राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांची पत्नी करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी लागणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत करुणा मुंडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. करुणा शर्मांचे आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने मान्य केले असून धनंजय मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये असेही कोर्टाने म्हटले आहे.
करुणा शर्मा यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानी हिला तिच्या लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याचा २५ हजार रुपयांचा खर्च करुणा शर्मा यांना देण्याचे आदेश मंत्री मुंडे यांना देण्यात आले आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या, “पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केले आहे. करुण शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा.
त्या पुढे म्हणाल्या, १५ लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मात्र, २ लाख रुपये कोर्टाने देण्यास सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, या पोटगीवर समाधानी नाही. कारण महिन्याचा खर्च १ लाख ७० हजार आहे. ३० हजार रुपये मेन्टेन्स आहे. मी कोर्टाच्या ऑर्डरवर समाधानी नाही. मी हायकोर्टात दाद मागणार आहे.
हे ही वाचा :
गुगलकडून नवीन फ्लॅगशिप एआय मॉडेल
नव्या आयकर विधेयकाला उद्या मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार !
विद्यार्थिनीवर तिघा शिक्षकांकडून बलात्कार
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांची यावर प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी काही चुकीचे केलंय असे कोर्टाला आढळले नसल्याचे वकिलांनी म्हटले. करुणा शर्मा यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होतो हे धनंजय मुंडे यांनी आधीच मान्य केले होते. हे ग्राह्य धरूनच कोर्टाने आजचे आदेश दिले आहेत, असे वकिलांनी म्हटले.