रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. बायडन प्रशासन काळात युक्रेनला आर्थिक पाठबळ देणाऱ्या अमेरिकेची आताची भूमिका बदलताना दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सूत्रे आल्यापासून अमेरिकेची भूमिका ही काहीशी रशियाच्या बाजूने झुकलेली दिसून येत आहे. अशातच हे चित्र अधिक स्पष्ट झालं आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षाबाबत, अमेरिकेने आपले धोरण बदलले असून संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाला पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेने थेट रशियाशी हातमिळवणी केल्याचं चित्र संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाहायला मिळालं. सोमवारी महासभेच्या बैठकीत युक्रेनकडून मांडण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण यावेळी अमेरिकेनं रशियासह प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये आणलेल्या ठरावात युक्रेनमधून रशियन सैन्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आणि लढाईचा निषेध करण्यात आला. जेव्हा या प्रस्तावावर मतदान आवश्यक होते, तेव्हा अमेरिकेने आपल्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल करत रशियाची साथ दिली. युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या बाजूने मतदान करण्याची ही पहिलीच वेळ होती.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सोमवारी युक्रेननं रशियाच्या घुसखोरीविरोधात प्रस्ताव मांडला. रशियाने तातडीने त्यांचे सैन्य माघारी घ्यावे, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करावी आणि युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धावर शांततापूर्ण मार्ग काढला जावा, अशा मागण्या या प्रस्तावात करण्यात आल्या. महासभेत हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर करण्यात आला. यावेळी काही सदस्य राष्ट्रांनी विरोधात मतदान केलं तर काही सदस्य राष्ट्रे मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिली.
या प्रस्तावाला ९३ देशांनी पाठिंबा दिला, तर १८ देशांनी विरोधात मतदान केले, ज्यात अमेरिका, रशिया, बेलारूस आणि उत्तर कोरिया सारख्या देशांचा समावेश आहे. भारतासह ६५ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध असून या युद्ध काळात भारताने नेहमी शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावेळीही भारताने कुणाच्याही बाजूने मतदान करण्याऐवजी मतदान प्रक्रियेला गैरहजर राहण्याचा मार्ग निवडला.
हे ही वाचा :
११ मोबाईल, ९०० सिमकार्डचा वापर, उन्नावमध्ये ५ संशयित बांगलादेशींना अटक!
बोगस कागदपत्रांसह बँकेकडून कर्ज घेऊन वाहनांची परस्पर विक्री करणारी टोळी जेरबंद
‘सकाळच्या भोंग्याला सुसंवाद शिकवा तरच राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल!’
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती!
गेल्या तीन वर्षांत रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने कायम युरोपियन राष्ट्रांसह रशियाच्या विरोधातच मतदान केले होते. यंदा मात्र अमेरिकेने आपली भूमिका बदलत रशियाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रणनीतीमधील हा बदल जगासमोर आला असून रशियाशी वाढलेली जवळीकही दिसून आली आहे.