नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी लालू कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या एका न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव आणि मुलगी हेमा यादव यांना समन्स बजावले आहेत.
राऊस अव्हेन्यू न्यायालयाने लालू यादव यांचे धाकटे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही नवीन समन्स बजावले आणि त्यांना ११ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले. भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयच्या अंतिम आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हे समन्स जारी केले आहेत. या प्रकरणात एजन्सीने ३० सरकारी अधिकाऱ्यांसह ७८ जणांची नावे नोंदवली आहेत. ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात लालू यादव आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आधीच जामीन मिळाला आहे.
लँड फॉर जॉब्स घोटाळा २००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाच्या कारकिर्दीशी संबंधित आहे. सीबीआयचा हा खटला मध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या बदल्यात आरजेडी प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वस्त दरात जमीन हस्तांतरित करण्याशी संबंधित आहे.
हे ही वाचा :
सभागृहातील गदारोळानंतर आतिशी यांच्यासह सर्व आप आमदार निलंबित
उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून एआयएडीएमके आमदाराच्या घरावर छापेमारी
पंजाबमध्ये चालला बुलडोझर; ड्रग्ज माफियाचे बेकायदेशीर बांधकाम केले जमीनदोस्त
अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द
या प्रकरणी सीबीआयने मे २०२२ मध्ये लालू प्रसाद यादव, त्यांची मुले आणि मुली आणि पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून, न्यायालयात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाविरुद्ध जमीन नोकरी घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि सीबीआय चौकशी करत आहे.