31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरसंपादकीयचांदीचे सोने होईल काय ? रॉबर्ट कियोसाकीला मुर्खात काढता येईल का?

चांदीचे सोने होईल काय ? रॉबर्ट कियोसाकीला मुर्खात काढता येईल का?

Google News Follow

Related

रिच डॅड, पुअऱ डॅड या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, रॉबर्ट कियोसाकी हे अर्थकारणावर सातत्याने भाकीते करत असतात. चांदीच्या दराबाबत त्यांची ताजी भविष्यवाणी चांगलीच गाजते आहे. चांदीचा दर प्रती औंस १०० ते ५०० डॉलरपर्यंत वाढेल या भविष्यवाणीने जगात खळबळ माजली आहे. काही लोक त्याला अक्षरश: मूर्खात काढतायत. खरेच कियोसाकीचा मेंदू निकालात निघालाय का? याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु त्या आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की, कियोसाकीची भविष्यवाणी चांदी आणि सोन्याच्या दराबाबत नसून ती अमेरिकेच्या कोसळत्या अर्थकारणाबाबत आहे. येणाऱ्या संभाव्य मंदीबाबत आहे.

चांदीचा आजचा दर प्रति औस ४८.७४ डॉलर आहे. औस म्हणजे ३१.१० ग्रॅम. भारतात चांदीचा दर दहा ग्रामला १५७ आहे. कियोसाकी याच्या म्हणण्यानुसार येत्या अल्प काळात हा दर दुप्पटी पेक्षा जास्त म्हणजे १०० डॉलर आणि त्यानंतर थेट ५०० डॉलरपर्यंत वाढणार आहे.

जगभरात चांदीला निर्माण झालेली मागणी. औद्योगिक वापरात चांदीचा वाढलेला वापर. मागणी आणि पुरवठा यातील अंतर यामुळे चांदीचे दर वाढतायत. हे सगळ्यांना ठाऊक आहे. कियोसाकीचा भर ज्या मुद्द्यावर आहे, तो हा नाही. अमेरिकेवर कर्जाचा डोंगर वाढतो आहे. हा देश डॉलरचे कागद छापून आपले अर्थकारण रेटतो आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अर्थकारण रुळावर आणण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली खरी. परंतु त्यांच्या काळात अमेरिकेचे कर्ज कमी झाले नाही, उलट ते वाढलेले आहे. डॉलरचे अवमूल्यन होत असले तरी ते झाकले जात आहे. पैशाचे हे सोंग फार टीकणार नाही. ही परीस्थिती कधी तरी अचानक हाताबाहेर जाईल. जेव्हा कडेलोट होईल, तेव्हा डॉलर कोसळेल. हे कियोसाकीचे सद्यस्थितीबाबत असलेले विश्लेषण आहे.

हे ही वाचा:

गाझा युद्धविराम चर्चा सुरू

बनावट अपहरणाचे नाटक करणारा अटकेत

निवडणुकीत एनडीए नवा इतिहास घडवेल

अबब! भारतातून सहा महिन्यांत १० अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात

पूर्वी सोन्याच्या प्रमाणात डॉलर छापायचे असे अमेरिकेचे धोरण होते. १९७१ पासून हे धोरण अमेरिकेने केराच्या टोपलीत टाकले. तेव्हा पासून या संकटाचा प्रारंभ झाला असे कियोसाकी यांचे म्हणणे आहे. २०२५ मध्ये त्यांनी २००८ पेक्षा मोठी मंदी येणार असल्याचे भाकीत केले. ही मंदी जेव्हा येईल तेव्हा डॉलरचे कपटे कुणाच्याही उपयोगी पडणार नाही. तेव्हा सगळ्या जगासाठी सोने आणि चांदी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असेल. परंतु तोपर्यंत हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या पलिकडे गेलेले असतील.

कियोसाकी जे म्हणतो आहे, ते नवे नाही. अनेक देशांच्या ते कधीच लक्षात आले आहे. जगभरातील देश अमेरिकेच्या ट्रेजरी बॉण्डमध्ये गुंतवणूक करतात. आजवर ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जायची. परंतु आता हे चित्र झपाट्याने बदलते आहे. जगातील देशांनी अमेरिकी ट्रेजरी बॉण्डमधील हळूहळू ही गुंतवणूक कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. भारत सुद्धा तेच करतो आहे. ट्रेजरी बॉण्डमधून मोकळे झालेले पैसे हे देश, वित्तिय संस्था सोन्या चांदीत गुंतवत आहेत. त्यामुळे एका बाजूला सोन्या-चांदीचे दर वाढतायत, दुसऱ्या बाजूला डॉलर अधिक कमकुवत होत आहे. चीनची अमेरिकी बॉण्डमध्ये असलेली गुंतवणूक २०२० मध्ये १.०७ ट्रिलियन होते. एप्रिल २०२५ पर्यंत ही ७५७.२ बिलियन पर्यंत खाली आली. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या काळात ही गुंतवणूक ७६१ अब्ज वरून ७३० अब्ज वर आलेली आहे.

भारताची गुंतवणूक २०२४ च्या जुन महीन्यात २४२ अब्ज होती. चालू वर्षाच्या जून महिन्यात ती २२७ अब्ज झालेली आहे. हा पैसा भारताने सोन्यात गुंतवला कारण. याच काळात सोने ८४१ मेट्रीक टनवरून चालू वर्षाच्या जून महिन्यात ८८० मेट्रीक टन झाली आहे. अमेरिकेचे बॉण्ड जे जगात सर्वात सुरक्षित मानले जायचे त्याची पत आता ढासळते आहे, कारण डॉलरची पत ढासळते आहे. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेवर असलेले कर्ज ३६.१ ट्रिलियन होते, सप्टेंबर २०२५ मध्ये ते ३७.४ ट्रिलियन झाले आहे.

कियोसाकी नेमके हेच सांगण्याचा प्रय़त्न करतो आहे. अमेरिकेचे अर्थकारण कोसळते आहे, कर्जाचा बोजा वाढतो आहे. डॉलरची कधीही माती होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. सगळ्यात जगाच्या हे लक्षात आलेले आहे. त्यामुळे जगभरातील केंद्रीय बँका सोने आणि चांदीत गुंतवणूक करतायत. त्यामुळे या दोन्ही मूल्यवान धातूंचे भाव वाढतायत.

कियोसाकी याने सोने आणि चांदीच्या किमतीबाबत केलेली ही भविष्यवाणी पहीली नाही. त्याने अशी भविष्यवाणी २०२० मध्ये केली होती. २०२२ मध्ये केली होती. २० सप्टेंबर २०२२ मध्ये तो म्हणाला होता चांदी प्रति औस १०० ते ५०० डॉलरच्या दरम्यान जाईल. ७ ऑगस्ट २०२० मध्ये तो म्हणाला होता. चांदी ३० डॉलर प्रति औंसवरून ५० डॉलरवर जाईल, पुढे ती १०० ते ५०० डॉलरपर्यंत वाढेल.

कियोसाकीच्या भाकीताचा एक टप्पा खरा ठरला आहे. चांदी आता ५० डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे ती यापुढे जाईल की खाली येईल याकडे तज्ज्ञांचे लक्ष आहे. सोलार पॅनल, इलेक्ट्रीक कार, एलईडी टीव्ही, संरक्षण उत्पादने, रॉकेट्समध्ये चांदीचा वापर प्रचंड वाढला आहे. दुसऱ्या बाजूला चांदीचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या मेक्सिकोमध्ये बऱ्याच खाणी बंद झाल्या आहेत. सरकारची नवी धोरणे आणि कामगारांच्या समस्येमुळेही उत्पादनावर परीणाम झाला आहे. रशिया, बोलिव्हीयामध्येही उत्पादन कमी झाले आहे.

म्हणजे मागणी वाढली, पुरवठा घटला हे चित्र स्पष्ट आहे. ज्या कारणामुळे पुरवठा घटलेला आहे, त्यात तात्काळ सुधारणा होण्यासारखे चिन्ह नाही. २०३० पर्यंत हे चित्र कायम असेल. इथे मुद्दा फक्त एवढा आहे की, चांदी ५०० डॉलर प्रति औंस म्हणजे आज आहे, त्याच्या तुलनेत दहा पट वाढेल काय ?  मतभेद इथेच आहेत. कियोसाचे भाकीत १०० ते ५०० डॉलर असे आहे. म्हणजे आधी १०० डॉलरपर्यंतचा टप्पा त्याने दिला आहे. एवढी किंमत वाढले काय? वाढली तर ती कधी पर्यंत ? असे सगळे प्रश्न आहेतच. याचे उत्तर कठीण आहे, परंतु सध्या चांदीचे दर तिथे आहेत, तिथे ते पोहोचतील असे तीन वर्षांपूर्वी कोणाला वाटत होते?

एडवर्ड यार्डेनी या अमेरिकी अर्थशास्त्रज्ञाने दावा केला आहे की सोने २०३० पर्यंत दहा हजार डॉलर प्रति औंस होईल. आजचा दर ४०३६ डॉलर प्रति औंस आहे. म्हणजे यार्डेनी म्हणतायत की सोन्याचे दर येत्या पाच वर्षात सुमारे १५० टक्के वाढतील. त्यामुळे कियोसाकी जे म्हणतो आहे, ते बिनबुडाचे नाही, कदाचित तो म्हणतोय तितके चांदीचे दर वाढणार नाहीत, परंतु १०० डॉलरचा पहीला टप्पा पार होणार नाही, असा दावा आज कोणी करू शकणार नाही.

दिवाळीचा सण आठ ते दहा दिवस दूर आहे. या काळात मुंबईच्या सराफा बाजारात झुंबड आहे. लोक दागिने कमी घेतायत, परंतु सोन्याची नाणी, चांदीच्या लगडी घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दी आहे, लोक रांगा लावून खरेदी करतायत. अनेक ठिकाणी पैसे आज आणि माल आठ दिवसांनी अशी परिस्थिती आहे. अनेक सराफा व्यापाऱ्यांनी दर वाढणार याचा अंदाज घेऊन माल दाबून ठेवलेला आहे.

अमेरिकेचा डॉलर कोसळणार म्हणून ही गर्दी नसेल कदाचित, परंतु लोकांना रशिया युक्रेनचे युद्ध दिसते आहे. इस्त्रालय-इराणचे रण कधीही सुरू होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑपेरशन सिंदूरचा दुसरा भाग कधीही सुरू होऊ शकतो, असे वातावरण आहे. हे चित्र लोकांना दिसते आहे. त्याचा अर्थही त्यांना कळतो आहे. वाईट काळात लोकांचा भरवसा पैशापेक्षा सोन्यावर असतो. भारतीयांनी हे शहाणपण काही शे वर्षे आधी आत्मसात केलेले आहे. त्यामुळे कियोसाकी जे बडबडतोय ते थोड अतिरंजित असू शकते. परंतु त्याला पूर्ण मोडीत काढू नका. तो अमेरिकेचे अर्थकारण जवळून बघतो आहे. कदाचित तो ते पाहातो आहे, जे आपल्याला दिसत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा