पवईतील आरए स्टुडिओत अल्पवयीन मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य या आरोपीचा अखेर पोलिस चकमकीत मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेतीन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या ओलीसनाट्याचा शेवट पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर झाला. पोलिसांनी ओलीस ठेवण्यात आलेल्या १७ मुलांसह सर्व १९ जणांची सुखरूप सुटका केली आहे.
घटनेदरम्यान रोहित आर्याकडून एक एअरगन आणि काही घातक रसायने जप्त करण्यात आली आहेत. ही घटना पवईतील एल अँड टी गेट क्रमांक ९ जवळील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या आरए स्टुडिओमध्ये घडली. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पवई पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती गंभीर असल्याने शीघ्र कृती दल (QRT), अग्निशमन दल आणि बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी रोहित आर्यशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. “तू मुलांना सोड, आम्ही बोलणी करतो,” असे विनंती करूनही त्याने पोलिसांचे ऐकले नाही. पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता रोहितने एअरगनमधून फायर केले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळी झाडली. ती गोळी आर्यच्या छातीवर लागली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
खोकला किंवा दम्यावर काय आहे रामबाण ?
कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कमांडर!
भारतीयांकडून खंडणीसाठी पाकिस्तानी अंडरवर्ल्ड सक्रीय!
दुखापतीपेक्षा तुमचं प्रेम मोठं आहे
कोण होता रोहित आर्या?
मूळचा पुण्याचा असलेला रोहित आर्य २०२२ मध्ये ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम स्वतःच्या खर्चाने राबवून चर्चेत आला होता. या प्रकल्पाचे परिणाम पाहून शिक्षण विभागाने तो अधिकृत अभियानात समाविष्ट केला होता. मात्र, नंतर स्वतःला या प्रकल्पातून अन्यायाने वगळण्यात आल्याचा आरोप त्याने केला. जुलै २०२४ मध्ये आर्यने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उपोषणही केले होते.
व्हायरल व्हिडिओत रोहित काय म्हणाला?
ओलीस नाट्यादरम्यान रोहित आर्याने स्वतःचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला. “मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है… कुछ बच्चों को हॉस्टेज रखा है. मुझे कोई बड़ी डिमांड नहीं है, बस कुछ लोगों से सवाल करने हैं, जवाब चाहिए,” असे तो म्हणताना दिसतो. या नाट्यमय घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून पोलिसांनी रोहित आर्याच्या पार्श्वभूमीचा आणि त्याच्या हेतूंचा सखोल तपास सुरू केला आहे.







