दिल्ली निवडणुका पार पडल्यानंतर आता दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. मंगळवारी दिल्ली विधानसभेची सुरुवात गदारोळाने झाली. उपराज्यपाल व्ही के सक्सेना हे सभागृहात भाषण करत असताना आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी कठोर पाऊल उचलत आपच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी विधानसभेतून निलंबित केले आहे.
दिल्ली विधानसभेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू असून उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचे सभागृहात भाषण सुरू असताना विरोधी पक्षाचे आमदार गोंधळ घालत होते. घोषणाबाजी केली जात असताना अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आपच्या १२ आमदारांना एक- एक करून संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले. यामध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी यांचाही समावेश आहे.
विधानसभेच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या की, “भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा कार्यालय आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. याचा निषेध असून जोपर्यंत डॉ. बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही तो पर्यंत निषेध करत राहणार.”
हे ही वाचा :
उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून एआयएडीएमके आमदाराच्या घरावर छापेमारी
पंजाबमध्ये चालला बुलडोझर; ड्रग्ज माफियाचे बेकायदेशीर बांधकाम केले जमीनदोस्त
अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द
ट्रम्प यांची पुतीन यांना साथ; संयुक्त राष्ट्रात युक्रेनविरोधात मतदान
दिल्लीमधील नवनिर्वाचित भाजपा सरकार मंगळवारी दिल्ली विधानसभेत मागील आप सरकारच्या कामगिरीवर भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांचे १४ प्रलंबित अहवाल सादर करणार आहे. आप सरकारने कॅगचा अहवाल रोखल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गेल्या गुरुवारी घोषणा केली होती की, नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनात हे अहवाल सार्वजनिक केले जातील. यानुसार ते आज सादर केले जाणार आहेत. कॅगच्या प्रलंबित अहवालात राज्याच्या आर्थिक स्थिती, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा, वाहनांचे वायू प्रदूषण, मद्य नियमन आणि दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) कामकाजाचा आढावा समाविष्ट आहे.