सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या दरम्यान अगदीच अलिकडे संरक्षण करार झाला. क्राऊन प्रिन्स मोहमद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत रियाधमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये या कराराची घोषणा करण्यात आली. त्याच रियाधमध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान याने बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ही चुकूनमाकून झाली? की ठरवून झाली? रियाधला रवाना होण्या आधी सलमान आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटला होता का? हा तपशील उघड झालेला नाही. परंतु जे घडले त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
बॉलिवूडचे नायक पडद्यावर देशभक्त पोलिसाची किंवा जवानाची भूमिका बजावत असले तरी त्यांचे कारनामे पडद्यावरील प्रतिमेसारखे क्वचितच असतात. अनेकांची प्रतिमा बऱ्यापैकी पाकिस्तान धार्जिणी आहे. एके काळी हाजी मस्तान आणि त्याच्या नंतर माफीया दाऊदची बॉलिवूडवर पकड होती. सिनेमाचे कास्टींग दाऊदच्या सूचनेवरून व्हायचे. दाऊदचा पैसा बॉलिवूडच्या लॉण्ड्रीत धुवून पांढरा शुभ्र केला जायचा. अनेक तारे सितारे आणि तारका दुबईत दाऊदच्या पार्ट्यांची शोभा वाढवायचे. दाऊद कनेक्शनबाबत ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्यात सलमान खान याचे नाव आघाडीवर होते. बॉलिवूडमधील अवघी खानावळ पाकिस्तानच्या प्रेमात होती. दाऊदची ही पकड आता बरीच कमी झालेली आहे. हे सलमान खान याने रियाधमध्ये केलेल्या विधानावरून बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहे. हे विधान मोठी खळबळ निर्माण करते आहे.
सौदीमध्ये बॉलिवूडच्या ताऱ्यांची ये जा बरीच असते. राजघराण्यातील लोकांशी त्यांची जवळीक आहे. तिच बाब सौदीतील व्यावसायिकांबाबत म्हणता येईल. रियाधमध्ये सलमान, शाहरुख आणि आमीर खान यांना १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जॉय फोरम या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. या कार्यक्रमात बोलताना सलमानने पाकिस्तानच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले आहे.
तो म्हणाला, ‘तुम्ही हिंदी फिल्म बनवा आणि ती सौदीमध्ये रिलीज करा, सिनेमा सुपरहीट होतो. तामिळ, तेलगू, मल्याळी सिनेमा बनवा तो इथे कोट्यवधीचा बिझनेस करतो. कारण इथे बऱ्याच देशांतील लोक इथे येऊन काम करतात. इथे कामधंद्यासाठी बलोचिस्तानचे लोक येतात, अफगाणिस्तानचे लोक येतात, पाकिस्तानचे लोक येतात.’
सलमानच्या या विधानाला बलोच आंदोलनातील कार्यकर्त्यांनी उचलून धरले. सलमानच्या विधानाचे कौतूक केले. सलमान हा पठाण म्हणजेच पुश्तू आहे. त्याचे पणजोबा अन्वर खान हे अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरीत झाले होते. त्यांनी ब्रिटीश फौजेत चाकरी केली होती. ते अलकोझाई पश्तू होते.
पाकिस्तानापासून वेगळे होण्यासाठी बलोचिस्तानमध्ये जे आंदोलन सुरू आहे, त्याचे सगळ्या मोठे कारण म्हणजे पाकिस्तानी फौजेकडून बलोच लोकांवर होणारे अत्याचार. हे बलोच बहुसंख्येन पश्तू आहेत. पाक-अफगाण सीमेवर पाकिस्तानचा जो खैबर पख्तुनख्वा नावाचा प्रांत पेटलेला आहे. तोही पश्तू बहुल आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ले जिथे होतात, त्या बहुतेक पश्तू वस्त्या आहेत.
हे ही वाचा:
हर्ष राऊतची दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
लोकपाल कार्यालयाला हव्यात प्रत्येकी ६० लाखांच्या सात बीएमडब्ल्यू
राहुल गांधींना आम्ही गंभीरतेने घेत नाही
हिंदी सिनेमातील अनेक कलाकारांचे मूळ अफगाणिस्तानात आहे. सलीम खान यांचे खानदान मुळचे अफगाणिस्तानातील. फिरोज खान, संजय खान हे अफगाणिस्तानातील गजनी येथील. शोलेमध्ये गब्बर सिंहची भूमिका साकारणारा अमजद खान हा पेशावरचा असला तरी तो पश्तू होता. कथा-पटकथा लेखक, अभिनेता कादर खान हा कंदहारमधला. आमीर खानचे पूर्वज अफगाणिस्तानातील हेरातमधील आहेत.
सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला पंगा, बलोचिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सलमान खानमधला पठाण जागा झाला की काय, हे कळायला मार्ग नाही. त्याच्या विधानामुळे बलोचांमध्ये आनंदाचे भरते आले आहे, हे मात्र निश्चित.
अमेरिकेसारख्या देशाने गेली अनेक दशके सिनेमा ही त्यांची सॉफ्ट पॉवर बनवली आहे. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर वगळता अमेरिकेचा सहभाग नाममात्र होता. तरीही अमेरिका आज जगाला लष्करी महासत्ता वाटते, त्याचे एक कारण हॉलिवुडचे सिनेमेही आहे. अमेरिकेची तथाकथित लष्करी ताकद, अमेरिकेचा जगावर असलेला प्रभाव, तंत्रज्ञान सामर्थ्य जगाला दाखवण्यासाठी अमेरिकेने हॉलिवूडचा पुरेपुर वापर करून घेतला. अमेरिकेने व्हीएतनाममध्य मार खाल्ला, अफगाणिस्तानमध्ये ते जिंकू शकले नाहीत.
भारताने हे धोरण म्हणून कधी केले नाही, परंतु हिंदी सिनेमातील गाण्यांनी जगाला वेड लावले आहे. राज कपूर, मिथून चक्रवर्ती यांच्या सारखे नायक रशियामध्ये प्रचंड लोकप्रिय होते. सगळ्या खानावळीचा ओमान, यूएई, सौदी अरेबिया आदी मुस्लीम देशांमध्ये प्रभाव आहे. अमिताभ बच्चन सगळ्या जगात लोकप्रिय आहे. रजनीकांत, चिरंजीवी, प्रभास, राम चरण, विजय या दक्षिणेतील नायकांचे चाहते सगळ्या जगात आहेत. या सिनेमांची आणि सिनेनायकांची लोकप्रियता भारताची सॉफ्ट पॉवर वाढवण्याचे काम करते आहे.
या सॉफ्ट पॉवरचा वापर कसा होऊ शकतो याची झलक म्हणजे सलमान खानने रियाधमध्ये केलेले विधान. या विधानाने बलोच लोकांचे मन जिंकलेले आहे. सलमानने पाकिस्तानी चाहत्यांचे मन राखण्यासाठी या विधानावरून पलटी मारून पायावर कुऱ्हाड मारू नये ही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







