30 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरसंपादकीयमहाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार

राज्यातील काँग्रेसचा बाजार उठवण्यासाठी या गटातील नेते लागले कामाला

Related

काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीची मागणी करणाऱ्या जी-२३ गटाने गांधी परिवाराच्या डोक्याला ताप निर्माण केला आहे. अनेक नेते सरकण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात असाच एक गट छुपेपणे कार्यरत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लोंबकळण्यामागे हा गट एक प्रमुख कारण आहे. राज्यातील काँग्रेसचा बाजार उठवण्यासाठी या गटातील नेते कामाला लागले आहेत.

अलिकडेच जी-२३ गटातील एक नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही माध्यमांना मुलाखती दिल्या. शांत आणि सयंत नेते असा लौकीक असलेल्या पृथ्वीराज यांचे जळजळीत बोल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे होते. विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी काही आमदार उशीरा पोहोचले. काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन मतदान केले. त्यांची नावं उघड झाली असली तरी पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या आमदारांच्या पक्षविरोधी कारवायांमुळे चंद्रकांत हंडोरे यांच्यासारख्या एका दलित नेत्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असा स्पष्ट आरोप चव्हाण यांनी केला.

चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील वस्तुस्थिती सांगितली. परंतु ते जे काही म्हणाले ते केवळ हिमनगाचे टोक आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ४० आमदार आहेत. परंतु यातले अनेक आमदार भाजपाकडे डोळे लावून बसलेले आहेत. एकीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले भाजपावर सातत्याने आगपाखड करतायत. बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांच्यासारखे नेते टीका करतायत असे चित्र असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मात्र चिडीचूप आहेत. चव्हाणांचे मौन अनेकांना अस्वस्थ करणारे आहे. युवक काँग्रेसचा एक नेता सुद्धा भाजपाकडे डोळे लावून बसला आहे. माजी मंत्री अस्लम शेख याने अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट आशीर्वाद घेण्यासाठीच होती, परंतु
आशीर्वाद काही मिळाला नाही.

देशभरात काँग्रेसची उरलीसुरली गढी ढासळण्याच्या मार्गावर आहे. सोनिया गांधी या पक्षाच्या नामधारी अध्यक्षा बनल्या असून राहुल गांधी हेच पक्षातील सगळे निर्णय घेतात हे आता उघड गुपित आहे. राहुल यांचे नेतृत्व काँग्रेसला तारु शकत नाही, विजयाकडे नेऊ शकत नाही ही बाब आता काँग्रसजनाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे बुडत्या नौकेतून उडी मारण्याकडे नेत्यांचा कल आहे.

काँग्रेस पक्षातील २२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी एका पायावर तयार आहेत. परंतु पक्षांतर बंदीसाठी दोन तृतीयांश आमदारांची गरज असल्यामुळे ही फुट लोंबकळली आहे. २२ च्या गटात आणखी काही नेत्यांची भर टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे असे काही नेते या जी-२२ गटाचे नेतृत्व करतायत अशी चर्चा आहे.

भाजपाचे वरीष्ठ नेते या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. हा गट काँग्रेसमधून फुटून भाजपामध्ये आला तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. राज्यातील शिवसेना-भाजपा सरकारचा पाया अधिक भक्कम होईल. परंतु हे संपूर्ण राजकारण महाराष्ट्र केंद्रीत नसून २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे घडवण्यात भाजपा नेतृत्वाला रस आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पक्षाला काही प्रमाणात फटका बसला तर त्याची भरपाई महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातून करण्याचा भाजपाचा इरादा आहे. यंदा आंध्र-तेलंगणामध्ये भाजपा चांगली कामगिरी करेल आणि तामिळनाडूमध्ये पक्ष खाते उघडेल अशी आशा आहे. परंतु महाराष्ट्रातून पक्षाला मोठी आशा आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंकडे श्रीगणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी कुणाला केला चरणस्पर्श

पुढच्या वर्षी लवकर या, दीड दिवसांच्या बाप्पाला निराेप

‘बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती वर्ष ब्लॅकमेल करणार’

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

 

महाराष्ट्रातून भाजपाला २३ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. युतीला मिळालेल्या एकूण जागा ४१ होत्या. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत निवडणुका लढवून ४५ जागांचा टप्पा गाठण्याचे लक्ष भाजपाने ठेवले आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांची कुमक त्यासाठी गरजेची आहे. नांदेड, सातारा सारख्या अनेक कठीण जागा भाजपाच्या पारड्यात येतील. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला शह देणे शक्य होईल.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा बाजार उठवण्यासाठी काँग्रेसला सोबत घेणे ही अचूक रणनीती आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला कंटाळलेला गट भाजपासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दोन तृतीयांश आमदार पक्ष सोडायला तयार झाले नाही तर प्लान बी काय असावा यावर सध्या काँग्रेसचे काही नेते खल करतायत. २०२४ चे राजकारण साधता यावे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार खोळंबला आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली तरी काही आमदारांना मंत्रिमंडळाच सामावून घ्यावे लागेल, याची जाणीव असल्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाने विस्ताराचा मुहूर्त अजून घोषित केलेला नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा