महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची एक वेगळी छाप आहे. मात्र त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच चर्चा असते. ते एकाच भूमिकेवर ठाम नसतात असा वारंवार दावा केला जातो. त्यावरूनच झी २४ तास वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.
ते या मुलाखतीत म्हणाले की, राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो. राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल नाही मिळेल हे सांगता येत नाही. लोकसभेत ते आमच्यासोबत होते. विधानसभेत ते आमच्यासोबत होते की नव्हते ते माहिती नाही. पालिका निवडणुकीत काय होईल माहिती नाही. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्त जागा लढाव्या हे सर्वांना वाटतं. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही.
महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत, त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही शंकर, एहसान लॉय आहोत. त्यांच्याप्रमाणे आमचंही त्रिकूट आहे. आमच्याकडेही कोणीतरी शास्त्रीय संगीत आळवत, गिटार वाजवत. कोणीतरी वेगळा सूर आळवत पण आमची स्टाइल तशीच आहे. यात ड्रमर कोण आहे, हे कधीच कोणाला कळणार नाही. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हे भावनिक असतात. त्यांच्याकडे संवेदनशिलता अधिक असते. अजितदादा राजकारणात अतिशय प्रॅक्टीकल आहेत. भावनेत न अडकता निर्णय घ्यायचा असं त्यांना वाटतं. दोघांसोबतही डील करणं सोपं जातं. म्हणूनच आम्ही शंकर एहसान लॉय आहोत, असे फडणवीस म्हणाले. तिन्ही पक्षाच्या खात्यांनी चांगले काम केलंय. तीन लोकाचं सरकार नॅचरल डिलीव्हर होऊ शकत नाही. जिथे एकमत होत नाही ते आम्ही स्थगित ठेवतो. तोडगा कसा काढायचा हे सांगता आलं असतं तर तोडगा काढूनच आलो असतो. तोडगा निघेल असं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं, पण महिना कोणता असेल हे सांगितलं नव्हतं, अशी टिप्पणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
हे ही वाचा:
छोट्या ड्रोनना शोधून टिपणारे ‘भार्गवस्त्र’ भारताच्या भात्यात
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे जनाजे निघताहेत
उपराष्ट्रपतींचा १५ मे रोजी राजस्थान दौरा
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर एअर मार्शल ए. के. भारती यांचे कुटुंबीय काय म्हणाले?
महायुती सरकारने विविध विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता नंतर त्याचे रिपोर्ट कार्डही तयार करण्यात आले. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता. ज्यात स्वच्छता, नामफलक लावायचं होतं, प्रलंबित कामे पूर्ण करायची होती. सर्व कार्यालयांनी अतिशय योग्य रितीने हे काम पार पाडलं. एकूण ९०० सुधारणा करायच्या होत्या. त्यातील ७६८ म्हणजे ८० टक्के कामे आम्ही केली. यासाठी एक संस्था नेमून त्याचे मुल्यमापन केले. एखादा अपवाद वगळता सर्वजण त्यात पास झाले. सरकारच्या कामासाठी नागरिकाला कार्यालयात जायची गरज लागू नये. सर्व कामे मोबाईलवर होतील. यातील ६० टक्के काम आम्ही केलंय. आता ४०टक्के काम राहिलं आहे.
पालिका निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले की, आम्ही मुंबई महायुती म्हणूनच लढणार. शंभर टक्के महायुती येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल.
व्यक्तिगत प्रश्नावरही मुख्यमंत्री दिलखुलास बोलले.ते म्हणाले की, मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागलेली असते. तेव्हा मी चिडचिड करतो. कोणत्याही परिस्थितीचा मी सामना करु शकतो. मला राग आलाय समजलं की खायला आणून द्या. ५ मिनिटांत माझा राग निघून जाईल.
