देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असताना महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील एका मंदिरातून शिवलिंग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित घटना कल्याणपूर येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरसिद्धी माताजी मंदिराजवळील श्री भिडभंजन भवनेश्वर महादेव मंदिरात घडली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राचीन शिव मंदिराच्या पुजारींच्या ही घटना लक्षात आली. शिवलिंग त्याच्या जागेवरून पायथ्यासह चोरीला गेल्याचे आढळले आणि त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. मंदिरातील इतर सर्व वस्तू सुस्थितीत असल्याचे पोलिस निरीक्षक आकाश बरसिया म्हणाले. तसेच शिवलिंगाचा तळ जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळला आहे. त्यामुळे शिवलिंग समुद्रात असल्याची शक्यता असल्याने स्कूबा डायव्हर्सची एक टीम समुद्राच्या आत चोरीला गेलेल्या शिवलिंगाचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, विशेष ऑपरेशन ग्रुप आणि स्थानिक पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत, ज्यात फॉरेन्सिक तज्ञ आणि श्वान पथकाचा देखील समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर, अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०५ अंतर्गत चोरीसाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि शोध मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
प्रयागराजमध्ये भरला ‘चहाचा महाकुंभ’
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
‘संभाजी महाराजांचा छळ ४० दिवस दाखवला असता तर विपरीत परिणाम झाला असता’
पुजाऱ्याने सांगितले की, जेव्हा ते मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावले असता शिवलिंग जागेवरून गायब असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. ही घटना महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्राचीन मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते.