इस्रायल आणि हमास यांच्यातील १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध अखेर शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इस्रायल सरकारने हमासबरोबर युद्धविराम आणि ओलीस सोडण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. २४-८ अशा मतांच्या फरकाने कॅबिनेटने या कराराला मंजुरी दिली आहे. हा करार रविवारपासून लागू होणार आहे. शनिवारी पहाटे या कराराला हिरवा कंदील दाखवण्यात आला. हा करार लागू होताच गाझामधील युद्धविरामाचा पहिला टप्पा सुरू होईल आणि दोन्ही बाजूंनी ओलिसांची टप्प्याटप्प्यात सुटका केली जाईल.
इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या करारामुळे रविवारी गाझामधून पहिला ओलीस परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामधील बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला आहे. या संघर्षात ४६,००० हजारहून अधिक लोकांनी आपला प्राण गमावला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २.३ दशलक्ष लोकसंख्येपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहेत.
तीन टप्प्यातील कराराच्या सहा आठवड्यांच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हमास ३३ इस्रायली ओलिसांची सुटका करेल यात महिला, मुले आणि ५० पेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचा समावेश असेल. इस्रायलही पहिल्या टप्प्याच्या अखेरीस इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या सर्व पॅलेस्टिनी महिला आणि १९ वर्षाखालील मुलांना सोडणार आहे. इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने शुक्रवारी पहिल्या एक्सचेंजमध्ये सोडल्या जाणाऱ्या ९५ पॅलेस्टिनी कैद्यांची यादी जाहीर केली आहे. पहिला टप्पा जसजसा पुढे जाईल, तसतसे उर्वरित ओलीसांची सुटका, युद्ध संपवणे आणि गाझाच्या भविष्यातील पुनर्बांधणीवर चर्चा होईल. पण, उर्वरित ओलिसांच्या कुटुंबियांना भीती आहे की, दुसरा टप्पा कधीच होणार नाही आणि त्यांचे प्रियजन दहशतवाद्यांच्या तावडीतचं राहू शकतात.
हे ही वाचा:
बांगलादेशी, रोहींग्याना अनधिकृत जन्मतारखेचे दाखले, सोमय्यानी केली तक्रार!
रशियन सैन्यात लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू, १६ बेपत्ता!
महाकुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धा’ संबोधणारे पोस्टर्स, साहित्य नागा साधूंनी केले उद्ध्वस्त
एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?
इस्त्रायल आणि हमासकडून वाटाघाटी करणाऱ्या प्रतिनिधींनी अंतिम अडथळे दूर केल्यानंतर शुक्रवारी पहाटे दोहा येथे करारावर स्वाक्षरी करण्यात आली. वाटाघाटीमध्ये मध्यस्थी करणारे अमेरिका आणि कतार या दोघांनी जाहीर केले की गाझामधील १५ महिन्यांपासून सुरू झालेले युद्ध संपवण्यासाठी करार झाला आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३, रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि यात १२०० हून अधिक नागरिक मारले गेले आणि २५० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले गेले, त्यापैकी सुमारे १०० अजूनही बंदिवासात आहेत. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या युनिट्सला लक्ष्य करत जोरदार प्रतिहल्ला सुरू केला आणि युद्धाला तोंड फुटले.