अमेरिकेत दोन माजलेल्या हत्तींमध्ये साठमारी सुरू आहे. खरं तर याला साप मुंगसाची हाणामारी म्हटणे जास्त योग्य ठरेल. कारण हत्ती मद्य प्यायल्या शिवाय इतक्या खुन्नसने लढत नाहीत. अमेरिकेतील सत्तेची लढाई हातघाईवर आलेली आहे, आणि त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, एका चिलटाकडून. आश्चर्य वाटेल पण सत्य आहे. या टुकार भिकार पाकिस्तानींना नको तिथे नाक खूपसण्याची सवय असते. त्याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आलेली आहे.
अलिकडेच स्थापन करण्यात आलेल्या पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलच्या सीईओ पदाची जबाबदारी बिलाल बिन साकीब या तरुणाच्या खांद्यावर आहे. अवघ्या तिशीतला हा तरुण. पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातील अनेक बड्या लोकांच्यासोबत याचे फोटो आहेत. पाकिस्तानचे नव्याने बढती मिळालेले फील्ड मार्शल आसिफ मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ, तसेच अमेरिकेतले अनेक मुत्सद्दी, राजकीय नेते यांच्यासोबत या बिलाल बिन साकीबचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानने त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला आहे.
पाकिस्तानमध्ये क्रिप्टो कौन्सिलची स्थापना होण्यापूर्वी बिलाल बिन साकीब हे नाव कोणी ऐकले नसेल, परंतु सध्या तो प्रचंड चर्चेत आहे. दोन दिवसापूर्वी हा न्यूयॉर्कमध्ये उद्योगपती एल़ॉन मस्क यांचे वडील एऱॉल मस्क यांना भेटला होता. त्यांच्या मार्फत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न बिलालने केला. आता ही मध्यस्थी कुणी करायला सांगितली? की त्याने स्वतःहूनच हा शहाणपणा केला हे कळायला मार्ग नाहीये. भेटीनंतर त्याने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
मार्केट हॅव ग्रेट मोमेण्टम- लेट्स नॉट मेस इट अप
वर्ल्ड नीट ट्रम्प एण्ड मस्क इन सेम चॅट ग्रुप
पीस एण्ड बिल्ड
ट्रम्प कुटुंबियांची ६० टक्के मालकी असलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल आणि पाकिस्तानच्या क्रिप्टो कौन्सिल मध्ये २६ एप्रिल रोजी करार झाला आणि त्यानंतर अमेरिकेतील बड्या राजकीय नेत्यांचे, मुत्सद्यांचे दरवाजे याच्यासाठी खुले झाले. चार दिवसापूर्वी हा अमेरिका दौऱ्यावर होता या दौऱ्यांच्या निमित्त त्यांनी अमेरिकेतील अनेक बड्या नेत्यांची गाठभेट घेतली आणि याच दरम्यान तो एरॉल मस्क यांना सुद्धा भेटला.
ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ट्रम्प यांनी एका दहशतवादी देशाला आणि दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या देशाला एकाच रांगेत उभं केलं होतं. तेच आता ट्रम्प यांच्या वाट्याल आलेले आहे. पाकिस्तानचा एक टुकार राज्यमंत्री दर्जाचा बिलाल बिन साकीब ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. ट्रम्प यांच्याशी या पाकिस्तानी भुरट्यांची जवळीक कशी झाली त्याची कथा खूप मजेदार आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशन ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या परिवाराची व्यावसायिक संस्था. या संस्थेशी संबंधित असलेल्या दोन जणांनी पाकिस्तानच्या नेत्यांना ट्रम्प यांच्या मांडीवर आणून बसवले. किथ शिलर आणि जॉर्ज सोरीअल ही त्या दोघांची नावे. किथ हा बराच काळ ट्रम्प यांचा व्यक्तिगत अंगरक्षक होता. पुढे त्याने ट्रम्प ऑर्गनायझेशनचा सुरक्षा प्रमुख म्हणूनही काम केले. हा ट्रम्प यांच्यासाठी काम करणारा फिक्सर म्हणून ओळखला जातो. त्यानेच रावळपिंडीतील लष्करशहांना व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले केले. दुसरा सोरीयल हा ट्रम्प ऑर्गनायझेनमध्ये कायदेशीर सल्लागार होता. त्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या रेअर अर्थ मिनरल्सकडे ट्रम्प यांची नजर वळवली. थिंक मिनरल, नॉट मिलिटंट ही त्याची थिअरी होती.
या दोघांनी अमेरिकेत सुरू केलेल्या जावलिन एडवाझर या ल़ॉबिंग फर्मशी पाकिस्तानने करार केला होता. हा करार व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्यासाठी होता. पहलगाम हल्ल्यानंतरच हा करार झाला. पाकिस्तान यांच्या फर्मला दरमहा दोन लाख डॉलर्स इतकी रक्कम मोजतो.
आश्चर्य म्हणजे याच काळामध्ये भारताने सुद्धा लॉबिंग साठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्ती असलेल्या जेसन मिलर यांच्याशी मे महिन्यात करार केला. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या एसएचडब्ल्यू ना भारत महिना दीड लाख डॉलर इतके मानधन देतो. म्हणजे पाकिस्तानपेक्षा ५० हजार डॉलर दरमहा कमी. परंतु हे ५० हजार डॉलर भारताला भारी पडलेले दिसतात.
वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल आणि पीसीसी मध्ये क्रिप्टोच्या संदर्भात हा जो काही करार झालेला आहे तो काही सोपा आणि सरळ नाही. आखातातील धनाढ्य शेख, चीन- कॅनडाशी संबंधित क्रिप्टो कंपन्या, ट्रम्प यांच्या गोतावळ्यातील उद्योगपती यात सामील आहेत.
