सध्या देशभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग, त्यांचे शौर्य, मुघलांकडून झालेले अत्याचार सिनेमात दाखवण्यात आले असून त्याचेही प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. अशातच आता या सिनेमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मालिकेसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले जात असताना अमोल कोल्हे यांनी यावर खुलासा केला आहे.
अमोल कोल्हे यांनी एका व्हिडीओद्वारे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्यासंदर्भात दबाव होता का? राजकीय हेतू होता का? शरद पवारांची काही विशेष सूचना होती का? अशा काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी यांना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला हे दाखवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का, कोणाचा दबाव होता का? असे सवाल उपस्थित केले जात होते. यावर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्याचा दबाव होता. पण, हा दबाव माध्यमांचा होता. कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होत होती. त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखविण्यात आल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. तसेच नैतिकतेचाही दबाव असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. सलग ४० दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचे बलिदान दाखवले असते तर कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
हे ही वाचा :
सभागृहातील गदारोळानंतर आतिशी यांच्यासह सर्व आप आमदार निलंबित
उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून एआयएडीएमके आमदाराच्या घरावर छापेमारी
पंजाबमध्ये चालला बुलडोझर; ड्रग्ज माफियाचे बेकायदेशीर बांधकाम केले जमीनदोस्त
अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट कसा दाखवावा यासाठी शरद पवारांनी कोणती सूचना दिलेली नव्हती, असं अमोल कोल्हे म्हणाले. शरद पवारांनी ही मालिका करोना काळात पुनर्प्रक्षेपन केलं तेव्हा पाहिली, त्यामुळं आधी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना त्यांना अजिबात नव्हती. शरद पवारांनी कधीही अमुक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलं नव्हतं, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तेव्हा शरद पवारांनी ही मालिका पाहिली देखील नव्हती. शरद पवारांनी मालिका पाहिली ती कोवीडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेतं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी त्यांनी ही मालिका पुन्हा पाहिली. त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणालातरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट दाखवला नाही असा खोटा प्रचार करणं हा धादांत खोटा प्रचार असल्याचंही यावेळी कोल्हेंनी म्हटलं आहे.