बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी खळबळजनक आरोप करत म्हटलं आहे की, त्यांना आणि त्यांच्या धाकट्या बहिणीला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. शेख हसीना या सत्तेतून पायउतार होताचं त्यांना आणि त्यांच्या धाकट्या बहिण शेख रेहाना यांना मारण्याची योजना आखण्यात आली होती, असं शेख हसीना यांनी म्हटले आहे.
शेख हसीना यांनी शुक्रवारी त्यांच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या ऑडिओ भाषणात याबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, “रेहाना आणि मी केवळ २० ते २५ मिनिटांच्या अंतराने मृत्यूपासून वाचलो आहोत.” गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या पायउतार झाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या निदर्शनांमध्ये संघर्षामध्ये ६०० हून अधिक लोक मारले गेले. तर, ७६ वर्षीय हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. दुसरीकडे बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले.
हसीन शेख यांनी वेगवेगळ्या वेळी त्यांच्या हत्येचे कट रचले गेल्याची आठवण सांगितली. “२१ ऑगस्ट रोजीचा ग्रेनेड हल्ला, कोटालीपारा येथील बॉम्बस्फोट आणि आताची घटना यातून सुखरूप वाचणे म्हणजे ही अल्लाची इच्छा आहे. नाहीतर, मी जगलेच नसते,” असं हसीना यांनी म्हटले आहे. मी अजूनही जिवंत आहे, कारण अल्लाची इच्छा आहे की मी आणखी काहीतरी करावे, असेही त्या म्हणाल्या. “मला त्रास होत असला तरी, मी माझ्या देशाशिवाय, माझ्या घराशिवाय आहे. सर्व काही जळून गेले आहे,” असे त्या भावनिक होत म्हणाल्या.
हे ही वाचा:
युद्धविराम, ओलीस सोडण्याच्या कराराला इस्रायल सरकारकडून हिरवा कंदील
आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात हिंदू संघटनेला स्टॉल नाकारणाऱ्या आयोजकांना न्यायालयाने फटकारले
भारतीय महिला उपांत्य फेरीत; दक्षिण आफ्रिकेशी लढत
बांगलादेशी, रोहींग्याना अनधिकृत जन्मतारखेचे दाखले, सोमय्यानी केली तक्रार!
शेख हसीना यांना खूप सुरक्षा पुरवली जात होती, कारण त्या अनेक हत्येच्या कटातून सुखरूप बचावल्या होत्या. २००४ चा ढाका ग्रेनेड हल्ला २१ ऑगस्ट २००४ रोजी बंगबंधू एव्हेन्यूवर अवामी लीगने आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी रॅलीवर झाला होता. या हल्ल्यात २४ ठार आणि ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना यांनी २०,००० लोकांच्या जमावाला संबोधित केल्यानंतर संध्याकाळी ५.२२ वाजता हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात हसीनाही काही जखमी झाल्या होत्या. पुढे कोटालीपारा येथील बॉम्बस्फोट हा शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक कट होता. २१ जुलै २००० रोजी ७६ किलोचा बॉम्ब जप्त करण्यात आला आणि दोन दिवसांनंतर कोटालीपारा येथील शेख लुत्फोर रहमान आयडियल कॉलेजमध्ये ४० किलोचा बॉम्ब जप्त करण्यात आला, जिथे अवामी लीगच्या अध्यक्षा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना रॅलीला संबोधित करणार होत्या.