही वाचा :
मोहनलाल यांना भारतातील सर्वोत्तम अभिनेता कोणी म्हटले!
सर्व देश दहशतवादाविरुद्ध भारताबरोबर
पोलिस भरतीत अग्निवीरांना २० टक्के आरक्षण
महिला क्रिकेटला नवे शिखर गाठायला सज्ज
ईशान्येकडील परिस्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. मणिपूरमध्येही भीषण पुराचा सामना करावा लागत आहे, राज्यात १९,८०० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि ३,००० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३ जून) ईशान्य भारतातील बहुतेक भागात पुढील सात दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ३ जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुढील २४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
