संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी केलेली आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या वर ३२ लाखांचे कर्ज होते. कर्ज डोक्यावर असले तरी त्याचे ओझे थेट तुमच्या काळजावर असते. या ओझ्या खाली ते बराच काळ गुदमरले असावेत. एक कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता. संघाचा स्वयंसेवक. गड किल्ल्यांवर बनलेल्या अनधिकृत मजारी त्यांना प्रचंड अस्वस्थ करायच्या. या मजारींची माहीत संकलित करून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाची मशाल घेऊन ते गावोगावी फिरले होते. एक कलंदर कार्यकर्ता अकाली निघून गेला. मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर आहे, याचा शोध घेण्याची गरज
आहे.
वय वर्षे अवघे तीस, अलिकडेच साखरपुडा झालेला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे जीव की प्राण. वक्तृत्व इतके ओघवते की जीभेवर साक्षात सरस्वतीच बसली आहे, असे वाटावे. बोलायला लागले की हजारो लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता. जेव्हा मोरे महाराजांच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा अनेकांना वाटले होते, की ते एखाद्या षडयंत्राचा बळी ठरले असतील. विधानसभा निवडणुकीच्या काळात वारकरी प्रवचनकारांची एक मोठी फळी हिंदुत्वाची भगवी पताका घेऊन गावोगावी गेली. हिंदू म्हणून मतदान करण्याची किती मोठी गरज आहे, हे त्यांनी गावखेड्यात जाऊन सांगितले. मोरे महाराज त्यातलेच एक. पायाला भिंगरी लावून हा माणूस महाराष्ट्रभर फिरला. ५० एक सभा, सुमारे दीडशेच्या वर बैठका त्यांनी घेतल्या होत्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या काळात जो हिंदुत्वाचा जाळ निर्माण झाला होता, त्यात मोरे महाराजांची महत्वाची भूमिका होती. मराठा समाजाचा एक तरुण, जो संघ विचारांचा आहे. गावोगावी जातो आणि हिंदुत्व मांडतो, ही गोष्ट अनेकांना सलत होती. त्यापैकीच कोणी त्यांचा बळी घेतला का? असा सवाल अनेकांच्या मनात डोकावला.
परंतु मृत्यूपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठ्यांतून वेगळीच बाब समोर आली. त्यांच्यावर कर्ज होते. धंद्यात सातत्याने आलेले अपयश, त्यातून निर्माण झालेले कर्ज यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. कर्जाचा आकडा फार नव्हता. कार लोन मिळून ३२ लाखांचे कर्ज.
गावखेड्यातील माणसाला ओझे वाटावे हा आकडा निश्चितपणे आहे. माणूस मानी असला तर दुसऱ्याची मदत मागणे हे देखील त्याला मरण वाटते. ‘मी अडकलो आहे, समोर वाटच दिसत नाही. यातून मला बाहेर पडता येईल का?’ असा सवाल कदाचित त्यांच्या मनात निर्माण झाला असेल. जेव्हा मनातल्या मनात अनेक प्रश्न साचतात, तेव्हा त्यांचा गुंता व्हायला लागतो. हा गुंता अनेकदा जीवघेणा ठरतो. मोरे महाराजांसाठी हाच गुंता मृत्यूचा सापळा ठरला. या प्रकरणात आश्चर्य वाटण्यासारखे बरेच काही आहे. मोरे महाराज माणसांत वावरणारा, माणसांत रमणारा, त्यांना जीव लावणारा माणूस. त्यांच्यावर जीव लावणारेही अनेक असावेत. त्यापैकी एका व्यक्तिकडे तरी त्यांनी मनातली सल बोलून दाखवली असती तर मनावरचे ओझे
थोडे हलके झाले असते. ती सल त्यांनी मनातच ठेवून जगाचा निरोप घेतला की काही जणांकडे मदत मागितली होती, परंतु वेळेवर कोणीच हात न दिल्यामुळे त्यांना आत्महत्येच्या मार्गाने जावे लागले, या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही.
हे ही वाचा:
‘येशूच्या क्रोधाला घाबरा, देवांच्या मूर्ती तोडा’
करुणा शर्मा नव्हे आता करुणा मुंडे, धनंजय मुंडेंनी पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश!
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
हमासने समलैंगिक सदस्यांना फाशी दिली, इस्रायली पुरुष बंधकांवरही झाले अत्याचार!
वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेताना मनाने साफ खचलेला हा तरुण त्याच्या अखेरच्या पत्रांमध्ये लिहीतोय की आपली इको सिस्टीम उभी करा, लढत रहा, खचू नका… ज्याचा साखरपुडा झालेला आहे, आय़ुष्यात मनासारखी तरुणी येणार
आहे, कुंभमेळा, भारत दर्शन, वारी, गड किल्ले पाहणे ही ज्याची स्वप्ने आहेत. त्या सगळ्या स्वप्नांचे विसर्जन करून अखेरचा प्रवास करतानाही त्याला चिंता इको सिस्टीमची आहे. ही इको सिस्टीम अर्थात हिंदुत्ववाद्यांची आहे, शिवभक्तांची आहे. या इको सिस्टीमसाठी राबणाऱ्यांना सुरक्षित आर्थिक जीवन जगता येईल अशी इको सिस्टीम हिंदुत्ववाद्यांना निर्माण करता आली नाही, हे त्यांचे दुर्दैव.
त्यांच्या चिठ्ठ्या वाचल्यानंतर काही प्रश्न मनात निश्चितपणे उभे राहतात. असे अनेक कार्यकर्ते आहेत, जे राष्ट्रवादाच्या विचाराने भारलेले असतात. तल्लख बुद्धिमत्तेची देणगी त्यांना लाभलेली असते. आपल्या वैयक्तिक भरभराटीची चिंता न करता, ही मंडळी सतत राष्ट्रवादाचा विचार पेरण्याचे काम करत असतात. कार्यकर्ते जोडतात. समाजमन प्रभावित करण्याचे काम करत असतात, कामाचा डोंगर उभा करत असतात. संघटेनेतही अतिशय प्रिय असतात. अशा तरुणांच्या घरात चार पैसे येत राहावेत, त्यांची चूल पेटत राहावी. किमान जबाबदाऱ्या पार पाडण्याची आर्थिक क्षमता निर्माण व्हावी, याचा विचार करण्याची जबाबदारी कोणाची? मोरे महाराज त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना, बहिणीला मागे सोडून गेले आहेत. त्यांची काळजी घ्यायला, काही लोक आता निश्चितपणे पुढे येतील. त्यांचे कर्जही फेडले जाईल. परंतु इतक्या लोकांना
सांभाळण्यापेक्षा एका शिरीष मोरे नावाचा एक लखलखता हिरा आपण गमावला, त्याची भरपाई कशी होणार आणि कोण करणार?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)