ट्रम्प यांचा मध्यपूर्वेतील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, त्यांचा उद्योगपती मित्र गेट्री बीच यांनी त्यांच्या क्रिप्टो व्यवसायाचे गणित जुळवून आणले. त्यात दुबई, पाकिस्तानच्या श्रीमंतांना जोडले. दुबईतील क्रिप्टो कंपनी डीडब्ल्यूएफ लॅब या कंपनीने ट्रम्प यांच्या परिवाराच्या मालकीच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअल या कंपनीत २५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. ही कंपनी २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली. २०१८ पासून कार्यरत असलेल्या डीजिटल वेव्ह फायनान्स या कंपनीची ती उपकंपनी. म्हणजे गेल्या फक्त सात वर्षापासून कार्यरत असलेल्या कंपनीची आर्थिक ताकद इतकी आहे की ट्रम्प यांच्या कंपनीला ती रसद पुरवू शकते.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत क्रिप्टोशी संबंधित अनेक कंपन्यांनी निवडणूक निधीसाठी राजकीय पक्षांना ज्या देणग्या दिल्या त्यापैकी ९०% पैसे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मिळाले होते. अर्थ स्पष्ट या कंपन्यांना ठाऊक होतं डोनाल्ड ट्रम्प जर सत्तेवर आले तर क्रिप्टोला चांगले दिवस येतील. या कंपन्यांमध्ये डी डब्ल्यू एफ लॅबचाही समावेश होता. ट्रम्प अध्यक्ष बनण्यापूर्वीच आपल्या सोंगट्या फिट केल्या होत्या.
चेंगपेंग झाओ हा पाकिस्तानच्या क्रिप्टो कौऊंसिलचा सल्लागार आहे. तो क्रिप्टोच्या क्षेत्रातील बिनान्स या कंपनीचा संस्थापक. मनी लॉंडरींगच्या आरोपाखील चार महिने अमेरिकेत तुरुंगवास भोगून आलेला. त्याला पाकिस्तानने आपल्या नव्या क्रिप्टो साम्राज्याचा सल्लागार म्हणून नियुक्त केले ही काही सरळ बाब नाही. हे सगळे ट्रम्प यांनी जुळवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा:
मॉस्को, पुतिन यांनी रशियन नौदल विकास धोरणाला दिली मंजुरी
२०२५ मध्ये फॉर्म १६ दिसणार वेगळा
ओकिनावामध्ये अमेरिकन एअर बेसजवळ स्फोट
भगवान बिरसा मुंडा यांचे त्याग आणि समर्पण प्रेरणादायी
पाकिस्तानच्या आयएसआयने गेली अनेक दशके दहशतवाद पोसण्यासाठी ड्रग्सच्या तस्करीतून आलेला पैसा वापरला आहे. अमेरिकेच्या सीआयएनेही ड्रग्जचा वापर अफगाणिस्तानातील रशियन फौजांच्या विरोधात एखाद्या शस्त्रासारखा केला आहे. ड्रग्जच्या व्यापाराशी अमेरिकेच्या सीआयएचाही संबंध आहे. ड्रग्जचा क्रिप्टोशीही संबंध आहे. थोडक्यात ट्रम्प यांच्या क्रिप्टो व्यवसायाच्या निमित्ताने या सगळ्याची युती झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिलाल बिन साकीबने एरॉल मस्क यांची भेट घेण्यापूर्वी ते भारतात आले होते. त्यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे श्री राम लल्ला यांचे दर्शन घेतले. याच दरम्यान भारताने एलॉन मस्क यांच्या स्टार लिंकला इंटरनेट सेवा प्रदान कऱण्यासाठी मोदी सरकारने परवाना दिला. त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात आणि भारताच्या जवळ जात असल्याचे चित्र निर्माण झाली. त्यातून उत्पन्न झालेल्या घबराटीतून बिलाल बिन साकीबने मस्क यांचया वडीलांची भेट घेतली असावी.
एलॉन यांनी ट्रम्प यांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे टेस्ला, स्पेसेक्स आणि स्टारलिंकचे नुकसान होईल हे स्पष्टच आहे. परंतु ते ट्रम्प यांनाही जड जाणार आहे. कारण ट्रम्प हे पृथ्वीतलावरील सगळ्या शक्तिशाली नेते असले तर मस्क हे या ग्रहावरील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आहेत.
मस्क एका बाजूला अमेरिकेत नव्या पक्षाची गरज असल्याच्या पोस्ट करीत आहेत. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाता करतायत. त्यांनी ट्रम्प यांची लफडी बाहेर काढायला सुरूवात केलेली आहे. ट्रम्प हा पाकिस्तानच्या नेत्यांना सापडलेला नवा बाप आहे. मस्क त्याला अडचणीत आणत असल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बिलाल बिन साकीब प्रयत्न करतो आहे.
एरॉल मस्क यांनी बिलालला काय उत्तर दिले ? ट्रम्प आणि एलॉनमध्ये मध्यस्थी करण्यासाठी ते शब्द टाकणार आहेत का? काही प्रयत्न करणार आहेत का? त्यांनी प्रयत्न केले तर एल़ॉन मस्क त्यांच्या प्रयत्नांना दाद देणार आहे का? या सगळ्या बाबी अजून स्पष्ट नाहीत. एलॉन मस्क हे उद्योगपती असले तरी सनकी आहेत. ट्वीटरचा ताबा घेताना त्यांनी ही बाब पुरेशी स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांच्याबरोबर जो खेळ त्यांनी सुरू केलेला आहे त्यामध्ये नुकसान होणार हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. परंतु नुकसान सहन करण्याची ताकद असल्याशिवाय त्यांनी एवढा मोठा उद्योग उभारलेला नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
