भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारताने स्पष्टपणे नाकारले असून अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे वास्तव बदलणार नाही यावर भर दिला आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने बदलण्याबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही टिप्पणी केली. तसेच चीनवर निशाणा साधला.
चीनच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने ११- १२ मे रोजी अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांची नवीन नावे जाहीर केल्यानंतर भारताकडून ही प्रतिक्रिया आली आहे. चीनने पुन्हा एकदा कुरापती करत भारतीय भूभागावर दावा करण्याचा एक प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, “आम्हाला असे आढळून आले आहे की चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे ठेवण्याचे त्यांचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेशी सुसंगत राहून, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो. नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही.”
यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये, चीनने भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) विविध ठिकाणांच्या ३० नवीन नावांची चौथी यादी प्रसिद्ध केली होती. भारतीय हद्दीतील ठिकाणांचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्याची चीनची ही पहिलीच वेळ नव्हती. बीजिंगने नामांतरित केलेल्या ३० ठिकाणांमध्ये १२ पर्वत, चार नद्या, एक तलाव, एक खिंड, ११ निवासी क्षेत्रे आणि एक जमीन समाविष्ट आहे. नावांच्या यादीव्यतिरिक्त, चीनच्या मंत्रालयाने तपशीलवार अक्षांश आणि रेखांश आणि क्षेत्रांचा उच्च-रिझोल्यूशन नकाशा देखील सामायिक केला होता.
हे ही वाचा :
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीपदाची शपथ
माजी संरक्षण सचिव अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ; कोण आहेत अनिता आनंद?
आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल
२०१७ मध्ये, बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांसाठी नावांची प्रारंभिक यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ ठिकाणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली, तर २०२३ मध्ये ११ अतिरिक्त ठिकाणांसाठी नावे असलेली दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती.
