कॉकरोच अभिजीत दिपकेचा मुखवटा जनता ओरबाडेल तेव्हा ओरबाडेल, सध्या काँग्रेसनेच त्याचे वस्त्रहरण कऱण्याचा विडा उचललेला दिसतो आहे. हे काँग्रेसलाच जमू शकते. कोणाला जोडे उचलायला द्यायचे, कोणाचे जोडे उचलायचे आणि कोणाला जोडे मारायचे हे जेवढे कॉग्रेसवाल्यांना कळते तेवढे कोणालाच नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी दिपके आणि कंपनीला कर्नाटकात उपोषणाला या, आंदोलन करा असे निमंत्रणच दिले आहे. राज्यकर्त्यांना माज असू नये, असलाच तरी तो दाखवू तरी नये, अशी जनता जनार्दनाची अपेक्षा असते. काँग्रेसवाले असल्या तुच्छ गोष्टींना फारशी किंमत देत नाहीत. ते आपल्याच टेचात असतात. त्यामुळे अनावधानाने टेचात असलेल्या त्यांच्यासारख्या अनेकांचा कडेलोट करत असतात. केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिजीत दिपकेचा कडेलोट बहुधा काँग्रेसने मनावर घेतलेला आहे. प्रियांक खरगे हे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत. कर्नाटकात पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेत भानगडी झालेल्या आहेत. परीक्षार्थी त्यामुळे प्रचंड संतप्त आहेत. ३९९१ पदांसाठी सुमारे ४.५ लाख तरुणांनी या परीक्षेसाठी तयारी केली होती. परीक्षा प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला आहे. विजयपुरा जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षेवर बहीष्कार टाकला आहे.



