America is ‘ going broke slowly’ says J P Morgan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत काय ग्रहयोग आहे, कोण जाणे परंतु त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणारा कायम खड्ड्यात जातो. मोदींनी विरोध करणाऱ्यांची नावे आठवा आणि खातरजमा करा. चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, ‘आय डोण्ट वॉण्ट डीस्ट्रॉय हीज पोलिटीकल करीयर’. त्यानंतर दोन दिवसांत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इतिहासातील सर्वात मोठे जन आंदोलन सुरू झाले. नो किंग प्रोटेस्ट, असे याचे नामकरण करण्यात आले. अमेरिकेतील ५० लाख लोक या आंदोलनानिमित्त रस्त्यावर उतरले. त्यांना ट्रम्प यांना हाकलायचे आहे. अमेरिकेचा डोलारा कोसळू लागला आहे, असे भाकीत नामांकीत वित्तसंस्थेने केलेला आहे.
ट्रम्प यांना जगात कोणी फार गांभीर्याने घेत नाही. त्यांचीही तशीच इच्छा असावी. त्यामुळे ते सगळे राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून बोलत असतात. त्यांची वक्तव्य आणि विधाने बोलणे या श्रेणीत येत नाहीत, त्याला बरळणेच म्हटले पाहिजे. मोदी इज अ ग्रेट मॅन, ही लव्हज मी… असे विधान त्यांनी गुरुवारी केले. हे लव्ह वेगळ्या अर्थाने घेऊन नका, मला त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची नाही. मनातल्या काही गोष्टी अनेकदा न कळत तोंडावर येतात. जे ट्रम्प यांना मोदींच्या विरोधात करायचे होते, ते त्यांच्यात वाट्याला येताना दिसते आहे.
आधी ट्रम्प यांना मोदी का नकोसे झालेत हे लक्षात घ्या. अमेरिकेत मका आणि सोयाबीनचे प्रचंड उत्पादन आले आहे. हे उत्पादन गळ्यात मारून घ्यायला भारत तयार नाही. चीननेही नकार दिलेला आहे. ट्रम्पना हवे तसा व्यापार करार करण्याची भारताची तयारी नाही, रशियन तेलाची खरेदी बंद करण्याची भारताची तयारी नाही. त्यामुळे शक्य असते तर ट्रम्प यांनी मोदींना टाचे खाली चिरडले असते, किंवा नायगारा धबधब्यावरून त्यांचा कडेलोट केला असता. सध्या तरी हे स्वप्नात शक्य आहे. आय डोण्ट वॉण्ट डीस्ट्रॉय हीच पोलिटीकल करीयर… असे जेव्हा ट्रम्प म्हणतात, त्याचा अर्थ त्यांना असा अपेक्षित आहे की, ते मोदींचे पोलिटीकल करीयर उद्ध्वस्त करू शकतात, परंतु त्यांना करायचे नाही.
जे वाकत नाहीत, त्यांना संपवायचे, जो खटकला, त्याचा राजकीय कडेलोट करायचा किंवा पूर्ण खात्मा करायचा हे अमेरिकेचे धोरणच आहे. ही यादी खूप मोठी आहे. मुअर्रम गद्दाफी, सद्दाम हुसैन, बशर अल असाद, पॅट्रीक लुमुम्बा, साल्वादोर अलेंण्डे, शेख हसीना, इम्रान खान आदी. या यादीत मोदी नाहीत. याचे श्रेय ट्रम्पना नसून मोदींच्या सावधपणाला आहे. सातत्याने मोदींना हटवण्याचे प्रय़त्न होऊन सुद्धा त्यात यश येत नाही, हे अमेरिकेचे दुर्दैव आणि भारताचे सुदैव. ट्रम्प यांच्याविरोधात मात्र अमेरिकेत जाळ पेटलेला दिसतोय.
हे ही वाचा:
सपा-काँग्रेसचा भगवान राम आणि दीपावलीवरील उपदेश जनतेला मान्य नाही
‘आयएनएस विक्रांत’वर नौदल जवानांसोबत मोदींची दिवाळी
डीआय खान भागात फ्रंटियर कॉर्प्सवर हल्ला
हाँगकाँगमध्ये धावपट्टीवरून घसरून तुर्की मालवाहू विमान समुद्रात कोसळले; दोन मृत
मोदी अमेरिकेसमोर वाकत नाहीत, अमेरिकी फतवे मानत नाहीत. त्यामुळे मोदींनी मोडीत काढण्याचे प्रयत्न २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत करण्यात आले. भाजपाचा आकडा कमी झाला, परंतु सत्तेवर मोदीच आले. ते अल्पमतातील सरकार चालवतायत, असे कोणालाही जाणवत नाही. चंद्राबाबू नायडू यांना फूस लावण्याचे प्रयत्नही झाले.
२०२४ च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या कौन्सिल जनरल जेनिफर लार्सन भारतात आल्या होत्या. त्यांनी बऱ्याच राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. चंद्राबाबू नायडू यांनाही त्या भेटल्या. मोदी सरकार त्यावेळी वक्फ सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत होते.
आंध्र प्रदेशच्या बाप्टिस्ट चर्चचे नियंत्रण अमेरिकेतील बाप्टीस्ट चर्चच्या माध्यमातून होते. सीआयएच्या कारवायांसाठी या चर्चचा वापर होता. हे सीआयएचे मोठे हत्यार आहे. रशियन न्यूज एजन्सीमध्ये या संदर्भात एक मोठा लेख प्रसिद्ध झाला होता. चंद्राबाबूंनी मोदी सरकारचा पाठिंबा काढावा म्हणून हे जो बाय़डन यांचे सरकार हे सगळे मोहरे हलवत होते. चंद्राबाबूंनी त्यांचा भ्रमनिरास केला.
हे सगळे चाळे ट्रम्प यांच्या काळात होणार नाहीत, अशी अपेक्षा होती. परंतु ती खोटी ठरताना दिसते आहे. म्यानमार, बांगलादेश आणि पाकिस्तानचा वापर करून भारतात काही तर गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असे संकेत मिळत आहेत. अमेरिकी हवाई दलाची विमाने बांगलादेशमध्ये उतरत आहेत. लष्करी अधिकाऱ्यांची ये-जा सुरू आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा कमांड इन्स्पेक्टर जनरल टेरेन्स जॅक्सन याचा मृतदेह बांगलादेशच्या वेस्टीन हॉटेलमध्ये सापडला. मणिपूर पेटवण्यातही अमेरिकेचा हात होता. ३ ऑक्टोबर रोजी भिवंडीत जेम्स वॉट्सन या अमेरिकी नागरिकाला अटक कऱण्यात आली. त्याचे सीआयएशी संबंध आहेत, असे म्हणतात. हा वॉटसन भिवंडीत धर्मांतराच्या कारवायात सहभागी होता. ही अटक झाल्यानंतर अमेरिकेत एश्ले टेलीस या भारतीय वंशाच्या नागरीकाला अटक करण्यात आली. हा अमेरिकी सरकारचा भारत अमेरिका संबंधाबाबतचा सल्लागार होता. त्याने चीनला माहिती पुरवल्याचा त्याच्यावर ठपका होता.
हा घटनाक्रम पाहिल्यानंतर भारतात काही तरी गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात अमेरिकेचा हात आहे, याबाबत शंका उरत नाही. हे ट्रम्प यांच्या माहितीशिवाय होत असेल याची शक्यता शून्य आहे. राजकारणातील डावपेच क्रूर असतात. परंतु इथे धसमुसळेपणा किंवा आरडाओरडा चालत नाही. ट्रम्प यांना ते जमत नाही. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेचा कारभार त्यांना एखाद्या हुकूमशहा सारखा केला. याचा फायदा अमेरिकी जनतेला झाला असता, अर्थकारणाचे काही भले झाले असते तर अमेरिकी नागरिकांना ही मनमानी कदाचित सहनही केली असती. परंतु चित्र तसे दिसत नाही. अमेरिकेत शट डाऊन सुरू आहे. निधी मंजूरीसाठी सिनेटमध्ये त्यांना अपेक्षित मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे खर्चावर बंधने आले. शट डाऊनला आता तीन आठवडे झाले आहेत. टेरीफ युद्धामुळे महागाई भडकली आहे. बेरोजगारी वाढते आहे. शट डाऊनमुळे कोणतेच आकडे बाहेर येत नसले तरी परिस्थिती गंभीर आहे. एके काळी अमेरिकेसोबत जग उभे असायचे, सध्या एकाबाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण जग असे चित्र आहे.
काँग्रेसला विश्वासात न घेता ट्रम्प यांचा कारभार सुरू आहे. या मनमानी विरुद्ध अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे. नो कींग असे या आंदोलनाचे नामकरण झाले आहे. म्हणजे ही लोकशाही आहे, इथे राजासारखी हुकूमशाही चालवू नका, असा इशारा अमरिकी जनतेने दिलेला आहे. अमेरिकेच्या ५० राज्यात या आंदोलनाच्या निमित्ताने २७०० छोटे मोठे मोर्चे निघाले. यात मोठ्या संख्येने तरुणाई आहे. तरी सुद्धा जगातील कोणताही मीडिया याला जेन झीची निदर्शने म्हणत नाही. कदाचित यात तोडफोड आण जाळपोळ नसल्यामुळे ही त्यांना क्रांति वाटत नसावी. ट्रम्प यांची लोकप्रियता अवघ्या १० महिन्यात रसातळाला गेलेली आहे.
अमेरिकेवर कर्जाचा बोजा आता ३८ ट्रिलियन डॉलर झालेला आहे. या कर्जाचे व्याज म्हणून दर साल अमेरिका १.२ ट्रीलियन मोजते. अमेरिका इज गोईंग ब्रोक स्लोव्हली असे भाकीत प्रसिद्ध वित्तसंस्था जे.पी.मॉर्गनने केलेले आहे. वित्त संस्थेचे चीफ ग्लोबल स्ट्रेटेजिस्ट डेव्हीड केली यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे.







