राज्यासह देशभरात बांगलादेशी रोहिंग्यांची वाढती संख्या हा मुद्दा चिंतेचा बनला असून याविरोधात कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे बांगलादेशी नागरिकांवरील होत असलेल्या कारवायांना वेग आला आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने हे बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची बाब उघडकीस येत आहे. अशातच पोलिसांनी सोलापूरमधील बार्शी येथे सहा बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूरमधील बार्शी येथील पंकजनगर भागात बेकायदेशीररित्या बनावट आधार कार्ड तयार करून राहणार्या सहा बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार ६०० रुपये आणि ४६ हजारांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत महिला पोलीस निरीक्षक सोनम जगताप यांनी घुसखोरी आणि बनावट दस्तऐवज याच्या वापरासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दहशतवाद विरोधी पथक, एटीबी पथक आणि बार्शी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीत त्यांच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नजमा यासिन शेख (वय ३३ वर्षे), रेहना बेगम समद शिकदर (वय ३३ वर्षे), आरजिना खातून अनवर शेख (वय १६ वर्षे), शिखा शकीब बुहिया (वय २३ वर्षे), शकीब बादशाह बुहिया (वय २३ वर्षे), शोएब सलाम शेख (वय २४ वर्षे) या सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
युद्धविराम, ओलीस सोडण्याच्या कराराला इस्रायल सरकारकडून हिरवा कंदील
आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात हिंदू संघटनेला स्टॉल नाकारणाऱ्या आयोजकांना न्यायालयाने फटकारले
भारतीय महिला उपांत्य फेरीत; दक्षिण आफ्रिकेशी लढत
रशियन सैन्यात लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू, १६ बेपत्ता!
मुंबईमधून १५ दिवसांत ११२ बांगलादेशी नागरिकांना अटक
दरम्यान, मागील १५ दिवसांत एकट्या मुंबईमधून जवळपास ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई गुन्हे शाखेने मागील १५ दिवसांमध्ये मुंबईतील विविध भागातून जवळपास ११२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये ८६ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईत मागील तीन वर्षात जवळपास ३७८ बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली होती, मागील तीन वर्षांच्या तुलनेत २०२५ च्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केलेली कारवाई ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.