राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आणखी दोघांना सोलापूर आणि पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या दक्षिण सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे.
दिगंबर दळवे (३०) रा. मोहोळ तालुका, सोलापूर आणि अविनाश बापू पुकाळे (३०) रा. सांगोला तालुका, सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना सोलापूर आणि पुणे येथून अटक करण्यात आली असून त्यांना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांच्या विरोधात “राजकरण महाराष्ट्राचे” नावाच्या फेसबुक पेजवर अश्लील प्रतिमा आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आलेल्या होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पोस्ट जाणूनबुजून आणि वारंवार केल्या गेल्या होत्या, ज्यामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्टवर विविध कमेंट केल्या होत्या. या प्रकरणी महिला आयोगाच्या एका कर्मचाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.
हे ही वाचा:
पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…
ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी
पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अहमदनगर येथून दत्तात्रय शिंदे (३८) याला वादग्रस्त पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्तींना नोटिसाही बजावण्यात आलेल्या आहेत. बुधवारी आकाश दिगंबर दळवे (३०)आणि अविनाश बापू पुकाळे (३०) यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. दळवेला सोलापूर येथे अटक करण्यात आली, तर पुकाळेला उरळी कांचन, पुणे येथुन अटक करण्यात आली आहे.
दोघांनाही गिरगाव येथील महानगर न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणासंदर्भात एक डझनहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणि सात जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.