अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना १८ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी दिली. त्यांच्यासोबत शाही खाना घेतला. हा सन्मान मिळालेले ते पाकिस्तानचे दुसरे लष्करी अधिकारी आहेत. यापूर्वी जनरल मुशर्रफ यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबत भोजन केले होते. एका पराभूत देशाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याला ट्रम्प यांनी हा सन्मान का दिला? या सन्मानाची किंमत काय होती? ट्रम्प यांच्यासोबत जेवण करायचे असेल तर त्याची किती किंमत असते ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतील. त्यांचे उत्तर कदाचित रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी देऊ शकतील.
एका बाजूला इस्त्रायल इराणवर तुटून पडला आहे. फोर्डोव्हसह इराणच्या सगळ्या आण्विक आस्थापना उद्ध्वस्त करण्यात इस्त्रायलला यश आलेले आहे. अमेरिकेचा इस्त्रायला उघड पाठींबा आहे. हा देश इस्त्रायला सर्वतोपरी मदत करत आहे. या घडामोडी घडत असताना पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर अमेरिकेत दाखल होतात. ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटतात. ‘मुनीर यांना भेटणे हा सन्मान आहे, असे उद्गार ट्रम्प काढतात’. हे सगळे चमत्कारीक आहे, असे वाटत असले तरी हा निव्वळ व्यवहार आहे.
अमेरिकेला इराणमध्ये खांदेपालट करायचा आहे. इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी यांचा काटा काढल्याशिवाय हे शक्य नाही. मुनीर अमेरिकेत येतात, ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर अमेरिकी लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना भेटतात, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करतात, ही बाब स्पष्ट करते की डील झालेले आहे. खोमेनी यांचा गेम करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला संपूर्ण मदतीचे आश्वास दिलेले आहे, असे मानायला वाव आहे. हे उघडपणे सांगणे पाकिस्तानला परवडणार नाही. कारण एकदा एका इस्लामी राष्ट्राच्या विरोधात अमेरिकेची मदत केली, हे स्पष्ट झाले की पुढे इस्लामी उम्माचे ढोल बडवणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. इराकमध्ये सद्दाम हुसेन यांची सत्ता उखडून टाकताना पाकिस्तानने अमेरिकेची भरभरून मदत केली होती. परंतु पाकिस्तानी नेते खंजीर छातीत खुपसत नाहीत, पाठीत खुपसतात. समोरून हत्यार चालवण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. पाठीत खंजीर खुपसण्यासाठी कपटी वृत्ती पुरेशी ठरते.
अमेरिका भेटीवर असलेले मुनीर वाशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात इराणला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे सांगतात. त्याच कार्यक्रमात हा तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतूकही करतात. दोन दगडांवर पाय ठेवण्याची ही पाकिस्तानी नीती आहे. पाकिस्तानी नेते आणि लष्करशहांची विदेशातील स्वीस बँकेतील खाती उगाचच तुडुंब भरलेली नसतात. ‘दोन अण्वस्त्र सज्ज देशांतील संघर्ष थांबवल्याबद्दल ट्रम्प यांना शांततेचे नोबल मिळावे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जगभरातील दहशतवादाचे केंद्र स्थान असलेल्या पाकिस्तानचा ल्षकर प्रमुख शांततेचे नोबेल कोणाला द्यावे, याची शिफारस करतो आहे. यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकेल? ट्रम्प यांना जेव्हा मुनीर यांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी प्रश्न केला, तेव्हा ट्रम्प नि:संदिग्धपणे म्हणाले की, ‘इराणबद्दल पाकिस्तानला जगातील अन्य देशांपेक्षा जास्त माहिती आहे’. मुनीर यांच्यासोबत इराणबाबत सविस्तर चर्चा केली असून आपल्या भूमिकेशी मुनीर सहमत असल्याचे ते म्हणाले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसिफ मुनीर हे दोघेही स्मार्ट आहेत. दोघांनी युद्ध थांबवले.
अमेरिकेची ट्रेड डीलबाबत भारताशी बोलणी सुरू आहेत. मुनीर यांनी युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली म्हणून मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते, त्याचसाठी त्यांना व्हाईट हाऊसने निमंत्रण दिले‘, असे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प वाट्टेल ते बोलत असले तरी मुनीर यांच्या गाठीभेटी पाहाता ते अमेरिकेत कशासाठी गेले असतील याचा अंदाज येऊ शकतो. सेक्रेटरी ऑफ स्टेट एन्थनी ब्लिंकन, सेक्रटरी ऑफ डिफेन्स लॉय्ड ऑस्टीन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो, सेण्ट्रल कमांडचे जनरल मायकल कुरीला यांची गाठभेट घेतली. इराणचा विषय अमेरिकेच्या सेण्ट्रल कमांडच्या अंतर्गतच येतो. सगळ्या गाठीभेटी इराणकडे बोट दाखवतायत. इस्त्रायल-इराण संघर्षात ट्रम्प तणाव कमी करतायत असा दावा मुनीर करतायत. जनरल मायकल कुरीला यांची भेट तणाव कमी करण्यासाठी झाली की इराणचा काटा काढण्यासाठी, हा प्रश्न फार जटील नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू सांगतायत खोमेनी अंत झाल्यावरच हा संघर्ष थांबेल.
ट्रम्प म्हणालेत की खोमेनी यांनी बिनशर्त शरणागती पत्करावी. शरणागती पत्करल्यावर अमेरिका खोमेनी यांचे काय करेल? इराकचा नेता सद्दाम हुसेन आणि लिबीयाचा नेता मुअम्मर गद्दाफीचे अमेरिकेच्या कृपेने काय झाले होते, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. भटक्या कुत्र्यांना मारावे तसे या दोघांना संपवण्यात आले. सद्दामला फासावर लटकवले. गद्दाफीला बंडखोरांच्या सरकारने गोळ्या घातल्या. या मागे अमेरिका होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अमेरिका बंडखोरांना जिवंत ठेवत नाही. खोमेनीचे मुंडके हीच ट्रम्प यांच्या शाही खान्याची किंमत आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ति. अशा लोकांसोबत भोजनाची किंमत असते.
हे ही वाचा:
साठ्ये कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, घातपात असल्याचा दावा
२० जून : ईराणच्या इतिहासातील ‘वेदनादायक’ दिवस
ओसामा विसरलात का?” शशी थरूर यांचा डोनाल्ड ट्रम्पना टोमणा
तेजस्वी यादव बिहारला जंगलराजाकडे नेऊ इच्छितात
१४ मे रोजी राजधानी दोहामध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी एका शाही खान्याचे आयोजन केले होते. जगातील भव्य इमारतीपैकी एक अशा ल्यूसैल पॅलेसमध्ये हा शाही खाना आयोजित करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या भोजनावळीत प्रमुख निमंत्रित होते. जगातील मोजक्या प्रभावी व्यक्ति या भोजनावळीत आल्या होत्या. टेस्लाचे एलॉन मस्क, बोईंगचे सीईओ केली ऑर्टबर्ग, ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वार्झमन, न्यूजमॅक्सचे संस्थापक ख्रिस रुडी आणि भारताचे प्रमुख उद्योगपती, रिलायसन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीती अंबानी या शाही खान्यासाठी उपस्थित होत्या. म्हणजे उद्योग जगातील सगळ्यात चमकदार तारे इथे एकवटलेले.
अंबानी यांनी या कार्यक्रमात ट्रम्प ऑर्गनायझेशनला १० दशलक्ष डॉलर्सची डेव्हलपमेट फी दिली होती. ही फी ट्रम्प यांचा ब्रॅड वापरण्यासाठी दिली जाते. याची आठवण करून देण्याचे कारण एवढेच की, ट्रम्प यांच्यासोबत भोजन करणे ही काही फार दुर्लभ बाब नाही. ज्यांची किंमत मोजण्याची तयारी असते, त्यांना त्यांच्या पंक्तिचा लाभ मिळतो. मुनीर यांनीही ती किंमत मोजली आहे. ती किंमत आहे, खोमेनी यांच्या जीविताची. अमेरिकी लष्कर आखातातील अनेक देशांमध्ये आहे. सौदी अरेबिया, यूएई, ओमान आदी. या तळांचा इराणच्या विरोधात वापर कऱणे अमेरिकेला सोयीचे आहे. परंतु यापैकी एकही देश उपाशी आणि भिकेला लागलेला नाही. हे सगळे श्रीमंत देश आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एखादे विमान सहज भेट देऊ शकतील इतके श्रीमंत. त्यामुळे हे अमेरिकेला सहजासहजी मदत करतील याची शक्यता कमी. त्यापेक्षा पाकिस्तानी नेत्यांसमोर एखादे डॉलरचे पोते भिरकावले, तर ते ट्रम्प यांचे बुट चाटतील, त्यांना खांद्यावर घेऊन नाचतील. इराणसाठी आपली जमीन, विमानतळ, हवाईक्षेत्र, आयएसआयकडे असलेला माहितीचा खजिना सगळेच देतील. म्हणून पाकिस्तान ही अमेरिकेची राईट चॉईस आहे. बेचिराख इराणवर अखेरची मुठमाती टाकण्यासाठीच मुनीर यांची अमेरिका भेट झालेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
