अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या काही भारतीयांना अमेरिकन लष्करी विमानाने भारतात पाठवण्यात आले. बुधवारी हे विमान अमृतसरमध्ये पोहचले यात १०४ भारतीयांचा समावेश होता. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. या विमानातून आलेल्या भारतीयांनी ते अमेरिकेत कसे पोहचले आणि तिथे पोहचताना एजंटकडून कशी फसवणूक झाली याची हकीकत सांगितली आहे.
अमृतसरमध्ये दाखल झालेल्या भारतीयांमध्ये जसपाल सिंग यांचा समावेश असून त्यांना २४ जानेवारी रोजी मेक्सिकन सीमेवर अमेरिकन बॉर्डर पेट्रोलिंगच्या पथकाने पकडले होते. त्यांनी सांगितले की, एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना अमेरिकेत कायदेशीररित्या पाठवत असल्याचे आश्वासन देऊन त्यांची लाखोंची फसवणूक केली. अमेरिकेत जाण्यापूर्वी एजंटला योग्य व्हिसा देऊनचं पाठवण्यास सांगितले होते, पण त्याने फसवणूक केली. ३० लाख रुपये घेऊन ही फसवणूक करण्यात आली, असे ते म्हणाले. शिवाय हे पैसे देण्यासाठी अनेकांकडून उधारी घेतली होती, असेही ते म्हणाले.
पंजाबमधील आणखी एक निर्वासित हरविंदर सिंग म्हणाले की, त्यांना मेक्सिकोला पोहचण्यापूर्वी कतार, ब्राझील, पेरू, कोलंबिया, पनामा आणि निकाराग्वामधून नेण्यात आले. पुढे मेक्सिकोहून अमेरिकेला जाताना, अनेक टेकड्या ओलांडाव्या लागल्या. मध्ये आम्हा लोकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटण्याच्या बेतात होती, पण आम्ही सुदैवाने वाचलो. शिवाय आम्ही पनामाच्या जंगलात एका व्यक्तीला मरताना पाहिले आणि एका व्यक्तीला समुद्रात बुडतानाही पाहिले. पंजाबमधील आणखी एक निर्वासित जे काल भारतात आले त्यांनी सांगितले की, अमेरिकेला जाणाऱ्या ‘डंकी मार्गा’वरील (Donkey Route) प्रवासादरम्यान त्यांचे ३०,००० ते ३५,००० रुपयांचे कपडे चोरीला गेले.
अमेरिकेहून बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन निघालेले विमान पहिल्या १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन भारतात आले. यात ३३ जण हरियाणाचे, ३३ जण गुजरातचे, ३० जण पंजाबचे, प्रत्येकी तीन जण महाराष्ट्र, उत्तर प्रदेशचे आणि दोन जण चंदीगडचे होते. निर्वासितांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुले होती, ज्यात एक चार वर्षांचा मुलगा आणि पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता. माहितीनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी १८,००० कागदपत्र नसलेल्या भारतीयांना भारतात परत पाठवण्यासाठी यादी तयार केली आहे.
हे ही वाचा..
नव्या आयकर विधेयकाला उद्या मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार !
भारतीय स्थलांतरितांच्या हद्दपारीवर परराष्ट्रमंत्री बोलणार
दरम्यान, अमेरिकेतून बेकायदेशीरपणे देशात आल्याबद्दल हद्दपार करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांनी असा दावा केला आहे की, त्यांना संपूर्ण प्रवासात हात आणि पाय बांधून विमानाने परत पाठवण्यात आले. निर्वासितांपैकी एक, जसपाल सिंग यांनी सांगितले की, अमृतसरमध्ये उतरल्यानंतरच त्यांच्या बेड्या सोडण्यात आल्या. “आम्हाला वाटले की आम्हाला दुसऱ्या छावणीत नेले जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की आम्हाला भारतात नेले जात आहे. आम्हाला हातकड्या लावण्यात आल्या होत्या आणि आमच्या पायांना साखळ्या बांधण्यात आल्या होत्या. अमृतसर विमानतळावर त्या उघडण्यात आल्या,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांना भारतात पाठवण्यापूर्वी ११ दिवस अमेरिकेत ताब्यात ठेवण्यात आले होते.
यापूर्वी, बुधवारी सरकारने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या एका फोटोची तथ्यता पडताळून पाहिली. यात असा दावा करण्यात आला होता की, भारतीय स्थलांतरितांना हद्दपारी दरम्यान हातकड्या आणि पायांना साखळ्यांनी बांधण्यात आले आहे. पण, प्रत्यक्षात तो फोटो ग्वाटेमालाच्या नागरिकांचा असल्याचे उघड झाले.