27.1 C
Mumbai
Monday, July 14, 2025
घरसंपादकीयदोन तज्ज्ञांचा बळी घेणारे ते पाशवी हात कोणाचे?

दोन तज्ज्ञांचा बळी घेणारे ते पाशवी हात कोणाचे?

Google News Follow

Related

१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया एआय १७१ बोईंग ७८७ ड्रीमलायनरविमानाचा अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताचा प्राथमिक अहवाल आठवड्याभरात अपेक्षित आहे. तपास पथकाकडून घातपातासह सर्व शक्यतांचा विचार करण्यात येत आहे. अपघाताला एका महिन्याचा काळ आता लोटल्यामुळे आधी व्यक्त करण्यात आलेल्या बऱ्याच शक्यता आता मोडीत निघाल्या आहेत. तांत्रिक बिघाडाच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता दिसते आहे. हे कारण जर प्रत्यक्षात आले, तर बोईंगच्या प्रतिष्ठेला, अर्थकारणाला मोठा धक्का बसू शकेल. बोईंग विमानांना पाच वर्षांपूर्वी झालेल्या दोन भीषण अपघातानंतर या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा दावा वारंवार करण्यात येत आहे. असा दावा कऱणाऱ्या दोन व्हीसल ब्लोअरचा आजवर संशयास्पद मृत्यू झाला आहे.

एअर एक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो अर्थात एएआयबीकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. एएआयबीचे प्रमुख जीव्हीजी युगंधर यांची अलिकडे सुरक्षा वाढवण्यात आली. त्यांना सीआरपीएफ कमांडोची अतिरिक्त सुरूक्षा प्रदान कऱण्यात आली आहे. हा अपघात घडल्यापासून अमेरिकेला या तपासाची सूत्र हाती घेण्याची इच्छा होती. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेत पाठवावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली. या अपघातात काही तांत्रिक बिघाडाचा एंगल निघाला तर अमेरिकी तपासात उघड होण्याची शक्यता कमीच होती. भारताने या दबावाला फार भीक घातली नाही.
अमेरिकेचे फेडरल एव्हीएशन एडमिस्ट्रेशन, नॅशनल ट्रान्स्पोर्ट सेफ्टी बोर्ड यांनी हा ब्लॅक बॉक्स किंवा किमान तो डेटा तरी आपल्या ताब्यात यावा म्हणून जोरदार प्रय़त्न केले. ब्लॅक बॉक्स भारतात डीकोड करता येणार नाही. तो फक्त अटलांटा किंवा वॉशिंग्टनमधील लॅबमध्येच करता येतो, असे वारंवार सांगण्यात आले. परंतु भारतातील तज्ज्ञांनी ते खोडून काढले. आम्ही करू शकतो, असे ठामपणे सांगत अमेरिकेची मागणी फेटाळून लावली.
बोईंगचे वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये दोन अपघात झाले. पहिला अपघात इंडोनेशियामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला. त्यात ३४६ लोकांचा मृत्यू झाला होता. दुसरा अपघात अवघ्या पाच महिन्यांच्या अंतराने मार्च २०१९ मध्ये इथोपिया येथे झाला. ही दोन्ही विमाने बोईंग ७३७ मॅक्स या प्रकाराची होती. या अपघातामुळे जगभरात खळबळ माजली. बोईंग विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले. जगभरात तब्बल २० महिने या विमानांचे उड्डाण बंद झाले होते. बोईँगवर शेकडो खटले भरण्यात आले. बोईंगच्या सीईओची बदली करण्यात आली. अनेक देश पर्यायी कंपन्यांकडे वळले.

बोईंगमध्ये त्रुटी आहेत, असा दावा अनेकजणांनी केला. ज्यांनी हा विषय लावून धरला त्यापैकी दोघांचा एकाच वर्षी मृत्यू झाला. हे सगळे मृत्यू संशयास्पद होते. संशयाचे धुके अधिक गडद करणारे होते. काही लोकांची तोंडे बंद करण्याचे प्रयत्न होतायत, ही बाब उघड होती. काही शक्तिशाली लोक या मागे असण्याची शक्यता होती. सत्य बोलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना काही लोक हिमतीने पुढे येत होते. सॅम सालेपर सारख्या अनेक तज्ज्ञांनी न्यायालयात जाऊन ठामपणे याबाबत आपली भूमिका मांडली. बोईंगचे वाभाडे काढले.

जॉन बर्नेट बोईंगमध्ये वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक होते. त्यांनी तांत्रिक बाबी अधोरेखित करून त्यांनीही अनेकदा धोक्याची घंटा वाजवली होती. मार्च २०२४ मध्ये साउथ कॅरोलिना येथीलचार्ल्सटन या हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी जाहीर केले. अनेकांनी पोलिसांच्या या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह लावले होते. बर्नेट यांचीही कोर्टात साक्ष होणार होती. मृत्यूनंतर त्यांचे कोही फोन, नोट्स, आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज गायब झाल्याचे उघड झाले.

जोशुआ डीन यांचा मृत्यूही असाच संशयास्पद होता. स्पिरीट एरो सिस्टीम्स या बोईंगच्या प्रमुख पुरवठादार कंपनीत ते गुणवत्ता निरीक्षक (क्वालिटी ऑडीटर) म्हणून कार्यरत होते. बोईंग ७३७ मॅक्सच्या टेल एसेंब्लिमध्ये गंभीर सुरक्षात्मक दोष असल्याचा दावा त्यांनी केला होता. कंपनीकडून सुरक्षा मानकांचे उल्लंघन करण्यात येत असून वारंवार तक्रार करूनही ती दुर्लक्षली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

एप्रिल २०२४ मध्ये अचानक बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे अवघ्या काही दिवसांत त्यांची तब्येत बिघडली. त्यांचा मृत्यू झाला. ते सर्वस्वी निरोगी होते असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे होते. जोशुआचे जाणे त्यांच्या दृष्टीने धक्कादायक आणि अकल्पनीय होते. बोईंग विरोधात साक्षीदार म्हणून उभं राहण्याची तयारी दाखवली होती. या साक्षीदाराने अशी अचानक एक्झिट घेतली.
दोन महिन्यात बोईंगच्या विरोधात बोलणारे दोनअनुभवी तज्ज्ञ अचानक मृत्युमुखी पडतात, ही “योगायोग” म्हणून स्वीकारण्यासारखी बाब नाही.दोघांचा मृत्यू अचानक झाला. त्यांची कारणे त्यांच्या निकटवर्तियांना पटण्यासारखी नव्हती. त्यांनी बोईंगकडे बोट दाखवले. दोघांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक दस्तेवज गायब झाले होते. या दोघांचा आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु लोक गप्प बसले नाहीत. जीवावर उदार होऊन आणखी दहा जण पुढे झाले. सॅम सालेपर यांच्यासारखे लोक न्यायालयापर्यंत पोहोचले. आणखी काही बळी जाऊ नयेत म्हणून मला तोंड उघडावे लागत असल्याचे सांगून त्यांनी बोईंगच्या विरोधात आवाज उठवला.

अहमदाबादेत झालेल्या एआय-१७१अपघाताच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याची आठवण होणे स्वाभाविक आहे. तपास अहवालामध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते जर प्रत्यक्षात आले तर ते अर्थातच बोईंगला जड जाणार.

कोणतेही विमान टेक ऑफ घेण्यासाठी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत धावपट्टी वापरते. अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेल्या ड्रीमलायनरने ८० ते ९० टक्के धावपट्टी वापरली होती. हा मुद्दा तज्ज्ञांकडून वारंवार उपस्थित केला जात होता. इंजिनाने पूर्ण थ्रस्ट न दिल्यामुळे हे घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतरच इंधनातील बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, हायड्रॉलिक यंत्रणांतील दोष आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. हे अर्थातच अंदाज आहेत. ते खोटे ठरू शकतात. वेगळेच काही कारण समोर येऊ शकते. घातपाताचा एंगलही अजून नाकारण्यात आलेला नाही. परंतु जे काही समोर येईल ते धक्कादायक असेल एवढे निश्चित.

आता पर्यंत फक्त अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आठवड्याभरात प्राथमिक अहवाल आल्यानंतर यासंदर्भात काही ठोस बोलता येईल. याच दरम्यान एएआयबीचे प्रमुख जीव्हीजी युगंधर यांची सुरक्षा वाढवण्यात आली हा योगायोग नाही. या आधी झालेले दोन मृत्यू सगळ्या जगाला ठाऊक असल्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी घेतलेली दिसते. पंगा मोठा आहे, प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायला पाहीजे, हे लक्षात आल्याचे हे लक्षण आहे.

अमेरिका ही जगातील महाशक्ति आहे. जगभरात ठसा उमटवणाऱ्या आणि बक्कळ कमाई करणाऱ्या अमेरीकी कंपन्यांमुळे हे शक्य झाले आहे. या कंपन्यांना सरकारचे भक्कम समर्थन असते. या कंपन्या विविध देशात जाव्यात यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्न करीत असतात. कतारमध्ये जाऊन ट्रम्प यांनी बोईंगचे आजवरचे सगळ्यात मोठे डील घडवले हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. ९६ अब्ज डॉलरचा सौदा. आमच्याकडे जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आहे, असा ढोल पिटणाऱ्या या कंपन्या म्हणजे अमेरिकेचे नाक आहे. हे नाक जेव्हा जेव्हा कापले जाण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा सर्वशक्तिनिशी ती शक्यता दडपण्यात येते.

अहवालात जर तांत्रिक बिघाडावर शिक्कामोर्तब झाले तर त्याचे काय परीणाम होऊ शकतात हे अमेरिकेला ठाऊक आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दडपादडपीची सवय आहे. भारताबाबत हा प्रयत्न त्यांच्याकडून होणार नाही, असे मानणे भाबडेपणाचे आहे. केंद्र सरकारला पुन्हा एकदा आपला खमकेपणा दाखवून द्यावा लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा