27 C
Mumbai
Tuesday, August 16, 2022
घरसंपादकीयराहुल गांधी, राऊतांच्या मार्गावर...

राहुल गांधी, राऊतांच्या मार्गावर…

Related

‘आमच्यावर दबाव टाकून आम्हाला गप्प बसवता येईल असे कोणाला वाटत असेल तर हे होणार नाही. मी ED ला घाबरत नाही आणि पंतप्रधान मोदींनाही. लोकशाही वाचवण्यासाठी मी लढत राहीन’, असे सध्या कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मीडियाला सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसात दिल्लीत वेगवान घडामोडी घडतायत. काल नॅशनल हेराल्डची ईमारत ED ने सील केली. गांधी परिवाराला हा मोठा दणका आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण आता निर्णायक वळणावर आलेले आहे. काही तरी मोठं घडणार आहे, याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे ED काही निर्णायक कारवाई करण्याच्या तयारीत आहे का, याचा राजकीय विश्लेषक अंदाज घेत आहेत.

पोलिसांची तपास करण्याची पद्धत आणि ED ची तपास करण्याची पद्धत यात मोठी तफावत आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलिस एफआयआर दाखल करतात, त्यानंतर पुरावे गोळा करायला सुरूवात करतात. ED चे अधिकारी मात्र आधी सज्जड पुरावे एकत्र करतात. त्यानंतर Enforcement Case Information Report दाखल केला जातो. आधी छापेमारी (सर्च), जप्ती (सीझ) आणि अटक असे ED चे कारवाईचे टप्पे आहेत. महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यावर जी कारवाई झाली ती याच टप्प्याने झाली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED ने ३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील बहादूर शहा जफर मार्गावरील हेराल्ड हाऊस ही ईमारत सील केली. याच प्रकरणात देशात १० ठिकाणी ED ने छापेमारी करून तपास केला. याप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल यांच्या चौकशीच्या अनेक फेऱ्या झालेल्या आहेत. सोनियांची तीन वेळी ED च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ही चौकशी सुमारे ११ तास चालली. सोनियांचे आजारपण आणि वय लक्षात घेता ED चे अधिकारी त्यांच्याबाबत नरमाईने वागत आहेत. राहूल गांधी यांचीही ED मार्फत सुमारे ५० तास चौकशी झालेली आहे. काल ED च्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी १० ठिकाणी धाडी टाकून तपास केला. ED चे अधिकारी याप्रकरणात सुरुवातीपासून कसून चौकशी करताना दिसतायत. इथे एखादी गफलत आपला कडेलोट करू शकते याची जाणीव ED च्या अधिकाऱ्यांनाही आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष आता जवळ आला आहे, याची जाणीव काँग्रेस नेत्यांना आहे, त्यामुळे ही मोदी सरकारची दडपशाही आहे, असे भासवण्यासाठी गेले काही दिवस काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आंदोलन करत आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांची अटकेपूर्वीची भाषा आणि राहुल गांधी बोलत असल्याची भाषा यात कमालीचे साम्य आहे. ‘आपण कोणाला घाबरत नाही. अटक केली तरी गुढगे टेकणार नाही. फासावर लटकवलेत तरी शरण जाणार नाही’, हे संजय राऊतांचे शब्द आहेत.

राहुल गांधी साधारण त्याच भाषेत आज बोलले आहेत. मी ED ला अथवा मोदींना घाबरत नाही, असे राहुल म्हणाले आहेत. संजय राऊतांनी ED ने कितीही दबाव आणला तरी शिवसेना सोडणार नाही, असे म्हणत शहीद होण्याचा आव आणला होता. राहुल गांधी लोकशाहीसाठी लढण्याची भाषा करतायत एवढाच फरक आहे. ‘मोदींनी काहीही कारवाई केली तरी काही फरक पडणार नाही. मी देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहीन’, असे राहुल यांनी कर्नाटकात बोलताना सांगितले.

दोघांची शरीर भाषा, शब्द आणि त्यातला तपशील खूप सारखा आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे राहुल गांधी सांगतायत. तेच संजय राऊतही सांगत होते. सध्याचा काळ जसा ED च्या कारवायांचा आहे, तसा साथीच्या तापाचाही. हा ताप येण्यापूर्वी काही लक्षणं जाणवायला लागतात. घसा खवखवतो, कणकण आणि अंगदुखी वाटते. ED ने अटक करण्याच्या पूर्वीही अशी काही लक्षणं दिसतात. संजय राऊत यांच्या अटकेपूर्वी जी लक्षणं दिसली तशीच लक्षणं राहुल गांधींबाबत दिसू लागली आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

दिल्लीतील सोनिया-राहुल यांचे निवासस्थान, काँग्रेस मुख्यालय येथे मोठ्या संख्येने सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आहेत. काँग्रेस जनांमध्ये याबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. वरीष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याप्रकरणी ट्वीट करून निषेध व्यक्त केलेला आहे. हे प्रकरण नेमके कोणत्या दिशेने जातेय याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना येऊ लागलाय.

केंद्र सरकार नॅशनल हेराल्ड प्रकरणात अटकेसारखी कठोर कारवाई करू शकेल काय, याबाबत राजकीय विश्लेषक मात्र साशंक आहेत. गांधी परिवारातील नेत्याला अटक करण्याची इच्छाशक्ती आणि धाडस केंद्र सरकार दाखवेल काय, याबाबत ठामपणे सांगता येईल अशी स्थिती नाही. अटक झाली तरी त्या नेत्याला जनतेची सहानुभूती मिळते, त्याची प्रतिमा अधिकच मोठी होते, असा एक मतप्रवाह आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धक्कातंत्र सुपरिचित आहे. राजकीय विश्लेषक ज्याचा अंदाज बांधू शकत नाहीत, असे निर्णय घेण्याची परंपरा या दोन नेत्यांनी गेल्या आठ वर्षात निर्माण केली आहे. हे दोघे काहीही करू शकतात, हे त्यांचे विरोधकही मानतात. पण गांधी परीवाराबाबत ते असा काही धाडसी आणि धक्कादायक निर्णय घेऊ शकतात काय? नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांच्या धक्कातंत्राची पुनरावृत्ती होणार काय, असे काही प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरीत आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा