32 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरसंपादकीयअजबच आहे! मोदींना शिव्या; खामेनींबद्दल दुःख

अजबच आहे! मोदींना शिव्या; खामेनींबद्दल दुःख

Google News Follow

Related

इराणचे राष्ट्रप्रमुख अयातोल्ला अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर जगभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणमध्ये ४० दिवसांचा शोक करण्यात येणार आहे. पण एकीकडे इराणमध्ये जनता दुःख व्यक्त करत असताना दुसरीकडे काही इराणी नागरीक हे आनंदातही आहेत. त्यामागे इराणमधील प्रतिगामी परंपरा कारणीभूत आहे. मात्र एवढेच नाही. खामेनी यांच्या मृत्युमुळे भारतातील काही लोकांना प्रचंड दुःख झालेले आहे. इराणी जनतेने दुःख व्यक्त करणे किंवा खामेनी यांच्या निधनाबद्दल आनंद व्यक्त करणे हे स्वाभाविक म्हणता येईल. त्यांचा थेट या घटनेशी संबंध आहे. पण भारतातील काही भागात, काही लोकांकडून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल छाती पिटली जात आहे, याचे मात्र आश्चर्य वाटते.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील नेते इम्रान मसूद यांना खामेनी यांच्या मृत्यूचे प्रचंड दुःख झाले. आपण खूप व्यथित आहोत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणताना दिसतात. त्यांचा व्हीडिओ प्रथम पाहू.

खामेनी यांचा थेट भारताशी काही संबंध नाही. अर्थात, अमेरिका-इस्रायलने जी कारवाई सुरू केली आहे आणि त्याला इराणकडून जे प्रत्युत्तर दिले जात आहे, त्याचे जागतिक परिणाम हे होणारच आहेत. ते येत्या काळामध्ये दिसतील. त्यापलिकडे जाऊन काही भारतीयांना खामेनी यांच्या निधनाबद्दल आसवे ढाळण्याचे काही कारण आहे का? पण मसूद इतके हळवे का झालेले आहेत? कारण ते मुस्लिम आहेत, एवढेच त्यामागे कारण असू शकते. भारताचे पंतप्रधान हे भारताचे सर्वोच्च नेते आहेत. त्याबद्दल रोज शिव्याशाप देणारे, मोदी तेरी कब्र खुदेगी म्हणणारे लोक भारतात आहेत. ते ज्या देशात राहतात त्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला आणि तोही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्याला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. तेवढेच कशाला. या देशातील विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही तीच भावना बाळगतो. पण भारतापासून कोसो अंतरावर असलेल्या इराणचे राष्ट्रप्रमुख असलेल्या खामेनी यांना ठार केल्यानंतर भारतातील काही लोकांना उमाळे का येतात, हे एक आश्चर्य आहे.

खरे तर हाच त्यांचा स्वभाव आहे. आपल्या देशातील नेत्याला शिव्या द्यायच्या, लोकशाही मार्गाने निवडून आलेले असतानाही त्यावर संशय घ्यायचा, इथल्या यंत्रणांना दोष द्यायचे, पण कोण कुठल्या खामेनींच्या निधनावर मात्र छाती पिटायची. इम्रान मसूद तर या खामेनी यांनी राष्ट्रासाठी कसे बलिदान दिले हे सांगतात. भारतातील ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी देशासाठी त्याग केला त्यांचे गुणगान करताना मात्र हेच लोक राजकारण करतात. सावरकरांना हेच शिव्या घालतात पण टिपू सुलतानचे फोटो लावतात. देशप्रेमाची यांची फूटपट्टी वेगवेगळी आहे. खामेनी यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल बोलणे ही त्यांची मजबुरी आहे, खरे तर ते एक मुस्लिम आहेत, हाच फक्त या दुःखामागील निकष आहे.

एक पत्रकार अरफा खानुम यांनीही एक्सवर पोस्ट करत खामेनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे, खानुम यांचा खामेनी यांच्याशी काय संबंध? या खानुम बाई रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वेगवेगळे नरेटिव्ह पसरविण्यात आघाडीवर असतात. भारताच्या लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेल्या नेत्यावर आरोप करण्यात आघाडीवर असलेल्या खानुम बाईंना खामेनींच्या जाण्याने मात्र अश्रु आवरत नाहीत, काय आश्चर्य.

खामेनी हे मुस्लिम आहेत, शिया धर्मीय आहेत एवढी त्यांची ओळख ठीक आहे. पण त्या पलिकडे जाऊन भारतातील काही लोकांचा त्यांच्याशी काय संबंध? खामेनी यांनी कधी भारतातल्या मुस्लिमांची चिंता केली नाही की ते कधी भारतातल्या मुस्लिमांसाठी धावून आलेले नाहीत. भारतातील मुस्लिम भारतातच अधिक सुखी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सीरिया इथल्या मुस्लिमांचा काय स्थिती आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण तरीही चिंता कुणाची केली जात आहे तर खामेनी यांच्या मृत्यूची.

लखनऊमध्ये अशी सभा होते, त्यात खामेनी यांच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले जाते. रस्ते, बाजार बंद केले जातात.
काश्मिरात तर खामेनी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी रॅली निघाल्या. महिला छाती बडवत रडत आहेत, खामेनी यांच्या समर्थनार्थ. असे अनेक खामेनी जन्माला येतील अशी भावना एक महिला व्यक्त करते आहे. काही लोकांनी खामेनी यांच्यावरील या हल्ल्यानंतर काश्मिरात तोडफोड केल्याचे व्हीडिओ आलेत. पाकिस्तानातही अमेरिकी दुतावासावर पाकिस्तानी लोकांनी हल्ला केल्याचे व्हीडिओ समोर आलेत. प्रश्न मनात येतो की, खामेनी यांच्याशी या सगळ्या लोकांचा संबंध काय? जे पॅलेस्टाइनच्या बाबतीत घडते तेच इथेही.

पॅलेस्टाइनवर इस्रायलने हल्ला केला की, भारतातल्या काही लोकांना संताप येतो, ते रस्त्यावर उतरतात, पॅलेस्टाइनमध्ये किती लोक मारले गेले याचे आकडे देऊ लागतात. तिथल्या स्त्रिया मुले यांच्या हत्यांबद्दल त्यांना प्रचंड वेदना होतात. सेव्ह गाझाचे नारे देणारे नेते अचानक रस्त्यांवर दिसू लागतात. काय संबंध या भारतीयांचा पॅलेस्टाइनशी. जर एवढीच अन्यायाबद्दल चीड आहे, मानवतावाद रक्तात ठासून भरलेला आहे तर मग जगातील कोणत्याही अशा घटनेत ही सगळी माणसे रस्त्यावर का उतरत नाहीत. फक्त पॅलेस्टाइनमध्येच काही घडल्यावर पोस्टरबाजी कशासाठी? सेव्ह गाझा म्हणणारे सेव्ह हिंदू म्हणताना कधी दिसत नाहीत. बांगलादेशातील हिंदूंची सातत्याने गेल्या काही वर्षांत हत्या झाली. आता बांगलादेशात जे आंदोलन झाले आणि सत्तापालट झाला तेव्हा तिथे लक्ष्य करण्यात आले ते हिंदू. त्यावेळी ही मंडळी तोंडात मिठाची गुळणी करून बसली होती. त्यावेळी मानवतावादाच्या गप्पा मारताना ही मंडळी दिसत नाहीत. हा या मंडळींचा दुटप्पीपणा आहे. सोशल मीडियावर अशा दुटप्पी मंडळींची कमतरता नाही.

एकीकडे भारतातील ही दुटप्पी मंडळी मगरीचे अश्रु ढाळत असताना दुसरीकडे युरोपातील काही देशात इराणचे लोक आनंद साजरा करताना दिसत आहेत. त्यांच्या दृष्टीने ज्यांनी इराणला मागे नेले, प्रतिगामी विचारांचा प्रभाव निर्माण केला त्या खामेनी यांना मारल्याबद्दल ते आनंद साजरा करत आहेत. खामेनी हे त्यांच्यादृष्टीने हुकुमशहा आहेत. ज्यांच्या सत्तेत महिलांचे सगळे अधिकार काढून घेतले गेले आहेत, त्याविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांना जन्नतचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळेच खामेनी यांचे पुतळे पाडणे, फोटो जाळणे, या माध्यमातून ते हा आनंद व्यक्त करत आहेत. या इराणी जमावामध्ये अनेक महिला आहेत, ज्या इराणबाहेर असल्यामुळे मुक्त वातावरणात जगत आहेत. कोणतेही कपडे परिधान करण्याची मुभा त्यांना आहे, ती इराणमध्ये नव्हती. मध्यंतरी इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलने झाली. पण तिथे अशा आंदोलनात भाग घेणाऱ्या महिलांना ठार मारण्यात आले. ज्या मुक्त होऊ पाहात होत्या त्यांना तिथे जगणे मुश्कील होते. असे मुक्त आयुष्य जगू पाहणारे लोक खामेनी यांच्या मृत्यूचा आनंद व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

नागपूर काटोल औद्योगिक परिसरात भीषण स्फोट

अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अलिरेझा अराफी इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते

श्रीलंका हरला; तरी पाकडे चालले घरला!

इस्रायलच्या हल्यात इराणच्या सरक्षणमंत्र्याचा मृत्यू

या महिलांवर झालेल्या अत्याचाराचे काय? इराणमध्ये एकेकाळी असेच मुक्त वातावरण होते, पण १९७९ला इस्लामी क्रांती झाली आणि सगळे बदलले. इराणमधील जनतेवर विविध निर्बंध आले. विशेषतः महिलांवर आलेले निर्बंध अधिक भयंकर आहेत. अशा सगळ्या बंधनातून मुक्त होण्यासाठी इराणमधील जनता रस्त्यावर उतरते. इराणमध्ये मध्यंतरी जी आंदोलने झाली त्यावेळी अनेकांना ठार मारण्यात आले, जाहीर फाशी देण्यात आली. तेव्हा मानवतावादाचे पुतळे असलेले लोक एक शब्दही बोलत नव्हते. तेव्हा इम्रान मसूद यांना अस्वस्थ वाटले नाही, अरफा खानुम तेव्हा पोस्ट लिहू शकल्या नाहीत. जम्मू काश्मीरमधले लोक तेव्हा छाती पिटत नव्हते. पहलगामला हिंदू धर्म विचारून अतिरेक्यांनी पर्यटकांना टिपले तेव्हा हेच सगळे छाती पिटणारे लोक कुठे होते? तेव्हा त्यांनी मोर्चे, सभा घेऊन त्याचा निषेध केल्याचे दिसले नाही. त्याचा बदला म्हणून आपण ऑपरेशन सिंदूरची कारवाई पाकिस्तानवर केली तर कित्येक जणांना वेदना झाल्या. भारताची किती विमाने पाडली, भारताचे किती नुकसान झाले याची विचारणा हे लोक करू लागले. तेव्हा त्यांना राष्ट्रप्रेम वगैरे दिसले नाही, जे आता खामेनी यांच्या राष्ट्रप्रेमाच्या कहाण्या सांगत आहेत. पाकिस्तान आपल्यावर अनेक वर्षे दहशतवादाच्या माध्यमातून हल्ले करत आहे, इथल्या निरपराध नागरिकांना मारले जात आहे, २६-११च्या हल्ल्यात शेकडो भारतीय मारले गेले तेव्हा मात्र असे मोर्चे, सभा, रॅली निघाल्याचे स्मरत नाही. सगळे काही सोयीनुसार असते.

भारताचा विचार केला तर देशातील बहुसंख्य नागरीक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहेत. ते गेल्या तीन निवडणुकातही दिसले आहे. आज मोदी देशाबाहेर जातात तेव्हाही तिथला भारतीय समूह एकत्र येऊन कौतुक करतो, त्यांना अभिमान वाटतो. भारताचे नाव जगभरात उज्ज्वल होत असल्याचे पाहून देशविदेशातील नेतेही भारताची प्रशंसा करतात. पण इथले काही भारतीय म्हणवणाऱ्या लोकांची मात्र जळजळ होते. खामेनी यांच्या देशातील अनेक नागरीक हे त्यांच्या मृत्यूमुळे खुश झालेले आहेत, ज्यांच्यावर खामेनी यांनी निर्बंध लादले, त्यांना या निर्बंधांच्या साखळदंडात अडकवले. परदेशातील इराणी नागरीकही खामेनी यांच्या मृत्युमुळे आनंदित झाल्याचे व्हीडिओ समोर येत आहेत. याचा अर्थ खामेनी यांच्या पाठीशी सगळी जनता नव्हती. परदेशात स्थायिक झालेली इराणी जनताही त्यांचे समर्थन करत नाही. उलट खामेनींची राजवट संपत असल्याबद्दल त्यांना आनंद होतो आहे. ट्रम्प-इस्रायल यांचे ते आभार मानत आहेत. इस्रायली आणि इराणी लोक मिळून आपापले झेंडे घेऊन ते रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा करत आहेत. भारतातील काही लोकांना मात्र खामेनी यांच्या मृत्युचे अपार दुःख झाले आहे हे विचित्र आहे. पण ते वास्तव आहे. मात्र यावर गंभीरपणे विचार होण्याची आवश्यकता आहे. उद्या परिस्थिती आलीच तर हे भारतीय म्हणवणारे लोक आपल्या देशाच्या बाजूने उभे राहतील की इराणच्या बाजूने हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा