31 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरसंपादकीयट्रम्प यांची जिनपिंग यांच्या नाकात काडी; सातवे आरमार तैवानला खेटले

ट्रम्प यांची जिनपिंग यांच्या नाकात काडी; सातवे आरमार तैवानला खेटले

Google News Follow

Related

इराण प्रकरणी तडजोड होण्याची शक्यता तुर्तास मावळली आहे. अमेरिकेकडून इराणी जहाजांची नाकाबंदी सुरू आहे, तोपर्यंत वाटाघाटी नाही, असा पवित्रा इराणच्या नेतृत्वाने घेतला आहे. अमेरिकेने रोखलेल्या एका जहाजात असे रसायन सापडले आहे, ज्याचा वापर क्षेपणास्त्र निर्मितीसाठी होतो. चीन इराणच्या पाठीशी असल्यामुळे युद्ध लांबते आहे, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा ठाम समज झाला आहे. त्यामुळे आता थेट चीनला दमात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. २० एप्रिलपासून जपान आणि फिलिपाईन्स या देशांसोबत अमेरिकेच्या सातव्या आरमाराचा तैवान नजीक युद्धाभ्यास सुरू आहे. त्यामुळे चीनचा भडका उडाला आहे, अमेरिका आगीशी खेळत असल्याचा दावा चीनने केला आहे.

अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्स या देशांच्या नौदलाचा बालीकतान २०२६ हा युद्धाभ्यास काल पासून सुरू झाला. यंदा या युद्धाभ्यासाची व्याप्ती मोठी आहे. अमेरिकी नौदलाचे ३००० आणि जपान, फिलिपाईन्सचे १४,००० जवान यात सहभागी झालेले आहे. हा थेट चीनच्या अंगणात येऊन धमकावण्याचा प्रकार आहे. चीन याची दखल न घेणे अशक्य होते. युद्धाभ्यासामुळे चीनचे नेते भयंकर संतापले आहेत, त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत संबंधित देशांना दम भरला आहे.

‘दक्षिण चीन सुमद्राच्या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याची गरज आहे. बाह्य शक्तींच्या प्रवेशामुळे इथे फुटीरता आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होते आहे. डोळे झाकून अशा प्रकारची हातमिळवणी करणे म्हणजे आगीशी खेळण्याचा प्रकार आहे, हे संबंधितांना शेकू शकते’, असा इशारा चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त गुओ जैकून यांनी दिला आहे.  अमेरिकेचा उल्लेख बाह्यशक्ती असा करून जपान आणि फिलीपाईन्सला दटावण्याचा प्रयत्न चीनने केला आहे.

चीनचा भडका उडण्याचे कारण फक्त मोठ्या संख्येने जवानांची आणि नौदल जहाजांची उपस्थिती एवढाच नाही तर युद्धाभ्यासासाठी निवडलेले ठिकाणही चीनला झोंबले आहे. मिर्च्या लागतील याच हेतूने ही निवड केलेली दिसते. फिलिपाईन्सच्या उत्तरेला असलेल्या बातानेस बेटांवर हा युद्धाभ्यास होत असून हे ठिकाणी दक्षिण चीनी समुद्र आणि स्ट्रेट ऑफ तैवानच्या मधोमध आहे. तैवानपासून हे अंतर अवघ्या दीडशे किमी अंतरावर आहे. चीनच्या नाकावर टीच्चून अमेरिका त्यांना आव्हान देत आहे. धमकावत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

हे ठिकाण सामरीक दृष्ट्या महत्वाचे आहे. अमेरिका तैवानच्या समोर उभा ठाकलेला आहे. चीनशी अत्यंत वाईट संबंध असलेल्या जपान आणि फिलिपाईन्स या देशांच्या सोबत चीनला आव्हान देतो आहे. चीनला डीवचण्याचा हा प्रकार आहे, याची अमेरिकाला पूर्ण जाणीव आहे. किंबहुना चीनचा तिळपापड व्हावा म्हणून हे जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहे.

इराण युद्ध संपवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. चीन हा या प्रयत्नात सगळ्यात मोठा अडथळा ठरतो आहे. युद्ध चिघळणे ट्रम्प यांच्या प्रकृतीला, पक्षाला आणि सरकारला परवडणारे नाही. हे युद्ध चीनच्या मात्र पथ्यावर पडते आहे. कारण इराणकडून होर्मुझमध्ये होणारी टोल वसूली युआनमध्ये केली जात आहे. युद्धाच्या निमित्ताने अमेरिकी अर्थकारण आणि डॉलरवर जमेल तेवढे प्रहार करण्याचा चीन आणि इराणचा प्रयत्न आहे. या युद्धाच्या निमित्ताने डीडॉलरायझेशनची मोहीम अधिक ताकदीने रेटण्यात येत आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स ७५३ अंकांनी वधारला

स्वर्णकांता शर्माच करणार केजरीवाल प्रकरणाची सुनावणी

सोनं-चांदी दरात मोठी घसरण; जागतिक दबावामुळे बाजार अस्थिर

नाझीया इलाही घुसल्या लेन्सकार्टच्या शोरूममध्ये आणि…

अमेरिकेने इराणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्याच जहाजांची नाकाबंदी केली आहे, अमेरिकेने रोखलेल्या तौस्का या जहाजात सापडलेली रसायने क्षेपणासत्रांच्या निर्मितीसाठी वापरली जात असल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेले यांनी केला आहे. हे जहाज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण शिपिंग लाईन्सच्या मालकीचे आहे. ते चीनमधून निघाले होते. अमेरिका थेट चीनकडे बोट दाखवते आहे. चीन या युद्धात इराणला रसद पुरवतो आहे, इराणच्या कट्टरवादी सत्तेला मदत करतो आहे, हे नजरेआड करता येणार नाही, असे हेले म्हणाल्या आहेत.

नाकेबंदीच्या मागे इराणची रसद आणि इराणला होणारा शस्त्रांचा वा शस्त्रांच्या कच्च्या मालाचा पुरवठा रोखणे हा हेतू आहे. धातू, पाईप आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुरवठ्यावर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने पूर्णपणे बंदी आणली आहे. यापैकी कोणतीही वस्तू समुद्र मार्गे इराणपर्यंत पोहचू नये असा त्यांचा प्रय़त्न आहे. या नाकाबंदीमुळे इराणने वाटाघाटीच्या दुसऱ्या टप्प्यावर बहीष्कार घातला आहे.

इराण युद्धप्रकरणी अमेरिकी मीडिया ट्रम्प यांच्या विरोधात भरभरून लिहीतो आहे. त्यामुळे संतप्त झालेले ट्रम्प ट्रुथ सोशलवरून मीडियावर शरसंधान करीत आहेत. आम्ही युद्ध जिंकलो आहोत, परंतु दळभद्री मीडिया वेगळेच नरेटीव्ह चालवण्याचा प्रयत्न करते आहे, असा त्यांचा सूर आहे. युद्ध थांववण्याचे प्रयत्न अपयशी ठरतायत, वर मीडीया या जखमेवर मीठ चोळतो आहे, ही ट्रम्प यांची खदखद आहे.

इराणला आपण साफ वाकवले आहे. जी काही धुगधुगी शिल्लक आहे, ती चीनमुळे आहे, या कयासापर्यंत ट्रम्प पोहोचले असल्यामुळे ते आता थेट चीनला आव्हान देताना दिसत आहेत. अमेरिकेने चीनवर जो रसद पुरवण्याचा ठपका ठेवला आहे, तो चुकीचा असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण ऑपरेशन सिंदुरच्या काळात चीनने पाकिस्तानलाही अशीच मदत केली होती.

त्यामुळु अमेरिकेने जपान, फिलिपाईन्ससोबत नौदल युद्धाभ्यास केला. त्यासाठी तैवानपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बेटांची निवड केली. तैवान ही चीनची दुखरी नस आहे, हे ट्रम्प यांना ठाऊक आहे. तैवान ताब्यात घेण्यासाठी  चीनने २०२७ चा मुहूर्त ठरवला आहे. हा मुहुर्त जवळ येत असताना नौदल अभ्यासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चीनची दुखरी नस छेडण्याचा उपद्व्याप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने शक्ती प्रदर्शन केले आहे. चीनशी वाकडे असलेल्या शेजाऱ्यांना म्हणजे जपान आणि फिलिपाईन्सला सोबत घेतले आहे.

चीनला पूर्ण एकाकी पाडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. ट्रम्प टेरीफमुळे भारत आणि चीन कधी नव्हे इतके जवळ आले. दोघांच्या व्यापारातही मोठी वाढ झालेली आहे. लडाख सीमेवर उभे ठाकलेले सैन्य दोन्ही देशांनी काही महिन्यांपूर्वी मागे घेतले. चीनच्या भारतविरोधी कुरापती थांबलेल्या नसल्या तरी त्या कमी झालेल्या आहेत. हे अमेरिकेच्या हिताविरुद्ध आहे.

अमेरिका थिंक टॅंक, अमेरिकी सरकारचे वेगवेगळे विभाग दरवर्षी जागतिक परिस्थितीचा आढावा घेणारे अहवाल काढत असतात. अनेकदा त्याचा सूर राजकीय असतो. अमेरिकेचे राजकारण पुढे रेटणारा असतो. डिसेंबर २०२५ च्या पेंटेगॉनच्या अहवालात तसाच प्रय़त्न कऱण्यात आला. लडाख सीमेवर निर्माण झालेली शांतता ही चीनची तात्पुरती रणनीती असून भारताला अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी हे सूरू आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानसोबत चीनचे लष्करी संबंध घट्ट झाले असून पाकिस्तानात काही लष्करी तळ उभारण्याचाही चीनकडून प्रयत्न सुरू आहे, असा दावा करण्यात आला होता.

चीनने तात्काळ याचे उत्तर दिले. भारतासोबत असलेले मतभेद आम्ही व्यवस्थित हाताळू. दोन्ही देशांमध्ये परस्पर संवाद, सहकार्य आणि विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करू. अमेरिकेने अफवा पसरवून दोन देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचे धंदे बंद करावेत, असा खुलासा चीनकडून करण्यात आला होता. चीन काय करतो आहे, हे भारताला पुरते ठाऊक आहे. भारतात अमेरिकेच्या कुरापतीही ठाऊक आहेत. चीन पाकिस्तानची मदत उघडपणे करतो आहे, परंतु अमेरिका तरी कुठे मागे आहे. शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्या गळ्यात गळे कोण घालतो आहे, हे जगाला ठाऊक आहे. उठसुट चीनवर घसरणारे ट्रम्प १४-१५ मे रोजी बीजींगमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांचे राजकारण असे बेभरवशाचे आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा