मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत एक ६० वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही महिला ६ जानेवारी पासून ट्रायडंट हॉटेल मध्ये एकटीच राहत होती. या महिलेला ‘स्क्रीझोफ्रेनिया’ हा आजार होता अशी माहिती समोर आली असून पोलिसांना तिच्या खोलीत कुठलाही संशयास्पद प्रकार आढळून आलेले नसल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
विनती (६०) असे या महिलेचे नाव असून ही महिला दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे राहणारी आहे. दक्षिण मुंबईत तिची वडिलोपार्जित संपत्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिलेला एकांतात राहण्याची आवड असून ६ जानेवारी रोजी तीने ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेल मध्ये खोली बुक करून एकटीच राहत होती. १९ जानेवारी रोजी या महिलेच्या खोलीतून दिवसभरात खाण्याची कुठलीही ऑर्डर येत नसल्यामुळे हॉटेलच्या कर्मचारी यांना संशय आला आणि त्यांनी ही बाब वरिष्ठच्या लक्षात आणून दिली.
हे ही वाचा:
४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात पोहोचली उर्फी जावेद, महादेवाचे घेतले दर्शन!
गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !
हिंडेनबर्ग संस्थापक अँडरसन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप?
४७१ दिवसांच्या कैदेनंतर गाझामधून ‘त्या’ तिघी परतल्या!
हॉटेल कर्मचारी यांनी त्यांच्या खोलीची पाहणी केली असता ही महिला मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता खोलीत कुठलाही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेला स्क्रीझोफ्रेनिया हा आजार होता या आजारावर तिच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी या महिलेच्या भावाला सूचना दिली असून तिच्या भावाचा जबाब नोंदविण्यात येत आहे.