अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेल्या भारतीयांना ट्रम्प प्रशासनाने मायदेशी पाठवल्यानंतर यातील अनेक जण एजंट्सच्या मदतीने ‘डंकी मार्गा’चा वापर करून अमेरिकेत पोहचल्याचे समोर आले होते. शिवाय काहींची लाखो रुपयांची फसवणूक एजंट्सकडून झाल्याचेही उघड झाले होते. याचं पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी या एजंट्सवर मोठी कारवाई केली आहे.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेल्या भारतीयांना हद्दपार करण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केले आहेत. काही इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम (आयईएलटीएस) केंद्रांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत आणि भविष्यातही अशीच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांच्या आदेशानुसार फसव्या ट्रॅव्हल एजंट्सवरील ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरातून बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सविरुद्धच्या तक्रारीच्या आधारे अमृतसर पोलिसांनी कारवाई केली आहे. येत्या काळात ही कारवाई अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. भारतीयांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सविरुद्ध पोलिस सतत गुन्हे नोंदवत आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत, अशी माहिती आहे.
अहवालानुसार, अमेरिकेने परत पाठवलेल्या भारतीयांमध्ये पंजाबमधील लोकांचा सर्वात मोठा गट आहे. ५, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी निर्वासितांना घेऊन जाणारी तीन विमाने भारतात आली. यात एकूण ३३३ भारतीयांना परत आणले गेले. यातील १२६ व्यक्ती या पंजाबमधील होत्या. गेल्या तीन वर्षांत पंजाबमध्ये ट्रॅव्हल एजंट्सविरुद्ध ३,२०० हून अधिक पोलिस गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा :
ट्रम्प यांची पुतीन यांना साथ; संयुक्त राष्ट्रात युक्रेनविरोधात मतदान
११ मोबाईल, ९०० सिमकार्डचा वापर, उन्नावमध्ये ५ संशयित बांगलादेशींना अटक!
बोगस कागदपत्रांसह बँकेकडून कर्ज घेऊन वाहनांची परस्पर विक्री करणारी टोळी जेरबंद
‘सकाळच्या भोंग्याला सुसंवाद शिकवा तरच राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल!’
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना (एसडीएम) ट्रॅव्हल एजंट आणि इमिग्रेशन सल्लागारांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रॅव्हल एजंटविरुद्ध कोणत्याही तक्रारीची माहिती उपायुक्त कार्यालयाला त्वरित देण्याचे निर्देश जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहेत. ट्रॅव्हल एजंट्सनी योग्य नोंदी ठेवाव्यात आणि ते अपूर्ण कागदपत्रांसह काम करत नाहीत याची खात्री करावी. अनधिकृत एजंट्सवर कठोर कारवाई केली जाईल. अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) प्रवीण सिन्हा यांनी सांगितले की, “पंजाबमध्ये ट्रॅव्हल एजंट्सच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे आणि लोक बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू नयेत यासाठी जागरूकता पसरवली जात आहे, त्यांना योग्य कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.”