कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. अनिता आनंद या यापूर्वी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सरकारमध्ये देखील कॅबिनेट मंत्री होत्या. यावेळी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना पवित्र हिंदू धर्मग्रंथ भगवदगीतेवर हात ठेवून शपथ घेतली त्यामुळे त्या विशेष चर्चेचा विषय ठरल्या.
अनिता आनंद यांनी पवित्र हिंदू धर्मग्रंथ गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या म्हणाल्या की, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झाल्याने सन्मानित वाटत आहे. एक चांगले आणि सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मार्क कार्नी आणि आमच्या टीमसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.
अनिता यांना मेलोनी जोली यांच्या जागी परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले असून जोली यांना उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कार्नी यांच्या मंत्रिमंडळातील निम्म्या सदस्या या महिला आहेत. कॅनडाच्या लोकांच्या इच्छा आणि गरजांनुसार बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ काम करेल, असा विश्वास पंतप्रधान कार्नी यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
परिणीती चोप्रा संतापल्या, काय म्हणाल्या ?
पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढवले
सीबीएसई : १० वी निकालात ९३.६६ टक्के विद्यार्थी यशस्वी
निवडणूक जिंकण्यासाठी पहलगामचा हल्ला? केरळ विद्यापीठातील परिसंवाद रद्द
अनिता आनंद या भारतीय वंशाच्या असून त्यांचे वडील तामिळनाडूचे असून आई पंजाबच्या आहेत. त्यांचे कुटुंबीय पूर्वीच कॅनडामध्ये स्थायिक झाले आहेत. यापूर्वी अनिता या ट्रुडो सरकारमध्ये वाहतूक आणि व्यापार मंत्री होत्या. अनिता यांचा जन्म १९६७ मध्ये नोव्हा स्कॉशिया येथे झाला. त्यांचे आई- वडील दोघेही डॉक्टर आहेत. २०१९ मध्ये त्या पहिल्यांदा ओकव्हिलमधून खासदार म्हणून निवडून आल्या. २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी आपले स्थान कायम ठेवले. राजकारणात येण्यापूर्वी त्या व्यवसायाने वकील आणि प्राध्यापक होत्या. कॅनडाच्या संरक्षण मंत्री असताना त्यांनी भारत- कॅनडा संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी काम केले होते.
