26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरसंपादकीयविखार सरला, ताप वाढला...

विखार सरला, ताप वाढला…

पालकमंत्रीपदासाठीची ही राजकीय सर्कस बंद व्हावी

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी प्रचंड वाढलेला विखार कमी झाला असला तरी ताप मात्र वाढलेला दिसतोय. युती आणि आघाडीचे राजकारण हे कायम आडवे तिडवे असते. सगळे काही सुऱळीत असण्याची शक्यता कमीच. परंतु
प्रत्येक निर्णयावरून लफडी व्हायला लागली तर कारभार चालावा तरी कसा? पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे आणि आदळआपट जोरात सुरू आहेत. रुसवे इतके वाढलेत की मंत्रायलातच एखादे कोपभवन व्हायला हवे अशी परिस्थिती
आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर असताना हा तमाशा सुरू आहे हे विशेष.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला रवाना होण्याआधी पालकमंत्री पदाचा विषय धसास लावला. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला असणार हे उघड आहे. तरीही पालकमंत्री पदावरून वादाच्या ढोल तुताऱ्या
वाजायला लागल्या आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले. भरत गोगावले यांनी तर थयथयाट केला. रायगडचे पालकमंत्री पद अदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी रायगडमध्ये रास्ता रोको केले. रस्ते रोखण्यासाठी टायर जाळले.

जिल्ह्याचा निधी पालक मंत्र्यांकडे असतो. सरकारी निधी ज्याच्या हाती जिल्ह्याच्या चाव्या त्याच्या हाती असा हा प्रकार आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे अप्रत्यक्ष नियंत्रणच त्याच्याकडे असते. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्याची जिल्ह्यात सत्ता, असे हे समीकरण आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करायचा आहे. त्यासाठी
पालकमंत्री पदाचा ताबा आपल्याकडे ठेवण्यासाठी सगळी रस्सीखेच सुरू आहे.

सर्वसाधारण पणे रास्ता रोको हे विरोधकांच्या हाती असलेले शस्त्र मानले जाते. आपल्या घटनात्मक मागण्यांसाठी विरोधक रस्त्यावर उतरतात तेव्हा अनेकदा सरकारची अक्कल ताळ्यावर आणण्यासाठी रास्तारोको या हत्याराचा वापर केला
जातो. परंतु सत्ताधाऱ्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात रास्तारोको करावा तोही एका मंत्र्याच्या समर्थकांनी हा मोठा विनोद आहे. भरत गोगावले हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील एक मान्यवर मंत्री आहेत. त्यांना रायग़डचे पालकमंत्री पद हवे होते. ते हातातून निसटले तेव्हा त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात एल्गार केला. त्यामुळे तूर्तास रायगड आणि नाशिक
जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’

महाराष्ट्रात चमत्कार, भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार!

ब्रिटीश लेबर खासदार हिंदूंऐवजी जमात-ए-इस्लामीला भेटले

आंदोलनाला मारली दांडी; वडेट्टीवारांच्या मुलीसह ६० पदाधिकारी तडकाफडकी पदमुक्त

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील मंत्री अदिती तटकरे यांच्यावर टीका केली. त्या पालकमंत्री नाहीत बालकमंत्री आहेत, अशा प्रकारची अनावश्यक टिप्पणी केली. खरे तर याची गरज नव्हती. अदिती या सलग दोन टर्म मंत्री
आहेत. त्यांनी कमी वयात ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहेत. दुसऱ्या पक्षात आहे म्हणून वयाने कमी असलेल्या एका महिलेचा अपमान करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले? एखादी गोष्ट हवी असणे आणि हाती असणे या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या असतात. उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद हवे होते. शरद
पवारांना दुसऱ्यांदा रिमोट कंट्रोल होण्याची इच्छा होती. त्यांना केंद्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोल व्हायचे होते. कधी काळी त्यांना पंतप्रधान पदही हवे होते. प्रत्यक्षात यातले काहीही झाले नाही. यातून वाट्याला निराशा आली तरी ती दाखवायची नसते. यालाच राजकारण म्हणतात. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. राजकारणातील
प्रत्येक मुत्सद्दी हे तत्व पाळतो. पोटातले ओठावर न आणणे आणि ते चेहऱ्यावरही न दाखवणे हेच तर राजकारण आहे. पवारांना ते बरेचदा जमते. एकनाथ शिंदे यांनाही ते जमले पाहिजे. त्यांच्या शिलेदारांना त्यांनी ते शिकवले पाहिजे.

२०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने १८० अंशाच्या कोनात जे वळण घेतले, त्यात शिंदे यांची भूमिका महत्वाची होती. ज्यांनी शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर राजकारण्याला धोबीपछाड देणारे राजकारण केले, त्या एकनाथ शिंदे यांनी
मनाविरुद्ध निर्णय झाला म्हणून उठसूठ साताऱ्याला जाणे कितपत योग्य आहे? राजकीय समीकरणे जेव्हा बदलतात तेव्हा नेते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. २०१४ मध्ये वाट्याला आलेली दुय्यम भूमिका उद्धव ठाकरे यांना
अस्वस्थ करत होती. त्यांच्या मनात भाजपाबाबत प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. त्यातून त्यांची घसरण सुरू होती. या उलट शरद पवारांचे आहे. महाराष्ट्रात भाजपाचा बाजार उठवल्यानंतर, भाजपाच्या हातून सत्ता हिसकावून घेतल्यानंतरही
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद कायम ठेवला. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून २०१९ मध्ये सत्तेचा घास हिरावून घेतल्यानंतरही त्यांनी आदळ आपट केली नाही. भाजपाचे संघटन इतके मजबूत आहे की, राज्यात त्यांना कुठेही
रास्तारोको करता आला असता, टायरही जाळता आले असते. परंतु यातून काही साध्य होणार नाही, हे त्यांना ठाऊक होते.

राजकारणात सकाळ संध्याकाळ फक्त धमाके करायचे नसतात. शांत राहण्याचीही एक वेळ असते. महाराष्ट्रात जनतेने भाजपाला १३७ जागा दिल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापासून भाजपा फक्त आठ जागा दूर आहे. तरीही मंत्रिपदांच्या
वाटपापासून पालकमंत्री पदापर्यंत भाजपाने मित्रपक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपल्या मनासारखं झाले नाही, म्हणून आदळ आपट सुरू होते. ज्या जनतेने महायुतीला तगडा जनादेश दिला त्या जनतेचा हा अपमान आहे. ही राजकीय सर्कस बंद व्हावी अशी जनतेची मनोमन इच्छा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा