31 C
Mumbai
Friday, February 26, 2021
घर संपादकीय निपचित प्रेतांचे ओझे, मौन जन्मदाते

निपचित प्रेतांचे ओझे, मौन जन्मदाते

Related

परळीची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील हेवन पार्क या इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवले. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायच्या वयात पूजाने जग सोडले. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्याच्या बचावासाठी राजसत्ता एकवटल्याचे चित्र दिसते आहे.

प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे पूजाने आत्महत्या केली. अवघ्या २२ व्या वर्षी तिने मृत्यूला कवटाळले. मृत्यूनंतर तिचे काही फोटो आणि ऑडीयो क्लीप व्हायरल झाल्या. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या संजय राठोड यांचे नाव समोर आले. संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार. राज्याचे वनमंत्री आहेत. त्यांचे या तरूणीशी संबंध होते अशी चर्चा आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पूजा प्रेग्नंट होती. तिचा गर्भपात करण्यात आला होता अशी माहितीही समोर आली आहे.

मुलीने मृत्यूला कवटाळल्यानंतर पूजाचे आई-वडील काहीही बोललेले नाही. त्यांची शांतता अस्वस्थ करणारी आहे. काही महिन्यांपूर्वी दिशा सालियन या तरुणीने आत्महत्या केली. तिच्या आई-वडीलांनीही अद्यापि तोंड उघडलेले नाही. मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत कोण? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसेल यावर कोण विश्वास ठेवेल?

मृत्यूने हादरलेल्या दिशाच्या पालकांना रडू फूटले नसेल? तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्याबद्दल संतापाने त्यांच्या मुखातून शिव्या-शाप निघाले नसतील? दिशाच्या जन्मदात्यांचे आक्रंदन आणि संताप समाजासमोर आले नाही. पूजाचे आई-वडीलही गप्प आहेत. तोंड उघडले तर आपण सुरक्षित राहणार नाही अशी भीती या मौनामागे आहे.

धाकटी बहीण दिया चव्हाण हीचे रक्त मात्र पूजाच्या मृत्यूमुळे खवळले. ‘माझी ताई आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती. ती वाघीण होती.’ दियाने तिचा संताप इन्स्टाग्रामवर व्यक्त केला आहे. तोंड उघडण्याची किंमत मोजावी लागेल, ही जोखीम पत्करून ती बोलली आहे.

पूजा ही तिच्या सहा बहीणीतली पाचवी. तिला भाऊ नव्हता. ती मुलासारखी घरातली कर्तव्य पार पाडायची. ती हुशार होती, ‘टीकटॉक’वर लोकप्रिय होती, देखणी होती. तिचे सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरले. जिवंतपणी तिला धीर देणारे, आत्महत्येपासून रोखणारे कोणी नव्हते. मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराला तिचे नातेवाईक हजर नव्हते.

‘तिचे आई- वडील गप्प का’, असा सवाल तिची चुलत आजी शांताबाई राठोड यांना पडला आहे. एकदा सगळ्यांना गप्प केले की तक्रार करणारे कोणी उरत नाही, तक्रार नाही म्हणून तपास बंद करणे सोपे होते. पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप गायब केला जाईल, किंवा त्यातली माहिती गायब होईल. कारण कायदा सुव्यवस्थेचा धर्मकांटा ज्या सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे त्यांच्या लेखी एका जीवाचे मोल सत्तेपेक्षा जास्त नाही. २२ वर्षाच्या पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिला न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे.

काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या प्रकरणामुळे अडचणीत आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा जोरदार बचाव केला. ‘भाजपा ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभा राहात नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडेच्या मागे ताकदीने उभा राहील’, असे विधान केले होते.

पुढे जे काही झाले ते जगाला दिसले. जिचा बलात्कार झाला तिची पोलिसांनी सलग सात तास चौकशी केली. ज्याच्यावर आरोप होता, त्याला पोलिस ठाण्याची पायरीही चढावी लागली नाही. तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीला तक्रार मागे घ्यावी लागली.

ओबीसी असल्यामुळे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून अभय मिळाले, बंजारा असल्यामुळे बंजारा नेत्यांनी ‘संजय राठोड यांची बदनामी कराल तर धडा शिकवू’ असा इशारा दिला आहे. पूजा चव्हाण ही देखील बंजारा समाजाची होती.

मुंडेप्रकरणी मार्गदर्शन घेण्यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकारी शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यायला गेले होते. कायदा सत्तेसमोर लवून मुजरा करतो असे चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.

पूजा चव्हाणप्रकरणी भाजपा नेते आक्रमक झाले. ऑडीयो क्लीप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणावर मीडियाला दिलेली प्रतिक्रीया गोलमाल आहे.

‘आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, त्यानंतर गरज असेल तर कारवाई होईल. बदनाम करून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसे होऊ नये याची काळजी घेतली जाईल.’

ही प्रतिक्रीया देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या त्या ऑडीयो क्लीप ऐकल्या असत्या तर कोण आयुष्यातून उठले आहे आणि कोणामुळे, हे त्यांच्या लक्षात आले असते.

आरोपाच्या फैरी झडत असताना संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. खरंतर त्यांना एवढी भीती बाळगण्याचे कारण नव्हते. जाणते पवार आणि अवघी राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी राहील्यामुळे धनंजय मुंडें बलात्काराच्या भानगडीतून सहीसलामत बाहेर आले. इथे तर राठोड यांचे ‘आयुष्य उद्ध्वस्त’ होणार या भीतीने खुद्द मुख्यमंत्री चिंताक्रांत आहेत.

राज्यसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत.

राजसत्ता पाठीशी असेल तर ‘कर असली तरी डर कशाला?’ अशी मानसिकता बळावते आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि धनंजय मुंडे आयुष्यातून उठण्यापासून वाचले. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांनाही कदाचित अभय मिळेल.

फोटो, ऑडीयो क्लीप असे भक्कम पुरावे असूनही साधा एफआयआर दाखल होणार नाही. काही दिवसांनी मीडियातून चर्चा बंद होईल. पूजा चव्हाणची आत्महत्या दिशा सालियनच्या आत्महत्येप्रमाणे विसरली जाईल.

परंतु ‘पेराल ते उगवेल’ हा नियतीचा  नियम आहे. नियतीच सर्व शक्तीमान आहे. तिचा न्याय राजसत्तेच्या न्यायासारखा आंधळा नसतो. तो अत्यंत निष्ठूर असतो. एक दिवस हाच न्याय दिशा सालियान आणि पूजा चव्हाणला न्याय मिळू देईल. सत्तेचे कवच सत्ता असेपर्यंतच अबाधित असते. सत्ता येत जात असतात. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणाऱ्या प्रत्येक दु:शासनाचा अंत निश्चित असतो.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,260चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
672सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा