भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल हे पुन्हा एकदा रणजी सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित आणि यशस्वी या दोघांचीही रणजी करंडक सामन्यासाठी मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या १७ सदस्यीय संघात यांची निवड करण्यात आली असून २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या जम्मू- काश्मीर विरुद्धच्या सामन्यासाठी हे दोघे मैदानात उतरणार आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रोहित आणि यशस्वी खेळणार आहेत.
गेल्या काही मालिकांमध्ये भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली होती. यावरून खेळाडूंच्या रणजी सामन्यांमधील खेळण्याबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात होते. अशातच रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघांची घोषणा केली. यावेळी पत्रकार परिषदेत त्याने रणजी करंडक खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता सोमवार, २० जानेवारी रोजी मुंबईच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, बीसीसीआयने खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य केले असून रोहित शर्मा याने यापूर्वीचं रणजी स्पर्धेची तयारी सुरू केल्याचे दिसले होते. १५ जानेवारी रोजी मुंबई संघासोबत त्याने सरावही केला होता. रोहित म्हणाला, “गेल्या सहा ते सात वर्षांत, मी नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून काय घडले आहे हे मी सांगू शकतो. फारसा वेळ मिळत नाही. राष्ट्रीय संघातील व्यस्त वेळापत्रकामुळे क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत,” असे रोहितने सांगितले होते. जेव्हा तुम्ही वर्षभरात इतकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता, तेव्हा तुम्हालाही थोडा वेळ हवा असतो तसेच ताजेतवाने होण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, आगामी हंगामासाठी तयार राहण्यासाठी. पण आम्ही आता यावर लक्ष दिले आहे. आता हे अनिवार्य करण्यात आले आहे की जर वेळ असेल तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असेही रोहित शर्मा म्हणाला.
हे ही वाचा :
ब्रिटीश लेबर खासदार हिंदूंऐवजी जमात-ए-इस्लामीला भेटले
वाँटेड जिहादी जहीर अलीला आसाममध्ये पकडले
हॉटेल ट्रायडंटच्या खोलीत आढळला महिलेचा मृतदेह
४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात पोहोचली उर्फी जावेद, महादेवाचे घेतले दर्शन!
मुंबई संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, कर्ष कोठारी.