भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात तुर्कीने पाकिस्तानची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुर्कीविरुद्ध भारतातून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता चुकीची माहिती शेअर केल्याबद्दल आणि पसरवल्याबद्दल भारताने बुधवार, १४ मे रोजी तुर्कीच्या सार्वजनिक प्रसारक, TRT World चे एक्स हँडल ब्लॉक केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरमधून चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे यात मोठे नुकसान झाले असून भारताच्या लष्करी प्रतिसादादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिल्याचे समोर आले. पाकिस्तानने तुर्कीचे ड्रोन वापरून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने हे सर्व हल्ले हाणून पाडले. तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निरीक्षण केल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, TRT वर्ल्डची वेबसाइट आणि इंस्टाग्राम अकाउंट अजूनही उपलब्ध असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा..
छोट्या ड्रोनना शोधून टिपणारे ‘भार्गवस्त्र’ भारताच्या भात्यात
मराठमोळ्या सरन्यायाधीशांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
पाकिस्तान समर्थनात पोस्ट करणाऱ्याला देशभक्तीचा धडा
यापूर्वी चीनच्या ग्लोबल टाइम्सचे देखील अकाउंट देखील भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. भारत विरोधी माहिती पसरवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी मीडिया आणि काही सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला होता की भारतीय हवाई दलाचे राफेल विमान बहावलपूरजवळ पाडण्यात आले. ग्लोबल टाईम्सवर हे खोटे दावे पसरवण्याचा आणि ठळकपणे प्रकाशित करण्याचा आरोप आहे. ग्लोबल टाइम्सने पाकिस्तानी लष्करी सूत्रांचा हवाला देऊन भारतीय हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने एक भारतीय लढाऊ विमान पाडल्याचा दावा करणारा अहवाल प्रकाशित केला होता. यानंतर भारताने माहिती तपासून घेण्याचा इशारा त्यांना दिला होता. अखेर कठोर पाऊल उचलत त्यांचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले.
