भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बंगळूरू येथून अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य या तरुणाने केले आहे. या आरोपीचे नाव नवाज असे असून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याबद्दल बोलत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ नवाज याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. हे प्रकरण उघडकीस येताच बंगळूरूमधून पोलिसांनी नवाजला अटक केली आहे. भारत-पाकिस्तान तणाव वाढलेल्या काळात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानने पंतप्रधानांच्या निवासस्थानावर बॉम्ब का टाकला नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नवाजचा शोध घेतला. यानंतर बंगळूरूच्या बांदेपाल्या भागातील पीजीमधून त्याला अटक करण्यात आली. मूळचा इलेक्ट्रॉनिक सिटीचा रहिवासी असलेला नवाज संगणक मेकॅनिक म्हणून काम करतो.
अटकेनंतर नवाज याला परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तपासादरम्यान, पोलिसांना आढळले की नवाजवर तुमकुर जिल्ह्यात एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज ऍण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत आधीच खटला प्रलंबित आहे. त्याने असा व्हिडिओ का पोस्ट केला आणि त्यामागे काही खोल कट आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सह पोलिस आयुक्त रमेश बनोट म्हणाले की या व्हिडीओमध्ये नवाजने म्हटले होते की, “पंतप्रधानांनी काहीही केलेलं नाही आणि त्यांच्या घरावर बॉम्बस्फोट झाला पाहिजे.”
हे ही वाचा:
हिंदू देवीदेवतांची अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकणाऱ्याला अटक
ऑपरेशन सिंदूरपासून प्रेरित होऊन १७ कुटुंबांनी नवजात मुलींचे नाव ठेवले ‘सिंदूर’
दहशतवाद्यांना घरात घुसून मारू, वाकड्या नजरेने पाहिलंत तर विध्वंस होईल!
वैज्ञानिकांचे कौतुक जग कान टवकारून का ऐकत होते?
यापूर्वी कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ‘निच्चू मंगळुरू’ नावाच्या फेसबुक वापरकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन केल्याचा आरोप त्याच्यावर होता. उल्लाल येथील रहिवाशाच्या तक्रारीवरून २५ एप्रिल रोजी दक्षिण कन्नड जिल्हा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दंगल भडकवणे आणि अशांतता निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
