विलेपार्ले पूर्वेतील साठ्ये कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने कॉलेज इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला आहे. संध्या पाठक असे विद्यार्थीनीचे नाव आहे.
नालासोपारा येथे राहणारी संध्या पाठक ही विद्यार्थिनी विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसर्या वर्गात शिकत होती. गुरूवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास तिने तिसर्या मजल्यावरून खाली उडी मारली. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला महाविद्यालयाच्या कर्मचार्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले.
संध्याचा वर्ग तळ मजल्यावर आहे. ती वर्गात न येता वर कशी गेली ते आम्हाला माहित नाही, असे कॉलेजच्या कर्मचार्यांनी सांगितले. ज्यावेळी ती पडल्याचा आवाज आला तेव्हा आम्हाला समजले आणि आम्ही तिला बाबासाहेब गावडे चैरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात नेले होते. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला असे कर्मचार्यांनी सांगितले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नेमके काय झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीला आम्ही पूर्ण पणे सहकार्य करत आहोत, असे साठ्ये कॉलेजचे प्राचार्य माधव राजवाडे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
लवकरच इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल!
मागच्या दाराने आलेले, शून्य जनाधार असलेले, राऊत…
तेजस्वी यादव बिहारला जंगलराजाकडे नेऊ इच्छितात
हसन यांना योगामध्येही हिंदू-मुस्लिम दिसते
प्रथमदर्शनी संध्याने आत्महत्या केल्याचे आढळून आल्याचे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूचा (एडीआर)दाखल केला आहे. कॉलेजच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या वर्गातील मित्र मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. संध्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
संध्या नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड येथे कुटूंबियासह रहात होती. तिला एक लहान बहिण असून वडील खासगी कंपनीत काम करतात. मागील ३ वर्षांपासून ती साठ्ये महाविद्यालयात शिक्षण घेत होती. संध्याच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसून या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
