हाजी अली येथील लोटस जेटी परिसरात शनिवारी सायंकाळी एक दुःखद घटना घडली. अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण समुद्रात बुडून मृत्युमुखी पडले, तर एकाची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता घडली.ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेत मृत झालेल्यांची नावे संतोष विश्वेश्वर (५१) आणि कुणाल कोकाटे (४५) अशी आहेत. संजय सरवणकर (५८) यांची सुखरूप सुटका झाली असून, ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे तिघेही लोअर परळ डिलाईल रोडचे रहिवासी असून, संतोष विश्वेश्वर यांच्या आईच्या निधनानंतर अस्थी विसर्जनासाठी ते हाजी अली येथे गेले होते.
हे ही वाचा:
शुभांशु, तुमचा प्रवास हा नव्या युगाची सुरुवात!
ट्रेड डील…डेटावरून भारत अमेरिकेला भिडला!
“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?
RAW च्या प्रमुखपदी आयपीएस पराग जैन!
पोलिसांच्या माहितीनुसार, समुद्र खवळलेला असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी या तिघांना पाण्यात जाण्यापासून प्रतिबंध केला होता. मात्र, त्यांनी तो सल्ला दुर्लक्षित करून समुद्रात प्रवेश केला. प्रथम संतोष विश्वेश्वर पाण्यात उतरले. ते बुडू लागल्यावर कुणाल कोकाटे त्यांना वाचवण्यासाठी गेले, पण त्यांनाही लाटा घेऊन गेल्या. शेवटी संजय सरवणकर दोघांना वाचवण्यासाठी गेले, पण ते देखील अडचणीत आले.
स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि तिघांनाही बाहेर काढले. त्यांना तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. संजय सरवणकर सध्या उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निलीमा कुलकर्णी यांनी सांगितले की, “घटनास्थळी सतत सूचना दिल्या जात होत्या, मात्र त्या दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.” पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) घेतली असून, यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, धार्मिक विधी करताना विशेषतः जलाशयांजवळ सुरक्षा सुचनांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना टाळता येतील.
